गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ?  – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न

‘सिरि’कडून ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद न देण्याविषयी ॲपल आस्थापनाकडून अद्याप उत्तर नाही !

(‘सिरि’ म्हणजे ‘ॲपल’ आस्थापनाच्या भ्रमणभाषवरील एक सुविधा, ज्याद्वारे वेगवेगळे कार्य करून घेता येऊ शकतात)

नवी देहली – काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील उज्जैन येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘ॲपल’ आस्थापनाच्या ‘आयफोन’ या भ्रमणभाषमधील ‘सिरि’ सुविधेच्या विरोधात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली होती. ‘सिरि’ला ‘जय श्रीराम’ म्हटले, तर तो प्रतिसाद म्हणून ‘जय श्रीराम म्हणत’ नाही; मात्र मुसलमान म्हणतात, त्याप्रमाणे ‘सलाम वालेकूम’ (‘तुम्हाला शांतता लाभो’) म्हटल्यास ‘वालेकूम सलाम’ (‘तुम्हालाही शांतता लाभो’) असे म्हणतो. यावरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. यावर अद्याप ‘ॲपल’कडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. दुसरीकडे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे की, या संदर्भात वाद घालणे चुकीचे आहे. ॲपलकडून सिरिची संगणकीय प्रणाली बनवण्यात आली आहे. त्यानुसार तिच्याकडून प्रतिसाद मिळणार आहे. जगात विविध प्रकारे अभिवादन करण्याचे प्रकार आहेत, तर ‘ॲपल’कडून प्रत्येकाला प्रतिसाद देण्याचे प्रोग्राम बनवणे अशक्य ठरेल, असे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांत एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात गूगलच्या ‘जेमिनी’ या एआय संकेतस्थळाला जर ‘जय श्रीराम’ म्हटले किंवा ‘जय महाकाल’ म्हटले, तर तो त्याच प्रमाणे ‘जय श्रीराम’ आणि ‘जय महाकाल’ म्हणत प्रतिसाद देतो. जर जेमिनीला हे शक्य आहे, तर ॲपलला का नाही ?, असे आता विचारले जात आहे. लोक आता ॲपलला धारेवर धरत आहेत की, भारतातून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावूनही त्याने त्याच्या व्हॉईस असिस्टंटला भारतीय संस्कृतीनुसार उन्नत (अपग्रेड) का केले नाही ?

ॲपल आमच्या देवाच्या नावाचा आदर करत नाही !

हा व्हिडिओ प्रसारित करणार्‍याने म्हटले आहे की, आयफोन आमच्या संस्कृतीच्या विरोधात काम करत आहे आणि कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावत आहे. संपूर्ण देशात कोट्यवधी हिंदू आवडीने आयफोन खरेदी करतात; पण आस्थापने आमची फसवणूक करत आहे. आमचा सर्व ‘डेटा’ (माहिती) या आस्थापनाकडे आहे आणि हे आमच्याविरुद्ध रचलेले एक नियोजनबद्ध कारस्थान आहे. आज भारतात आयफोन दाखवणे ही एक फॅशन बनली आहे. लोक पैसे नसतांनाही कर्ज काढून किंवा महागड्या हप्त्यांवर आयफोन खरेदी करतात. असे असूनही ही परदेशी आस्थापन आमच्या देवाच्या नावाचा आदर करत नाही.

धार्मिक घोषणांना स्थान नाही !

तज्ञांचा असाही युक्तीवाद आहे की, सिरिसारखे आभासी साहाय्यक भाषेच्या एका शब्दकोशावर काम करतात. त्यांच्या प्रणालीमध्ये जगभरात सर्वाधिक बोलले जाणारे काही मोजके सामान्य अभिवादन जसे की- ‘हॅलो’, ‘हाय’, ‘सलाम वालेकूम’, आणि काही निवडक भाषांमध्ये ‘नमस्ते’साठी ‘हार्ड-कोडेड’ (Hard-coded) उत्तरे आधीपासूनच प्रोग्राम केलेली असतात. ‘सलाम वालेकुम’ हे जगभरात एक सामान्य अभिवादन मानले जात. याउलट ‘जय श्रीराम’ किंवा ‘हर हर महाकाल’ या शब्दांना ही आस्थापने एक धार्मिक घोषणा मानतात, सामान्य अभिवादन नाही. याच कारणामुळे सिरीच्या कोडींग लिस्टमध्ये हा शब्द समाविष्ट नव्हता. ‘हर हर महादेव’ किंवा ‘अल्ला-हू-अकबर’ हे धार्मिक नारे आहेत, ज्यांना सामान्य अभिवादाच्या सूचीत स्थान मिळत नाही.

 तंत्रज्ञानाच्या जगात हिंदूंच्या भावनांना नेहमीच का दुर्लक्षित केले जाते ?

हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे आहे की, जेव्हा आस्थापने भारतासारख्या अफाट आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देशात व्यापार करतात, तेव्हा तेथील वास्तव समजून घ्यावे लागेल. भारतात ‘जय श्रीराम’ किंवा ‘जय श्री महाकाल’ हा केवळ कोणताही राजकीय किंवा धार्मिक नारा नाही, तर हा कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनात एकमेकांना भेटल्यावर वापरला जाणारा सर्वांत मोठा नमस्कार किंवा अभिवादन आहे. अशा परिस्थितीत ‘जय श्रीराम’ हे अभिवादन नाही’, असे म्हणणे पूर्णपणे फोल आणि वास्तवापासून दूर आहे. जर याला कोडिंगच्या भाषेत केवळ एक ‘मिसिंग वर्ड’ (सुटलेला शब्द) मानले, तरीही हा प्रश्न उपस्थित होतो की, भारताला सर्वांत मोठी बाजारपेठ मानणारे ‘ॲपल’ आस्थापन एवढे मोठा निष्काळजीपणा कसा करू शकते? जेव्हा गूगलचा जेमिनी आणि इतर आभासी साहाय्यक या गोष्टी समजून योग्य उत्तर देऊ शकतात, तेव्हा ‘ॲपल’ची ‘सिरि’ येथे का अपयशी ठरली? जर कोट्यवधी भारतीय ग्राहक या आस्थापनांचे महागडे फोन खरेदी करून त्यांना अब्जावधी रुपयांचा व्यवसाय देत असतील, तर बदल्यात ते स्वतःच्या संस्कृती आणि श्रद्धेचा आदरही इच्छितात. याला केवळ एक तांत्रिक त्रुटी म्हणून नाकारता येणार नाही. ॲपलने अद्याप या संपूर्ण वादावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. जोपर्यंत ‘ॲपल’ ही तांत्रिक त्रुटी सुधारून स्वतःची भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत भारतातील बहुसंख्य समाजात ही अप्रसन्नता आणि हा प्रश्न नक्कीच कायम राहील की, तंत्रज्ञानाच्या जगात हिंदूंच्या भावनांना नेहमीच का दुर्लक्षित केले जात

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक भावनांना किंमत न देणार्‍या या जागतिक आस्थापनांच्या उत्पादनांवर जोपर्यंत हिंदू बहिष्काराचे शस्त्र उगारणार नाहीत, तोपर्यंत असले प्रकार चालूच रहाणार, हे लक्षात घ्या !