China Mistreatment Indian Woman : कावेबाज चीनने भारतीय महिलेसमवेत केलेले गैरवर्तनाचे आरोप फेटाळले !

अरुणाचल प्रदेश जन्मस्थान असलेल्या भारतीय महिलेला चीनच्या शांघाय विमानतळावर १८ तास रोखल्याचे प्रकरण

भारतीय महिला पेमा वांग थोंगडोक व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग

बीजिंग (चीन) – चीनने अरुणाचल प्रदेशात जन्मलेल्या भारतीय महिला पेमा वांग थोंगडोक यांच्यासमवेत शांघाय विमानतळावर गैरवर्तन केल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सांगितले की, भारतीय महिलेसमवेत कोणतीही बळजोरी, कह्यात घेणे किंवा त्रास देण्यासारखे वर्तन झाले नाही. आम्ही महिलेला आराम, पाणी आणि जेवणाची सुविधासुद्धा दिली. (असेच आहे, तर भारतीय महिलेला विमानतळावर १८ तास ताटकळत का ठेवण्यात आले, यावर चीनला जाब विचारला गेला पाहिजे ! – संपादक)

चीनच्या या विधानावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. चीन कितीही नाकारू दे, सत्य पालटले जाऊ शकत नाही. आम्ही पेमा यांच्या अटकेचे सूत्र चीनसमोर कठोर शब्दांत मांडले. चिनी अधिकारी अद्याप हे सांगू शकलेले नाहीत की, महिलेला का रोखण्यात आले. चीनचे स्वतःचेच नियम २४ तासांपर्यंत व्हिसाखेरीज (एखाद्या देशात रहाण्यासाठीच्या दस्तऐवजाखेरीज) ‘ट्रान्झिट’ची अनुमती देतात. (‘ट्रान्झिट’ म्हणजे २४ तासांपर्यंत ‘व्हिसा’खेरीज एखाद्या देशाच्या विमानतळावर रहाण्याची दिली जाणारी अनुमती. शक्यतो मूळ ठिकाणाहून नियोजित देशापर्यंत जातांना मधल्या एखाद्या देशात विमान पालटण्यासाठी त्या देशात उतरावे लागते. हा वेळ म्हणजे ‘ट्रान्झिट’ होय.)


थोडक्यात समजून घ्या हे प्रकरण !

ब्रिटनमध्ये रहाणार्‍या भारतीय महिला पेमा या २१ नोव्हेंबरला जपानला जात असतांना त्यांचे विमान चीनच्या शांघायमध्ये ३ तासांसाठी थांबले होते. त्या वेळी चिनी पारपत्र अधिकार्‍यांनी पेमा यांचे जन्मस्थान अरुणाचल प्रदेश असल्याचे पाहून त्यांचे भारतीय पारपत्र अवैध ठरवले, तसेच ते जप्त केले. पेमा यांनी आरोप केला, ‘माझ्याकडे वैध व्हिसा असूनही मला जपानच्या विमानात बसू दिले गेले नाही. विमानतळावर उपस्थित अनेक पारपत्र अधिकारी आणि ‘चायना ईस्टर्न एअरलाइन्स’चे कर्मचारी यांनी माझी खिल्ली उडवली. १८ तासांचा हा त्रासदायक अनुभव राहिला.’ शेवटी पेमा यांनी ब्रिटनमधील एका मित्राच्या माध्यमातून शांघायमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर भारतीय अधिकार्‍यांनी त्यांना रात्रीच्या एका विमानात बसवून शांघायमधून बाहेर पडण्यास साहाय्य केले.

चीन निराधार दावा करत आला आहे की, तो अरुणाचल प्रदेशाला ‘दक्षिण तिबेट’ मानतो, तर भारत स्पष्टपणे म्हणतो की, अरुणाचल प्रदेश नेहमीच भारताचे अविभाज्य राज्य राहिले आहे.

संपादकीय भूमिका

विस्तारवादी चिनी ड्रॅगनला धडा शिकवण्यासाठी त्याचा चेहरा जगासमोर उघडा पाडणे आवश्यक ! यासाठी आता भारताने कंबर कसली पाहिजे !