RSS Shatabdi March : विषय ताणू नका, शांतता बैठक घ्या ! – कर्नाटक उच्च न्यायालय

  • कर्नाटक उच्च न्यायालयाचा दोन्ही पक्षांना सल्ला

  • चित्तापूर (कर्नाटक) येथील रा.स्व. संघाच्या पथसंचलनाला अनुमती नाकारण्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) : राज्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या कलबुर्गी (गुलबर्गा) मतदारसंघातील चित्तापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनास अनुमती नाकारल्याच्या प्रकरणावर नुकतीच कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात न्यायालयाने दोन्ही पक्षांना ‘हा विषय अधिक काळ ताणणे योग्य नाही. यावर शक्य तितक्या लवकर तोडगा काढा’, असा सल्ला दिला, तसेच ‘लवकरच शांतता बैठक घेऊन त्याची माहिती याचिकाकर्त्यांना कळवावी’, असे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आणि सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली.

संघाच्या स्थापनेच्या १०० व्या वर्षानिमित्त चित्तापूरमध्ये २ नोव्हेंबर या दिवशी पथसंचलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून कलबुर्गी जिल्हा संघ संयोजक अशोक पाटील यांनी स्थानिक प्रशासनाकडे अर्ज केला होता; मात्र त्याच दिवशी भीम आर्मी आणि दलित पँथर्स यांसारख्या इतर संघटनांनीही फेरी काढण्यासाठी अनुमती मागितली होती. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, हे कारण देत चित्तापूरच्या तहसीलदारांनी संघाच्या पथसंचलनास अनुमती नाकारली होती. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अशोक पाटील यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.