स्वतःच्या मातृभूमीत दुय्यम दर्जाचे नागरिक ठरलेले हिंदू !

शबरीमलाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र यांमध्ये रूपांतर करण्याच्या केरळ सरकारच्या योजनेमुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून भ्रष्टाचार, मंदिरांवरील राज्याचे नियंत्रण आणि सनातन धर्माला निर्माण झालेला धोका यांविषयी भक्तगण चिंता व्यक्त करत आहेत.

भारतात ‘लास व्हेगस’ सिद्ध करण्यासाठी प्रशासन सिद्ध आहे. ‘लास व्हेगस’ हे अमेरिकेतील शहर झगमगते रात्रीचे जीवन, कॅसिनो, जुगाराची केंद्रे, उपाहारगृहे आणि अर्थातच उंचावरील निवासी सदनिका, राजवाडे अन् बंगले यांसाठी जगभरात ओळखले जाते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारला भगवान अयप्पा प्रमुख देवता असलेल्या शबरीमला या पवित्र मंदिराचे तीर्थयात्रा आणि पर्यटन यांचे एकात्मिक केंद्र म्हणून रूपांतर करण्याची आशा आहे. २० सप्टेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेला ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम्’ (जी.ए.एस्.) हा कार्यक्रम ‘ऑपरेशन साबरी’ या उपक्रमाची प्रस्तावना होती.

१. ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम्’ कार्यक्रमाला केरळमधील लोकांची अल्प उपस्थिती

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम्’च्या पूर्वसंध्येला जगभरातील प्रतिनिधी पंपा नदीच्या नयनरम्य किनार्‍यावर पोचतील, असे म्हटले होते; परंतु केरळमधील क्वचितच म्हणजे केवळ ५०० लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यातील अर्ध्याहून अधिक प्रतिनिधी केरळच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमधील विविध सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी होते. तमिळनाडूच्या ‘हिंदू धर्मादाय आणि देणगी विभागा’चे द्रमुक पक्षाचे मंत्री पी.के. शेखर बाबू, एक शपथबद्ध नास्तिक आणि तमिळनाडू राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री पलानीवेल त्यागराजन असे एवढेच इतर राज्यातील प्रतिनिधी होते.

२. शबरीमला मंदिराविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा धर्मद्वेष्ट्या सरकारचा प्रयत्न

श्री. कुमार चेल्लपन

या कार्यक्रमात सिद्ध केलेल्या लिखाणाचे वाचन करणारे विजयन् यांना भगवद्गीतेतील श्लोकांचे पठण करणे कठीण जात होते. त्यांच्या सनातन धर्माविषयीच्या द्वेषाचा हा पुरावा होता. पूजेनंतर प्रतिदिन रात्री म्हटले ‘हरिवरासनम्’ हे स्तोत्र देवराजन या नास्तिक व्यक्तीने रचले आहे आणि येसूदास या ख्रिस्ती व्यक्तीने ते गायले आहे, असा दावाही त्यांनी केला; परंतु देवराजन अन् येसूदास यांच्या आगमनापूर्वी ‘हरिवरासनम्’ कसे गायले गेले, हे त्यांनी उघड केले नाही. एक धक्कादायक खुलासा करतांना ते म्हणाले, ‘अर्थुंकल येथील सेबॅस्टियन चर्चमधील सेंट सेबॅस्टियन हे अय्यप्पा यांचे जवळचे मित्र होते आणि तमिळनाडू अन् आंध्रप्रदेश या राज्यांतील सर्व भाविक या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रात प्रार्थना करतात.’ मुख्यमंत्र्यांनी केलेली आणखी एक चूक, म्हणजे भगवान अय्यप्पा यांना ‘मुसलमान मित्र’  असे म्हणून वर्णन करून मंदिराला जातीय सलोख्याचे केंद्र म्हणून चित्रित करण्याच्या प्रयत्न केला.

