रात्र वैर्‍याची आहे, देशा, जागा रहा !

१२ निरपराध लोकांचा मृत्यू झाला, २४ जण घायाळ झाले आणि आकडा अजून वाढतच आहे. १० नोव्हेंबर २०२५ च्या रात्री भारताची राजधानी देहली वर्ष २०१४ नंतर प्रथमच इस्लामी आतंकवादी आक्रमणाने हादरली. हे आक्रमण करणारे इस्लामी आत्मघातकी आतंकवादी होते, हे आता सिद्ध झाले आहे आणि तरीही समाजमाध्यमांवर काही दळभद्री लोक ‘आतंकवादाला धर्म नसतो’, हाच नेहमीचा रटाळ राग आलापत आहेत.

१. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामागील भयावहता

एक गोष्ट नीट समजून घ्या, १० नोव्हेंबरला लाल किल्ल्याजवळ झालेला हा स्फोट कोणत्याही ‘लोन वुल्फ’ने (एका व्यक्तीने केलेले आक्रमण) केलेले आक्रमण नव्हते. ते एका अत्यंत नियोजनबद्ध रचलेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा केवळ एक भाग होते आणि हा कट रचणारे लोक उच्चशिक्षित डॉक्टर होते. हो, डॉक्टर, ज्यांचे काम जीव वाचवणे आहे, जीव घेणे नाही. डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. अदिल अहमद रादर, डॉ. शाहीन शाहीद या ‘जैश-ए-महंमद’च्या आतंकवाद्यांनी राजधानी देहलीमध्ये तब्बल २,९०० किलो स्फोटकांचा वापर करून साखळी स्फोट घडवून आणायचा कट रचला होता. आपल्या सुदैवाने अन्वेषण यंत्रणांनी तो कट उधळून लावला आणि स्फोटके जप्त केली; पण हा कट यशस्वी झाला असता, तर सहस्रोच काय लाखो निरपराध भारतीय त्यात मृत्यूमुखी पडले असते. जे १२ लोक १० नोव्हेंबरच्या आक्रमणात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे. ही देशाची फार मोठी हानी आहे, हेही खरे आहे; पण इस्लामी आतंकवाद्यांची योजना फार मोठी होती. केवळ स्फोटकेच नव्हे, तर या आठवड्यातच ‘रिसिन’ नावाच्या विषारी रसायनाचा वापर करून भारतावर जैविक आक्रमण करण्याचा कटही अन्वेषण यंत्रणांनी उघडकीला आणला.

लेखिका सौ. शेफाली वैद्य

२. हिंदूंना प्रसादामधून धोकादायक विष देण्याचा कट

आझाद सुलैमान शेख आणि महंमद सुहैल महंमद सलीम या उत्तरप्रदेशमधील २०  वर्षांच्या २ तरुणांना आतंकवादविरोधी पथकाने राजस्थानमध्ये अटक केली, तेव्हा त्यांच्याकडे दोन ग्लॉक पिस्तुले, एक बेरेटा, जिवंत काडतुसे आणि एरंडाच्या बियांचा ४ किलो गाळ सापडला, जो ‘रिसिन’ सिद्ध करण्यासाठी वापरले जातो आणि ‘रिसिन’ हे जगातील सर्वांत धोकादायक विषांपैकी एक आहे. ‘रिसिन’ हे एरंडाच्या बियांपासून सिद्ध करण्यात येणारे अत्यंत ‘टॉक्सिक’ (विषारी) आहे. ते श्वासातून आत गेले वा खाण्यातून पोटात गेले, तर माणसाचा मृत्यू होतो आणि त्यावर कोणतेही ज्ञात प्रतिविष उपलब्ध नाही. हे विष हिंदु मंदिरातून देण्यात येणार्‍या प्रसादामध्ये मिसळून लोकांना द्यायचा त्यांचा कट होता; पण सुदैवाने तो उघडकीला आला.

३. कथित मानवाधिकारवाले आणि बुद्धीजीवी यांचे तुणतुणे !

असे असूनही आज जेव्हा देहली रक्ताने माखलेली आहे, तेव्हा भारतातीलच काही देशद्रोही माणसे हातात मेणबत्त्या घेऊन ‘अमन का तमाशा’ (शांतीचे नाटक) करत आहेत, शांती, प्रेम, आणि सहअस्तित्वाच्या गप्पा मारत आहेत. आमच्या अन्वेषण यंत्रणा ज्यांनी रात्रंदिवस काम करून हा आतंकवादी कट उघडकीला आणला, त्यांच्यासाठी मात्र हे लोक कधीही मोर्चा वगैरे काढत नाहीत. निरपराध भारतीय नागरिक जेव्हा आतंकवादी आक्रमणात भरडले जातात, तेव्हा हे स्वघोषित मानवाधिकारवाले बुरख्यात दडून बसलेले असतात.

तब्बल २,९०० किलो स्फोटके काही मुसलमान डॉक्टरांनी जमवली होती, जी वापरली गेली असती, तर संपूर्ण राजधानी रक्ताने लाल झाली असती. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीचे आक्रमण किंवा मुंबई साखळी बाँबस्फोट यांपेक्षाही मोठा कट होता. हा कट उधळून लावल्यानंतर त्या डॉक्टरांपैकीच एकाच्या भावाने लाल किल्ल्यासमोर आत्मघातकी आक्रमण केले. १२ कुटुंबे उद्ध्वस्त झाली; इतके आतंकवादी पकडले, तरीही एक आतंकवादी अन्वेषण यंत्रणांच्या जाळ्यातून निसटला. एक लक्षात घ्या, ‘आपल्या सुरक्षायंत्रणांना प्रत्येक वेळी बरोबर असावे लागते; पण आतंकवाद्यांना केवळ एकच संधी पुरेशी असते. आपल्या यंत्रणांनी वेळेवर कारवाई केली नसती, तर आज देहलीमध्ये फार मोठा नरसंहार झाला असता.

तरीही अनेक बुद्धीजीवी गांडुळे वळवळतीलच, ‘या प्रकरणाला सांप्रदायिक रंग देऊ नका’, असे सांगत विव्हळतील. ते म्हणतील, ‘आतंकवादाला धर्म नसतो’, नसेलही; पण जगभरातील प्रत्येक आतंकवादी केवळ एकाच धर्माचा का असतो ? आजच्या परिस्थितीत कुणी ‘शांततेचा धर्म’ म्हणून इस्लामचे तुष्टीकरण करत असेल, ‘गंगा-जमुनी तहजीब’चे खोटे गाणे गात असेल, तर ती व्यक्ती निःसंशय खोटे बोलत आहे, हे लक्षात असू द्या.

रात्र वैर्‍याची आहे, देशा, जागा रहा !

– सौ. शेफाली वैद्य, प्रसिद्ध लेखिका, पुणे. (११.११.२०२५)