निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १०३
अर्गाेनॉमिक्स
(टीप : अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.)
‘संगणकाच्या पडद्याच्या स्थितीसह संगणकाचा कळफलक (‘कीबोर्ड’) आणि ‘माऊस’ यांची स्थिती महत्त्वाची असते. त्यावरच आपले खांदे आणि हात यांचे स्वास्थ्य अवलंबून असते. खांदे आणि हात यांच्या बर्याच समस्या कळफलक आणि माऊस यांच्या चुकीच्या स्थितीमुळे आणि ते वापरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेच निर्माण होतात. ‘याविषयी योग्य कसे असायला हवे ?’, हे या लेखातून आपण समजून घेणार आहोत.
(लेख क्र. ५)
भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/981899.html

१. कळफलक आणि ‘माऊस’ चुकीच्या पद्धतीने वापरल्याने निर्माण होणार्या समस्या
अ. खांद्यांचे स्नायू घट्ट होणे (Rounded Shoulders)
आ. मनगट दुखणे
इ. हातात सुन्नपणा येणे
ई. मानदुखी
उ. मनगटापासून कोपरापर्यंचा हाताच्या भागात घट्टपणा येणे (Forearm Tightness)
ऊ. कोपराच्या बाहेरील भागात वेदना होणे (Tennis Elbow)
‘हे त्रास कशामुळे उद्भवतात ?’, हे समजून घेण्यासाठी आपण सांध्यांवर पडत असलेल्या ताणाचे २ प्रकार जाणून घेऊया.

२. सांध्यांवर पडत असलेल्या ताणाचे प्रकार
२ अ. ‘डायनॅमिक’ ताण (Dynamic Loading) : आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचे वजन उचलून त्याची हालचाल करतो, तेव्हा सांध्यांवर काही प्रमाणात ताण पडतो. हालचाल केल्यामुळे सांध्यांवरील ताण सतत पालटत असतो. त्यामुळे याला ‘डायनॅमिक ताण’ म्हणतात. ‘सांध्यांवर न्यूनतम ताण यावा’, यासाठी वजन योग्य पद्धतीने उचलले आणि हाताळले पाहिजे. वजन उचलण्याविषयीच्या योग्य पद्धत आपण पुढील लेखमालेत पहाणार आहोत.
२ आ. ‘स्टॅटिक’ ताण (Static Loading) : आपण जेव्हा शरिराचा कोणताही भाग त्यांच्या अनैसर्गिक स्थितीत ठेवतो, तेव्हाही त्याच्यावर ताण पडतो. शरिराचा भाग स्थिर असल्याने ताण पालटत नाही. त्यामुळे याला ‘स्टॅटिक ताण’, असे म्हणतात. एकाच स्थितीत राहून काम करणार्यांमध्ये अशा प्रकारचा ताण अधिक आढळतो. संगणकीय सेवा करतांना शरिराची स्थिती अनैसर्गिक ठेवण्यामागे ‘वापरातील साहित्याची चुकीची स्थिती’, हे प्रमुख कारण असते.
३. कळफलक आणि माऊस यांची अयोग्य स्थिती अन् त्यामुळे उद्भवणारे त्रास
३ अ. कळफलक आणि माऊस यांची उंची अधिक असल्यास होणारे त्रास (चित्र क्र. १ पहा)

३ अ १. खांदे : खांदे आराम स्थितीपेक्षा थोडे उंच रहातात. त्यामुळे खांदे आणि मान यांवरील ताण वाढतो. परिणामी ‘मानदुखी, खांदेदुखी, हातात मुंग्या येणे, हातांच्या नसा दबणे’, अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. आसंदीचे हात (हँडरेस्ट) उंच असल्यासही असेच होते.
३ अ २. कोपर : कोपर अधिक वाकतात. त्यामुळे रक्तपुरवठा नीट होत नाही. परिणामी कोपर आणि हात यांच्याशी संबंधित आजार होतात.
३ अ ३. मनगटे : मनगट अधिक खाली रहातात. त्यामुळे हातांच्या स्नायूंवर ताण पडतो.
३ आ. कळफलक आणि माऊस यांची उंची अल्प असल्यास होणारे त्रास (चित्र क्र. २ पहा)

३ आ १. खांदे, मान आणि पाठ : पाठीतून वाकावे लागते. त्यामुळे मानदुखी आणि पाठदुखी असे त्रास होऊ शकतात.
३ आ २. कोपर : कोपर अधिक सरळ होतात. त्यामुळे कोपर आणि मान यांवर ताण पडतो अन् हातांना मुंग्या येणे इत्यादी त्रास होतात.
३ आ ३. मनगटे : मनगटे वर रहातात. त्यामुळे त्यांतील नसांवरील ताण ४२ टक्के वाढून ‘तळहाताला मुंग्या येणे, बधीरपणा किंवा अशक्तपणा येणे’, असे त्रास होतात. याला ‘कार्पल टनेल सिंड्रोम’, असे म्हणतात.
३ इ. कळफलक आणि माऊस शरिराच्या अधिक जवळ ठेवल्यास होणारे त्रास (चित्र क्र. ३ पहा)

३ इ १. मान : कळफलक पहाण्यासाठी पुनःपुन्हा खाली पहावे लागते. त्यामुळे मानेवर ताण येतो.
३ इ २. कोपर : कोपर अधिक वाकवावे लागत असल्यामुळे तेथील नसांवर ताण पडतो आणि हाताला मुंग्या येणे इत्यादी त्रास होतात.
३ ई. कळफलक आणि माऊस शरिराच्या अधिक दूर ठेवल्यास होणारे त्रास (चित्र क्र. ४ पहा)

३ ई १. खांदे : कळफलक आणि माऊस अधिक दूर असल्यास नैसर्गिकपणे खांदे पुढे येतात अन् खांदेदुखी, मानदुखी, असे त्रास होतात. दंड ३० अंशापेक्षा अधिक पुढे गेल्यास मान आणि खांदे यांवरील ताण दुप्पट होतो.
३ ई २. कोपर : कोपर अधिक वेळ सरळ ठेवावे लागत असल्यामुळे तेथील नसा ताणल्या जातात आणि ‘हाताला मुंग्या येणे, हातातील जोर न्यून होणे’ इत्यादी त्रास होतात.
३ ई ३. मनगटे : कधी कधी मनगटे कडक भागावर दाबली गेली किंवा घासत असली, तरीही त्यांतील नसांना सूज होऊन आजार होऊ शकतो.
४. कळफलक, माऊस, तसेच पटल आणि आसंदीचे हात (हँडरेस्ट) यांची योग्य उंची कशी ठरवावी ?
सामान्यपणे पटलांची (अन् ‘कीबोर्ड ड्रॉवर’ची) उंची ठरलेली असते.
अ. कोपर साधारण ९० – १०० अंश कोनात वाकवावेत.
आ. मनगटे सरळ ठेवावीत, खांदे सैल अन् नैसर्गिक स्थितीत ठेवावेत.
इ. दंड शरिराजवळ असावेत. आपण हातात सामानाची पिशवी घेऊन येतो, तेव्हा दंड शरिराजवळ असतात, तशी दंडांची स्थिती असावी. या स्थितीत जिथे हात येतात, तिथे कळफलक आणि माऊस यायला हवेत. त्यापेक्षा ते वर-खाली किंवा पुढे-मागे ठेवू नयेत. थोडक्यात आपल्या कोपराच्या उंचीला किंवा थोडे खाली कळफलक आणि माऊस असायला हवेत. ते कोपरापेक्षा उंच असतील, तर खांद्यांच्या स्नायूंवर २५ ते ३० टक्के अधिक ताण येतो. (चित्र क्र. ५ पहा)

ई . पटल ‘ॲडजस्ट’ करणे शक्य नसल्याने आसंदीची उंची ‘ॲडजस्ट’ करावी किंवा आसंदीवर उशी ठेवून आपल्या हातांची स्थिती कळफलकाच्या पातळीला आणावी.
ए . मनगटे उजवीकडे किंवा डावीकडे न झुकता सरळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे कळफलक हाताळतांना तो आपल्या समोर मध्यावर असलेला चांगला, तसेच माऊस अधिक उजवीकडे न ठेवता मनगटे सरळ रहातील, असा ठेवावा.’ (२७.११.२०२५)
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा.
भाग ६ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/985638.html
पैसा जिंकला, नाती हरली !
‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग
‘विश्वगुरु भारत’ होण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
चला, पाल्यांचा मराठी शाळेत प्रवेश निश्चित करूया !
अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला भगवंत सूक्ष्मातून कार्य करत असूनही त्याला देहधारणा करून पृथ्वीवर अवतार घ्यावे लागण्यामागील अध्यात्मशास्त्र !