‘बारामुल्ला’ हा हिंदी चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहिला. ‘नेटफ्लिक्स’वर चित्रपट पहाणे, म्हणजे सध्या भीतीच वाटते. पक्वान्न म्हणून विज्ञापन केलेले असले, तरी पुरोगाम्यांचे ‘वोक’लेले पहाण्याची पाळी येते. त्यामुळे ‘बारामुल्ला’ हा ‘हॉरर’ (भीतीदायक) नसलेला चित्रपट घाबरत घाबरत पाहिला. सुदैवाने पुरोगामी ‘वोकिझम’ नव्हता. चित्रपट आपण ‘हॉरर’ या सदरात रूढार्थाने खरेतर येत नाही. हा ‘सुपरनॅचरल थ्रिलर’ (अलौकिक थरारपट) चित्रपट आहे. यातील कथानक सांगणे, म्हणजे त्यातील ‘थ्रील’ घालवणे.

१. चित्रपटाचे कथानक आणि चित्रपट जाणिवेने बघण्याची आवश्यकता
बारामुल्ला येथे अपहृत मुलांचे प्रकरण सोडवण्यासाठी आलेला पोलीस उपअधीक्षक रिदवान सय्यद एका घरात रहातो. सोबत पत्नी गुलनार, मुलगी नूरी आणि मुलगा अयान. मुलांचे अपहरण नेमके कोण करते ?, ती अचानक गायब कशी होतात ?, कशा पद्धतीने आतंकवाद स्वतःची पाळेमुळे फार पूर्वीपासून फैलावत आला आहे, हे आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे विश्वासघाताची न भरलेली जखम आपल्याला अस्वस्थ करते. हळूहळू उलगडत जाणारा हा चित्रपट पुष्कळ काही सांगून जातो. अक्षरश: मनावर बिंबवत जातो. त्यात कवड्या खेळण्याचा एक संदर्भ आहे, ज्याचे एक टोक अगदी शेवटच्या दृश्यामध्ये उलगडते. तिथे संवाद नाहीत, केवळ ‘कॅमेरा’ (ध्वनीचित्रक) बोलतो. चित्रपटाचा शेवट नावाच्या पाटीवर येऊन ‘कॅमेरा’ स्थिरावल्यावर होतो आणि ‘ब्लॅक आऊट’ (पूर्ण अंधार) होऊन दिग्दर्शकाचे नाव झळकते. चित्रपट हे कॅमेर्याला बोलते करणार्या दिग्दर्शकाचे माध्यम आहे, हे आदित्य सुहास जांभळे यांनी सार्थ करून दाखवले आहे !
चित्रपटातील प्रत्येकाच्या भूमिका छान झाल्या आहेत. पटकथा बंदिस्त आहे. काही नगण्य चुका आहेत, त्या सांगू गेल्यास रहस्योद्घाटन करावे लागेल. हा चित्रपट जाणिवेने बघण्याचा चित्रपट आहे, तो तसाच सर्वांनी पहावा. कथा, पटकथा, प्रसंग, संदर्भ सगळे काही बारकाईने पहाणे अत्यावश्यक आहे; खास करून ते फूल, केस कापणे आणि कवड्या खेळणे !

२. काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराच्या आघाताला न्याय देणे महत्त्वाचे !
वपुंच्या (सुप्रसिद्ध मराठी लेखक वसंत पुरुषोत्तम काळे) ‘बदली’ या कथेतील जनार्दन एकबोटे दामलेंना म्हणतो, ‘जिवंतपणी माणसावर जे संस्कार झालेले असतात, ते मेल्यावरसुद्धा माणसाची पाठ सोडत नाहीत !’; पण केवळ संस्कारच नव्हे, तर झालेले आघात, विश्वासघात आणि अन्यायही स्वतःची पाठ सोडत नाहीत.
‘पुष्कळ कालावधी लोटला’, या सबबीखाली साधी सुनावणीही नाकारणार्या आणि ‘इथे जा, तिथे जा’ सांगणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायमूर्तींनी हा चित्रपट पहावा. स्वत:ला न्यायाधीश म्हणवून घेणार्या प्रत्येक निर्लज्ज व्यक्तीने तो पहावा. काश्मीरमध्ये हिंदूंच्या नरसंहाराचे जे जिवंत साक्षीदार आहेत, त्यांच्या निदान साक्षी तरी नोंदवून घ्या. अन्यथा स्वत:स न्यायमूर्ती म्हणणे कितपत योग्य, असा विचार येऊन जातो. त्या वेळेस भारतभर इतरत्र कवड्या खेळत बसलेल्या समस्त हिंदूंनी आवाज उठवला असता, तर कदाचित् न्याय झाला असता.
गळ्यात कवड्यांची माळ घालून बेल-भंडारा उधळत वेळ रहाताच अन्यायाचे परिमार्जन केल्यासच ते होते. वेळ निघून गेली की, त्यास कवडीइतकेही मोल रहात नाही. राहिल्या, तर रहातील केवळ कथा, पटकथा, चित्रपट आणि वाट बघणे; कुणी तरी कुठल्या तरी डॉ. सप्रूला (एक काश्मिरी हिंदु पंडित) खेळातील कवड्या पोचवेल याची !
– श्री. प्रसन्न बर्वे, पणजी, गोवा. (११.११.२०२५)
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?