विद्यार्थ्यांना शिस्त असणे आवश्यक ! – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

‘शिक्षणातील सुरक्षित क्षितीज’ या विषयावरील पुणे येथील चर्चासत्र

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणे – पुणे पोलिसांच्या वतीने ‘शिक्षणातील सुरक्षित क्षितीज’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलतांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, सध्या सामाजिक माध्यमातून आक्षेपार्ह लेखनातून विखारी वातावरण निर्माण केले जाते. विद्यार्थी मद्यपान करून वाहने चालवतात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, त्यामुळे अपघात होतात. शहरातील शिकवणीवर्ग विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावणी देतात. मुला-मुलींच्या येण्या-जाण्यावर वसतिगृहांचे नियंत्रण नाही.

विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाचे प्रमाण वाढत आहे. याविषयी पालकांनी जागरूक राहून त्यांची मुले काय करतात ? याकडे लक्ष द्यायला हवे. मुलांना योग्य, अयोग्य, हक्क, मूलभूत कर्तव्ये, अधिकार शिकवले पाहिजे. शहरातील शिक्षण संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ, अमली पदार्थ, मद्यविक्री केली जाते, हे थांबवणे हे प्रशासनाचे दायित्व असले, तरी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेऊन कठोर भूमिका घेत ते थांबवायला हवे.

पोर्शे प्रकरणात आरोपीला वाचवण्याचा आरोप पोलिसांवर झाला; पण पोलिसांनी तत्त्वनिष्ठ राहून काम केले आहे. पीडितेला नक्कीच न्याय मिळेल. देशात पहिल्यांदा या प्रकरणात रक्ताचे नमुने पालटल्याचे समोर आल्याने मी पुन्हा रक्ताचे नमुने घ्यायला लावले. डी.एन्.ए. (डी.एन्.ए. म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक. जनुकीय घटक (जेनेटिक मटेरियल) ज्यापासून बनतात, ते रेणू म्हणजे डी.एन्.ए.) पडताळणी करायला लावून या प्रकरणातील भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि आरोपींना कारागृहात पाठवले.