३. अंगमाली ते एरुमेली यांमधील रेल्वे मार्ग करण्यामागील छुपा हेतू

अंगमाली आणि एरुमेली यांधील रेल्वे मार्ग हा ‘सबरी रेल्वे’ म्हणून ओळखला जाईल, असा रेल्वे मार्ग सिद्ध करण्याच्या त्यांच्या ध्येयासह विजयन् यांनी या दाव्यांचा पाठपुरावा केला. पर्यावरणाशी निगडीत आपत्ती आणि पर्यावरणाचा होणारा र्‍हास यांमुळे हा रेल्वे मार्ग करण्याच्या निर्णयाविरुद्ध पर्यावरण तज्ञ अन् शास्त्रज्ञ यांनी चेतावणी दिली आहे. देशातील प्रमुख गुप्तहेर म्हणून ओळखले जाणारे महसूल गुप्तचर संचालनालयाचे माजी प्रमुख बी.व्ही. कुमार यांनी ‘अंगमाली-एरुमेली साबरी रेल्वे पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलात उगवलेल्या उच्च दर्जाच्या गांजाची वाहतूक कोची येथे केली जाईल’, असे सांगितले होते. कुमार यांनी त्यांच्या ऐतिहासिक कार्यकाळात राखीव जंगलांमधून पदभ्रमण केले होते आणि शबरीमलाच्या आसपासच्या राखीव जंगलांमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे त्यांना आढळून आले होते. उंच पर्वतरांगांमधून कोचीला गांजा पोचवण्याचा सर्वांत सुरक्षित मार्ग रेल्वेने आहे; कारण रस्त्याने त्याची वाहतूक केल्यास संबंधित अधिकारी तो जप्त करण्याची शक्यता आहे.

शबरीमला मंदिर

४. ‘शबरीमला मंदिराच्या माध्यमातून पैसे कमवू शकतो’, असे मुख्यमंत्र्यांचे विधान

‘या पवित्र मंदिराला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लाभ होईल आणि या विमानतळाचे काम लवकरच चालू होईल’, असे विजयन् यांनी सांगितले. भूसंपादनाची प्रक्रिया जोरात चालू आहे आणि राज्याच्या या विनंतीला केंद्र सरकार मान्यता देईल, अशी त्यांना आशा आहे. पर्यटन आणि तीर्थयात्रा यांचे केंद्र बनवण्यासाठी शबरीमला ‘मास्टर प्लॅन’ची (कृती आराखड्याची) कल्पना करण्यात आली आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शबरीमला मंदिर ३६५ दिवस खुले ठेवण्यासाठी मार्क्सवादी सरकारने पावले उचलली आहेत. ‘शबरीमला मंदिर हे एक खजिना आहे आणि जर मंदिराचे दरवाजे वर्षभर खुले ठेवले, तर आम्ही पैसे कमवू शकतो’, असे विजयन् यांनी वर्ष २०१७ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले होते. ‘जन्मभूमी’ या मल्याळम् दैनिकाने मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दुसर्‍या दिवशी ही प्रमुख बातमी प्रकाशित केली होती. ८ वर्षांनंतरही विजयन् किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांनी या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

५. सरकारच्या निर्णयाला स्वामी भार्गवराम यांचा विरोध !

थिरूवनंतपूरम येथील ‘श्री रामदास मिशन आश्रमा’चे एक संन्यासी स्वामी भार्गवराम यांनी शबरीमला मंदिर तीर्थयात्रा आणि पर्यटन यांचे केंद्र बनवण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. याविषयी ‘पी गुरु’ या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला ते म्हणाले, ‘‘यात्रेकरू ४१ दिवस कठोर व्रत पाळल्यानंतर शबरीमलाची यात्रा करतात. पर्यटनासाठी असे कोणतेही नियम नाहीत. एखाद्याला अंघोळ करण्याची किंवा मद्य आणि मांसाहारी पदार्थांपासून दूर रहाण्याची आवश्यकता नाही. पर्यटनामुळे मंदिराचे पावित्र्य खराब होईल आणि सरकारचे हे पाऊल चुकीच्या हेतूने आहे.’’

६. मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा नष्ट करणारे आणि मंदिरातील अर्पणाचा अवैध वापर करणारे केरळचे सरकार !

वर्ष २०१८ मध्ये शबरीमला मंदिराच्या गर्भगृहात मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्या प्रवेशाच्या विरोधात भाविकांनी आंदोलन केले. मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या विरोधात राज्यभर निदर्शने करणार्‍या सहस्रो भाविकांवर फौजदारी खटले प्रविष्ट करण्यात आले. असे असतांना पिनराई विजयन् यांच्या सरकारने महिला कार्यकर्त्यांना (ज्या सर्व माओवादी आणि शहरी नक्षलवादी होत्या) सशस्त्र पोलिसांच्या साहाय्याने मंदिर परिसरात प्रवेश करण्यास साहाय्य केले. या पवित्र मंदिराच्या शतकानुशतके जुन्या असलेल्या प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोठी भूमिका बजावली. अनेक दशकांपासून दुभत्या गायी म्हणून राजकारण्यांकडून शबरीमला मंदिराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्ष प्रतिवर्षी मंदिरात पूजा करणार्‍या लाखो भाविकांकडून मंदिराला मिळालेल्या सर्व भेटवस्तू फसवणूक करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहेत अन् मंदिराचा गैरलाभ घेत आहेत.

७. मंदिरातील उत्पन्नाचा ताळेबंद किंवा विवरणपत्र नाही !

मंदिरातून मिळणारे उत्पन्न कशा प्रकारे व्यय केले जात आहे, याविषयीचा तपशील देण्यास या पवित्र मंदिराचे पारंपरिक संरक्षक आणि पंडलम् पॅलेसचे प्रमुख नारायण वर्मा असाहाय्य होते. ते म्हणाले, ‘त्रावणकोर देवस्वम् मंडळ हुंडीमध्ये मिळालेले सर्व अर्पण आणि पैसे काढून घेते. ते भक्तांकडून किती रक्कम गोळा करतात, याचा तपशील त्रावणकोर देवस्वम् मंडळ उघड करत नाही आणि याविषयीचा कोणताही ताळेबंद किंवा आर्थिक विवरणपत्र ठेवले जात नाही.’

८. भगवान अय्यप्पा यांच्या मूर्तीच्या तोडफोडीच्या घटनेचा अहवाल प्रसिद्ध न करणारे कम्युनिस्ट पक्षाचे सरकार !

मे १९५० मध्ये शबरीमला मंदिराला आग लावण्यात आली आणि काही अज्ञात व्यक्तींनी भगवान अय्यप्पा यांच्या मूर्तीची तोडफोड केली. आग लागल्याच्या घटनेनंतर एक महिन्यानंतर अधिक काळाने २० जून १९५० या दिवशी जवळच्या पोलीस ठाण्यात ही बातमी पोचली. तत्कालीन पोलीस महासंचालक केशव मेनन यांच्या नेतृत्वाखालील विशेष अन्वेषण पथकाने ‘हा एक सुनियोजित कट होता’, हे वैज्ञानिक अन्वेषणाद्वारे सिद्ध केले आणि या कृत्यामागे असलेल्या व्यक्तींकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘मेनन यांनी सादर केलेला अहवाल सत्तेत आल्यानंतर प्रसिद्ध केला जाईल’, असे आश्वासन वर्ष १९५७ मध्ये सत्तेत आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने राज्यातील हिंदूंना दिले होते; पण निवडणुकांनंतर या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी माघार घेतली आणि याविषयी मौन बाळगले.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.

संपादकीय भूमिका

शबरीमला मंदिर अन् त्याच्या परिसराचा साम्यवादी सरकारकडून होत असलेला अपवापर रोखण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन हवे !