Turkey Denied Airspace : भारताकडे ३ हेलिकॉप्टर घेऊन येणार्‍या मालवाहू विमानाला तुर्कीयेने अनुमती नाकारली !

अंकारा (तुर्कीये) – मे महिन्यातील भारत-पाक संघर्षात पाकिस्तानला तुर्कीयेने साहाय्य केले. त्यानंतर आता तुर्कीये भारतासाठी नवे आव्हान बनत असल्याची चर्चा आहे. भारताने वर्ष २०२० मध्ये अमेरिकेशी हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता. त्यानुसार ३ हेलिकॉप्टर भारताकडे आणणार्‍या मालवाहू विमानाला तुर्कीयेच्या वायूप्रदेशातून जाण्यास अनुमती मिळाली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान आणि तुर्कीये यांची वाढती सलगी !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर परिस्थिती बिघडण्याची चिन्हे दिसताच तुर्कीयेने त्याची युद्धनौका तातडीने कराची बंदरावर पाठवली होती. चीननंतर तुर्कीये पाकिस्तानला अधिकाधिक शस्त्रे पुरवणारा देश आहे. पाकिस्तान आणि तुर्कीये यांची वाढती सलगी भारतासाठी नवे संकट निर्माण करत आहे.

एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी नमूद केले की, या संबंधांच्या मागे धार्मिक साम्यताही आहे. दोन्ही देश कट्टर इस्लामी प्रवाहाला प्रोत्साहन देतात. तुर्कीयेला इस्लामी जगतात आघाडीचे स्थान मिळवायचे आहे आणि पाकिस्तान या धोरणाचा प्रमुख भागीदार आहे. काश्मीर प्रश्नावर तुर्कीये पाकिस्तानच्या बाजूने उभा रहातो आणि याचा भारतावर थेट परिणाम होतो. अनिल चोप्रा म्हणाले की, भारताने सैन्यदलाची क्षमता वाढवण्यासह पश्चिम आशिया आणि युरोप येथील तुर्कीयेच्या विस्तारवादी भूमिकेविषयी चिंतित असलेल्या देशांशी सहकार्य वाढवावे. सुज्ञ कूटनीती आणि स्वनिर्धारित धोरण यांच्या आधारे भारत हा तुर्कीये आणि पाकिस्तान यांच्या युतीला प्रभावीपणे आव्हान देऊ शकतो.

संपादकीय भूमिका

भारताच्या सातत्याने कुरापती काढणार्‍या तुर्कीयेला सरकारने वेळीच धडा शिकवला पाहिजे, अन्यथा पाकप्रमाणेच तोही भारताला सतत डिवचत राहील !