‘Gen Z’ In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘जेन झी’चे आंदोलन : पाकचे ५ सहस्र सैनिक दाखल !

(जेन झी : वर्ष १९९६ ते वर्ष २०१० या कालावधीत जन्मलेली पिढी)

मुझफ्फराबाद – पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके – पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये) ‘जेन-झी’चे आंदोलन तीव्र झाले आहे. विद्यार्थ्यांचे गट त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने नुकतेच इस्लामाबादहून ५ सहस्र सैनिकांना विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पाठवले आहे. मीरपूर, मुझफ्फराबाद, रावलकोट यांसह ६ विद्यापिठांतील विद्यार्थी संघटना निलंबित करण्यात आल्या आहेत. ‘पीओके’मधील विद्यापिठांचे विद्यार्थी परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि शुल्कवाढ यांविरुद्ध आंदोलन करत आहेत. या आठवड्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘अवामी कृती समिती’(एएसी) पाठिंबा देत आहे. ‘एएसी’ हे व्यापारी, अधिवक्ता आणि इतर संघटना यांचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांचे घोषवाक्य ‘अभी नही तो कभी नही’ (आता नाही, तर कधी नाही) आहे. विद्यार्थी ‘पीओके’च्या सध्याच्या सरकारविरुद्ध निदर्शने करत आहेत. वर्ष १९४७ पासून पाकचे ‘पीओके’वर नियंत्रण आहे.