दिवाळी आली आणि गेली. तुळशीच्या विवाहापर्यंत घरोघरी रंगीबेरंगी आकाशदिवे रहातील. यंदाच्या वर्षी दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. पणत्या, रांगोळ्या, दिव्यांच्या माळा, फुले, फळे नि आकर्षक सजावटीची साधनसामुग्री, कपडे, साड्या, सुकामेवा, मिठाई, लाडू, चकल्या, करंजा, चिवडा आदींच्या ‘रेडिमेड’ (सिद्ध) खरेदीसाठी सर्व बाजारपेठा फुलल्या होत्या. अगदी सोन्या-चांदीच्या भावाने उच्चांक गाठला, तरीही सराफांच्या दुकानात तर आठवडाभर गर्दी होती. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांचा धूर आणि प्रचंड आवाजाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच नव्हे, तर राज्यातील लहान मोठी सर्व शहरे ४ दिवस दणाणून गेली होती. फटाक्यांच्या किमती प्रतिवर्षी वाढत आहेत आणि त्यांची खरेदीही त्याच वेगाने वाढत आहे.
लेखक : डॉ. सुकृत खांडेकर, ज्येष्ठ संपादक, मुंबई.

१. फटाके उत्पादकांपुढे शरणागती का ?
दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, दिव्यांचा सण, प्रकाशाचा उत्सव; पण प्रत्येक दिवाळीला फटाक्यांची दहशत वाढत आहे. या दहशतीचा त्रास प्रत्येक घरातील लहान मुलांना, वयस्कर लोकांना, पक्षी आणि प्राणी यांना होत आहे. प्रतिवर्षी फटाक्यांमुळे आगी लागून वित्त आणि प्राण हानी होत आहे. फटाक्यांमुळे अनेक जण घायाळ होत आहेत; पण त्याविषयी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष किंवा शासनकर्ते आणि प्रशासन चिडीचूप बसत आहे, याचेच आश्चर्य वाटते. देशाची राजधानी देहलीमध्ये गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ फटाक्यांना बंदी आहे, मग देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये शासनकर्ते आणि नोकरशहा फटाके उत्पादन ‘लॉबी’पुढे (दबावगट) का शरणागती पत्करत आहेत ? विषारी धूर ओकणार्या आणि कानठळ्या बसवत आवाज करणार्या फटाक्यांपासून राज्याला काय लाभ होतो, हे तरी एकदा सरकारने घोषित करावे.

२. फटाके फोडायला कारणे भरपूर
वाहतुकीच्या रस्त्यांवर, चौकाचौकांत, नाक्यानाक्यांवर काहीही घडले, तरी फटाके फोडणारे वीर दौडत येतात. होळी, दहिहंडी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, अशा सणासुदीला तेच तेच उत्साही लोक फटाक्यांच्या माळा रस्त्यावर लावतात. कुणाचा वाढदिवस, कुणाची विजयी मिरवणूक, गणपतीची आगमन मिरवणूक, गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक, क्रिकेट सामन्यातील विजय, अशी भरपूर कारणे फटाके फोडायला मिळतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तर ३-४ महिन्यांवर आल्या आहेत. मग उमदेवारांचे नि पुढार्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वांत आवाजी लक्ष वेधून घेणारे माध्यम म्हणजे फटाके. ‘झिंदाबाद’ घोषणा देत आणि बँड पथकापुढे फटाक्यांच्या माळा लावत नेत्यांचे स्वागत केल्याविना उत्साही कार्यकर्त्यांना चैन पडत नाही. अर्थात् जे फटाके उडवतात, त्याच्या खिशातून पैसे जात नसतात. फटाक्यांचे पैसे देणारे नेत्यांचे सगेसोयरे दुसरेच असतात.
३. कथित पर्यावरणप्रेमी संस्था कुठे असतात ?
फटाक्यांचा आवाज आणि प्रदूषण यांना विरोध करणार्यांची संख्या पुष्कळ अल्प असते. त्यामुळेच त्यांच्या विरोधाकडे पोलीस-प्रशासन दुर्लक्ष करत असते. गणेशोत्सवात डिजेमुळे (मोठे ध्वनीक्षेपक) कान बहिरे होऊ शकतात, तर दिवाळीत फटाक्यांच्या आवाजामुळे बहिरेपण, फुफ्फुस आणि श्वसन यांचे विकार होऊ शकतात. उठसूठ नव्या पिढीच्या भवितव्यासाठी रस्त्यावर येणार्या संघटना फटाक्यांचे आवाज आणि प्रदूषण यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत, असे कधी घडलेले नाही.

