संगणकावर काम करतांना मांड्यांची स्थिती कशी असावी ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १०५

(टीप : अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.)

‘सध्या आपल्याला ‘अर्गोनॉमिक्स’च्या नावाखाली आसंद्यांचे बरेच प्रकार बघायला मिळतात. यांमध्ये ‘आसंद्यांच्या सीटचा आकार, त्याची खोली, मऊपणा, अँगल’, हे सर्व निराळे असते. त्यामुळे आसंदीची निवड करतांना आपण थोडे गोंधळून जातो. आसंदीवर बसतांना मांड्यांच्या स्थितीचे महत्त्व आणि आसंद्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सीटचे उपयोग आपण आजच्या अन् पुढील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. 

मांडी हा पायांना कमरेशी जोडणारा दुवा असतो. मांड्यांतून अनेक शिरा जातात. मांडीच्या स्थितीवर शरिराच्या खालच्या भागाचे स्वस्थ्य अवलंबून असते. याविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

भाग ६

भाग ५ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/982938.html

१. मांडीच्या स्थितीचा शरिरावर कसा परिणाम होतो ? 

गुडघे पोटाजवळ घेणे आणि पाठ ताठ ठेवणे यांविषयीचे चित्र

१ अ. कमरेची स्थिती आणि मणक्यांतील गादीवरील दाब : एक प्रयोग करून पाहूया. आपले गुडघे पोटाजवळ घ्या आणि पाठ ताठ करण्याचा प्रयत्न करा. (चित्र पहा) शक्य होत आहे का ? नाही ना !

मांड्या वर असतील, तर कंबर वाकते आणि मणक्यांवर ताण पडतो. असे दीर्घकाळ केल्यामुळे ‘स्लिप डिस्क’ (मणक्यातील गादी सरकणे)सारखे आजार होऊ शकतात. याउलट मांड्या भूमीला समांतर असतील, तर

१. पाठीचे नैसर्गिक वळण (lumbar lordosis) टिकून रहाते.

२. पेल्विस (कटी) नैसर्गिक स्थितीत रहाते.

३. खुब्याचा सांधा मोकळा रहातो.

१ अ १. संशोधनानुसार शरिराच्या निरनिराळ्या स्थितींमध्ये मणक्यांतील गादीवर (डिस्कवर) येणारा दाब

यावरून लक्षात येते की, मांड्या भूमीला समांतर ठेवल्यामुळे डिस्कवरील दाब २५ ते ४० टक्के न्यून होतो.

१ आ. रक्तवाहिन्यांवरील परिणाम : जर मांड्या वर असतील, तर गुडघ्याच्या मागच्या रक्तवाहिन्यांवरील दाब वाढतो आणि पायांतील रक्तप्रवाह अल्प होतो.

श्री. निमिष म्हात्रे

संशोधनानुसार मांड्या वर असल्या, तर गुडघे १०५ अंशांपेक्षा अधिक वाकतात. त्यामुळे गुडघ्याच्या मागे असलेल्या popliteal धमनीवर (artery वर) १६ ते १९ टक्के अधिक दाब पडतो आणि पायांतील रक्तप्रवाह १७ ते २२ टक्के न्यून होतो. ४५ मिनिटांत पायांमध्ये रक्त साचण्याची मात्रा (venous pooling) ३० ते ४० टक्के वाढते. त्यामुळे तितक्याच प्रमाणात ‘व्हेरिकोज व्हेन्स (शरिरातील, विशेषतः पायांतील शिरा सुजणे आणि फुगणे)’ होण्याचा धोका वाढतो. एकूणच या स्थितीमुळे ‘पायांना सूज येणे, मुंग्या येणे, पाय सुन्न पडणे’, या समस्या चालू होतात किंवा वाढतात.

१ इ. स्नायूंवरील परिणाम : संशोधनानुसार मांड्या वर असल्यास खुबा आणि कंबर यांच्या स्नायूंवरील ताण वाढतो. मांड्या वर असल्यास खुब्याच्या स्नायूंवरील ताण ३५ टक्के वाढतो. स्नायूंवरील ताण वाढल्यामुळे ते लवकर दमतात आणि कंबरदुखी / पायदुखी उद्भवू शकते.

मांड्या भूमीला समांतर ठेवल्यास कमरेच्या स्नायूंचा ताण २० ते २५ टक्के न्यून होतो.

१ ई. शरिराच्या वजनाचा कमरेवर होणारा परिणाम : ‘सीट प्रेशर मॅपिंग’नुसार मांड्या वर असल्यास शरिराचे वजन मागे सरकते. त्यामुळे कमरेवरील दाब वाढून वेदना होतात. मांड्या अधिक खाली असल्यास शरीर पुढे घसरते. त्यामुळे शरिराचे स्थैर्य बिघडते. मांड्या भूमीला समांतर ठेवल्यास सीटवर वजन समान पसरते. त्यामुळे कंबर स्थिर रहाते.

‘ISO 9241-5’च्या संशोधनानुसार मांड्या भूमीला समांतर असतांना समान दाब पसरल्यामुळे व्यक्तीला १८ ते २२ टक्के अधिक आराम मिळतो.

त्यामुळे संगणकीय कामे करतांना मांड्या ९० ते ११० अंश कोनात असलेले चांगले !’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (११.११.२०२५)

(भाग ७ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/990014.html

🪷 ‘व्यायाम’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा 🪷