Shankhnad Mahotsav Delhi : देहलीत होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण देतांना डावीकडून श्री. वीरेंद्र मराठे, श्री. नारायण नाडकर्णी आणि श्री. धनंजय हर्षे

पणजी – ‘सनातन राष्ट्र’ स्थापनेचा उद्देश प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने १३ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भारत मंडपम्मधील सभागृह क्रमांक १२ मध्ये होणार्‍या या महोत्सवासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी उपस्थितीविषयी सकारात्मकता दर्शवली आहे. फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे मे २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सक्रीय उपस्थिती होती आणि गोवा शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा अन् अन्य प्रकारचे साहाय्य महोत्सवासाठी करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण देतांना सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे, साधक श्री. नारायण नाडकर्णी, श्री. धनंजय हर्षे आणि श्री. महावीर श्रीश्रीमाळ हे उपस्थित होते.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या मालिकेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यापूर्वी मे महिन्यात गोव्यात झालेल्या अशाच भव्य महोत्सवाला २३ देशांमधून ३० सहस्रांहून अधिक साधक आणि धर्मप्रेमी यांनी उपस्थिती लावली होती. देहलीतील या ३ दिवसांच्या महोत्सवात देशभरातील संत-महात्मे, धर्माचार्य, विद्वान, सामाजिक कार्यकर्ते आणि युवावर्ग सहभागी होणार आहेत. या वेळी सुरक्षा, संस्कार आणि शौर्य यांसारख्या विषयांवर विचारमंथन होईल. या महोत्सवासाठी श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, देहलीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा, महाराष्ट्रातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे संस्थापक श्री. उदय माहूरकर, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन आणि ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांची प्रमुख उपस्थिती असेल. यासमवेतच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचीही वंदनीय उपस्थिती लाभणार आहे.