४. दिवाळीत ७ सहस्र ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा चुराडा
दिवाळीच्या दिवसांत मुंबईत लहानमोठ्या आगीच्या २०० हून अधिक घटना घडल्या. पोलीस नियंत्रण कक्षाचे दूरभाष रात्रभर वाजत होते. पोलीस नियंत्रण कक्ष लोकांनी केलेल्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्याला कळवतात; पण पुढे त्याचे काय होते, हे कुणालाच कळत नाही. पोलिसांनी तरी काय काय करायचे ? पोलिसांची गाडी निघून गेली की, पुन्हा मोठ्या आवाजाचे फटाके फोडायला प्रारंभ होतो. दिवाळीच्या ४ दिवसांत मुंबईच्या हवेतील प्रदूषणाने मर्यादा ओलांडली होती. त्यामागे फटाके हे एक प्रमुख कारण होते. देशात यंदाच्या दिवाळीत ७ सहस्र ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे फटाके फोडले गेले किंवा त्यांची राख झाली.
५. प्रदूषण करणार्यांवर कारवाई का नाही ?
ज्या देशात ८० कोटी लोकसंख्येला पंतप्रधान प्रतिमास ५ किलो धान्य विनामूल्य देतात, अनेक राज्यात लाडक्या बहिणींना प्रतिमास १२०० वा १५०० रुपये भाऊबीज सरकारी खजिन्यातून दिली जाते, त्या देशाला ७ सहस्र ५०० कोटी रुपयांचे फटाके फोडणे कसे काय परवडते ? ऐन दिवाळीत रॉकेट्स किंवा बाण हे निवासी इमारतीत वा टॉवर्समध्ये घरात घुसून तेथे आगी लागल्या आहेत. मग फटाक्यांवर नियंत्रण घालण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन आता कुणाच्या आदेशाची वाट पहात आहे. बहुसंख्य समाज हा शांत आहे आणि फटाक्याला विरोध करत नाही; म्हणून सरकारने आवाज अन् प्रदूषण निर्माण करणार्यांवर कोणती कारवाई करायची नाही का ?
६. फटाक्यांची दहशत कधी नियंत्रित होणार ?
दहिहंडी खेळात मनोरे बनवतांना कोसळून प्रतिवर्षी २०० गोविंदा घायाळ होतात. आता दिवाळीतही फटाक्यांमुळे तेवढेच घायाळ होत आहेत. फटाके फोडणारे निर्बंधाला जुमानत नाहीत. ज्यांच्या अंगावर फटाके उडतात त्यांची त्यांना भीती वाटत नाही. त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. गुन्हे नोंद झाले, तरी काहीही होणार नाही, अशी त्यांची मानसिकता बनलेली असते. घशाची खवखव आणि डोळ्यांची जळजळ निर्माण करणार्या फटाक्यांची दहशत कधी नियंत्रित होणार ?
७. संशोधन काय सांगते ?
अ. फटाक्यांमुळे हवेतील विषारी कण प्रदूषण पुष्कळच वाढते, विशेषतः दिवाळीच्या दिवशी.
आ. वाढलेले PM२.५ / PM १० (हवेतील अतीसूक्ष्म कण, जे मानवी शरिरासाठी हानीकारक असतात) आणि इतर धातूंची उपस्थिती आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करणारी आहे.
इ. ही वाढ साधारणतः थोड्या वेळेसाठी असली, तरी तिचा परिणाम (निरीक्षण आणि आरोग्य यांसाठी) दीर्घकालीन असू शकतो.
८. ध्वनीप्रदूषणाची आकडेवारी काय सांगते ?
अ. एका अभ्यासानुसार नवी देहलीमध्ये दिवाळीच्या काळात २४ घंट्यांतील PM२.५ ची वाढ १८२.२ इतकी नोंदवली गेली; जी भारतातील राष्ट्रीय मानकांपेक्षा (६०) तिप्पटीने अधिक आहे.
आ. दुसर्या अभ्यासात फटाक्यांमुळे PM२.५ आणि इतर PM१० यांची वाढ शास्त्रीय पद्धतीने आढळली. उदाहरणार्थ PM१० ची संख्या दिवाळीच्या काळात सरासरी ३८० इतकी नोंदवली गेली, जे दिवाळी पूर्वीच्या (१३०.३) तुलनेत ३ पट अधिक आहे.
इ. आणखी एका संशोधन अहवालानुसार भारतातील काही ठिकाणी दिवाळीच्या रात्री PM२.५ ची वाढ ८७५ टक्क्यांपर्यंत नोंदवली गेली आहे.
ई. एका अभ्यासात असेही स्पष्ट झाले की, फटाके फोडण्यामुळे दिवाळीच्या रात्री नवी देहलीमध्ये वा परिसरात PM२.५ ची पातळी फटाका फोडण्यापूर्वीच्या वरील स्तराच्या १६ पट एवढी वाढली होती.
(साभार : ‘इये मराठाचिये नगरी’चे संकेतस्थळ)
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !