Vande Mataram : ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास होणार !

केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात आणणार महत्त्वपूर्ण विधेयक

नवी देहली – केंद्र सरकार २० जुलैपासून चालू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयके सादर करणार आहे. यांमध्ये सर्वाधिक चर्चा ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर (सुधारणा) विधेयक’ या विधेयकाची आहे.

या प्रस्तावित कायद्याद्वारे राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’चा अपमान करणे, त्याचे गायन जाणूनबुजून रोखणे किंवा त्यात अडथळा आणणे यांसारखी कृत्ये दंडनीय गुन्हा बनवण्याची सिद्धता चालू आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने या विधेयकाला आधीच संमती दिली असून ते सर्वांत आधी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सादर केले जाईल.

१. ‘राष्ट्रीय सन्मानाशी जोडलेल्या इतर प्रतीकांप्रमाणेच ‘वन्दे मातरम्’लाही कायदेशीर संरक्षण देणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भूमिकेमुळे वन्दे मातरम् ज्या सन्मानास पात्र होते, तो सन्मान पूर्वीच्या धर्मनिरपेक्ष सरकारांनी दिला नाही’, असे सरकारचे दीर्घकाळापासूनचे म्हणणे आहे.

२. प्रस्तावित सुधारणा लागू झाल्यानंतर वन्दे मातरम् गीताला राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आदी राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतीकांच्या श्रेणीत कायदेशीर संरक्षण मिळेल. जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून राष्ट्रीय गीताचा अपमान केला, त्याचे गायन रोखले, गायनाच्या वेळी व्यत्यय आणला किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात गदारोळ करून अडथळा निर्माण केला, तर त्याच्याविरुद्ध गुन्हेगारी कारवाई केली जाऊ शकते.

३. अशा प्रकरणांमध्ये अधिकाधिक ३ वर्षांपर्यंतच्या कारावासाचे प्रावधान प्रस्तावित आहे. ज्या सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’ लावले किंवा गायले जाते, तिथे ‘वन्दे मातरम्’चे गायनही अनिवार्य करण्याचे निर्देश सरकारने गृह मंत्रालयाच्या माध्यमातून आधीच दिले आहेत. आता या व्यवस्थेला कायदेशीर बळ देण्याच्या दृष्टीने ही सुधारणा केली जात आहे.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारने उचललेले हे महत्त्वापूर्ण पाऊल असून असे विधेयक आणणे, हा स्तुत्य निर्णय आहे !