‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही !’ – उपाशी कॉम्रेड्सची तडफड

सालबादप्रमाणे यंदाही हिवाळ्याच्या प्रारंभी देशाच्या राजधानीत प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. या विरोधात देहलीतील इंडिया गेटवर काही ‘वोक’ (‘वोक’ म्हणजे सामाजिकदृष्ट्या सध्याची जी व्यवस्था आहे त्याला विरोध करणे, सामाजिक संस्कृतीला विरोध करणे, त्या विरुद्ध बंड करणे, ती अमान्य करणे.) लोक आंदोलन करत आहेत. अर्थात् देहलीत आम आदमी पक्षाचे सरकार असतांना १० वर्षांत हे लोक कुठेही न दिसल्याने त्यांचा राजकीय ‘अजेंडा’ (कार्यसूची) असल्याचा आरोपही होत आहे. अर्थात् असे आरोप-प्रत्यारोप होतच असतात.

उपाशी कॉम्रेड्सचे आंदोलन

१. प्रदूषणविरोधी आंदोलनाचे रूपांतर शोकसभेत करण्याचा प्रयत्न

देहलीत २४ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या या आंदोलनात उपाशी कॉम्रेड्स आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे ‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, हा अजेंडा चालू करून परिणामी प्रदूषणविरोधी आंदोलनाचे रूपांतर भारतीय सुरक्षा दलांनी ठोकलेल्या नक्षलवादी माडवी हिडमाच्या शोकसभेत करण्याचा प्रयत्न केला. अर्थात् देहली पोलिसांनी या उपाशी कॉम्रेड्चा अजेंडा अतिशय चांगल्या पद्धतीने मोडून काढला. त्याच वेळी ‘या उपाशी कॉम्रेडने कितीही काहीही केले, तरीही शस्त्र न सोडल्यास नक्षलवादी ठोकले जाणारच’, याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अतिशय ठाम आहेत.

पार्थ कपोले

२. साम्यवाद्यांचा ‘अजेंडा’ उघड

देहलीच्या प्रदूषणाचा प्रश्न निश्चितच गंभीर आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे दायित्व हे केंद्र सरकार, देहली राज्य सरकार यांच्यासह पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यांचेही आहे आणि याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन होत असतील, तर त्यात वावगे काहीही नाही; मात्र या आंदोलनात जर ‘माडवी हिडमा अमर रहे’, ‘कितने हिडमा मारोगे, हर घर से हिडमा निकलेगा’, असा नक्षलवादी अजेंडा रेटण्याचा नेमका काय संबंध ? याचे उत्तर द्यावेच लागेल.

प्रत्येक गोष्टीत घुसून तेथे केवळ विध्वंस करणे, हाच साम्यवादी ‘अजेंडा’ राहिला आहे. राजकारण, सिनेमा, साहित्य, कुटुंब अशा ज्या ज्या व्यवस्थांमध्ये साम्यवादी आले, तेथे त्यांनी त्या व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच प्रयत्न केले आहेत. अर्थात् यामागे त्यांची बौद्धिक अन् शारीरिक उपासमार हे अतिशय महत्त्वाचे कारण असल्याचे नक्षलसमर्थकांकडे बघून लक्षात येते.

३. कॉम्रेड्स लोकांची वास्तविक स्थिती

‘आम्ही आता क्रांती घडवणार आहोत. त्या क्रांतीनंतर सर्वत्र कसे समतेचे मार्क्सचे राज्य येईल’, असे भाबडे स्वप्न नव्या कॉम्रेड्सना त्यांचे मार्गदर्शक असलेले म्हातारे कॉम्रेड्स दाखवतात. प्रत्यक्षात समाजात आल्यावर त्यांना स्वतःचा क्रांतीचा अजेंडा हा सुमार असल्याचे लक्षात येते; कारण समाजात पालट घडवायचा असेल, तर त्यासाठी वेळ देण्याची या लोकांची सिद्धता नसते. अर्थातच त्यामुळे त्यांना नैराश्य येणे स्वाभाविक असते आणि ते लपवण्यासाठी स्वत:चेच समाधान करून घेण्यासाठी ही उपाशी पोर प्रत्येक गोष्टीत स्वतःचा नक्षली अजेंडा रेटायला लागतात. परिणामी समाजापासून हे लोक आणखीनच तुटतात आणि समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देतो. यामध्ये सर्वांत मोठी हानी होते ती मूळ सूत्रांची; कारण हे उपाशी लोक जाणीवपूर्वक ‘आम्ही क्रांती करू शकत नाही ना, मग आम्ही तुमचीही हानी करणार’, या अजेंड्यावर नागरी समाजाचा बाजार उठवतात. त्यामुळे समाजातील अनेकांना या उपाशी कॉम्रेड्सच्या आंदोलनात तथ्य वाटू शकते; मात्र हे लोक केवळ विध्वंसच करू शकतात, हे कधीही विसरता कामा नये.

– पार्थ कपोले, देहली (२४.११.२०२५)