ब्रह्मज्ञान अवतरले साक्षात् श्रीमुखातून, रचले श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतारूपी दिव्यकांड ।  

कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली. १ डिसेंबर या दिवशी ‘गीता जयंती’ आहे. त्यानिमित्त सुश्री मधुरा भोसले यांना सुचलेले काव्य येथे दिले आहे.

भरतखंडातील सारे रणवीर, ध्वज फडकवूनी त्यांच्या रथांवर ।
जमले सारे रणभूमीवर, धर्म-अधर्माच्या कुरुक्षेत्रावर ।। १ ।।

कित्येक रथी आणि महारथी, असंख्य जमले अतिरथी ।
रणात शोभतो एक सारथी, त्याला म्हणती पार्थसारथी ।। २ ।।

रामभक्त बसला रथावर, त्याची दृष्टी जडली कृष्णाच्या चरणांवर ।
विनम्रतेने जोडूनी कर, वंदिले हनुमंताने कुरुक्षेत्रावर ।। ३ ।।

सूर्य थांबला नील अंबरी, पहाण्या श्रीकृष्ण पितांबरधारी ।
दृष्टी खिळली लक्ष्मीकांतावरी, नीलकांताच्या मुखकमलावरी ।। ४ ।।

श्यामसुंदर कृष्णकुंतल धारी, कमलनयन मुकुंद कुंजबिहारी ।
मयुरपंख सुवर्ण किरीटावरी, अनुपम सुंदर श्रीकृष्णमुरारी ।। ५ ।।

सुश्री (कु.) मधुरा भोसले

रथ पोचला रणभूमीवरी, दोन्ही सैन्याच्या मध्यावरी ।
धर्म अधर्माच्या सीमेवरी, उभा पार्थ धनुर्धारी ।। ६ ।।

भीष्मपितामह वडीलधारी, आप्त-स्वजन झाले वैरी ।
बंधू शत्रू झाले, तरी प्रिय मजला नाती सारी ।। ७ ।।

युद्धभूमीवर धीर खचला, खांद्यावरचा धनु खाली सरकला ।
सर्वत्र काळोख पसरला, निराशेने पार्थ ग्रासला ।। ८।।

शुभ मुहूर्त साधला या तिथीला, मार्गशीर्षातील मोक्षदा एकादशीला ।
शरण आला पार्थ श्रीकृष्णाला, पार्थसारथी सांगे गीता अर्जुनाला ।। ९ ।।

अर्जुनविषादाने आरंभ झाला, प्रश्नोत्तराने संवाद रंगला ।
श्लोकामागून श्लोक रचला, काव्यबद्ध उपदेश केला ।। १० ।।

काळ थांबला रणभूमीवर, श्वास रोखला शब्दांवर ।
मधुर वाणी अमृतापरी, तहानले मन चातकापरी ।। ११ ।।

कर्मयोग आणि ज्ञानकांड, यज्ञ-याग कर्मकांड ।
अष्टांगयोगाचा ध्यानकांड अन् भक्तीचे उपासनाकांड ।। १२ ।।

श्रीकृष्ण भगवान ज्ञानी प्रकांड, रचले श्रीमद्भगवद्गीतारूपी दिव्यकांड ।
१८ अध्यायांची विविध कांडे, ज्ञानामृताने नाहले अखिल ब्रह्मांड ।। १३ ।। 

पूर्णपुरुषोत्तम ज्ञानवंत, सख्याहरि करूणामय अनंत ।
श्रीकृष्ण असे प्रज्ञावंत, गीतेत वसे ज्ञानस्वरूप मूर्तीमंत ।। १४ ।।

देवांनाही अर्जुनाचा हेवा वाटला, भीष्मांनाही संवाद ऐकावासा वाटला ।
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला अन् त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवला ।। १५ ।।

सूर्याेदय झाला मेघांच्या दाटीतून, ब्रह्मज्ञान अवतरले साक्षात् श्रीमुखातून ।
आत्मज्ञानाचे बीज अंकुरले अंतःकरणातून अन् अर्जुन मुक्त झाला भवसागरातून ।। १६ ।।

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याची वेळ आणि टंकलेखन करण्याची वेळ २.११.२०२५, दुपारी ३ ते ३.१५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक