Karnataka Ban on Kadasiddeshwara Swamiji : पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या विजयपूर जिल्हा प्रवेशबंदीला हिंदु जनजागृती समितीचा विरोध

बंदी त्वरित मागे घेण्याची मागणी

पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

विजयपूर (कर्नाटक) – कर्नाटक सरकारने धार्मिक भावना दुखवल्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांना २ महिन्यांसाठी विजयपूर जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध केला आहे.

समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

१. समाज परिवर्तनासाठी योगदान देत असलेले पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी गेल्या २५ वर्षांपासून निःस्वार्थपणे समाजसेवा करत असून त्यांनी कोट्यवधी लोकांच्या हृदयात भक्ती, नैतिकता आणि सनातन संस्कृती यांचा दीप लावला आहे. त्यांच्यावरील ही बंदी सनातन गौरवशाली संत परंपरेचा अपमान आहे.

२. हा सरकारच्या अधिकाराचा गैरवापर असून संतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमण आहे.

३. एका बाजूला काँग्रेस सरकार सरकारी कार्यक्रमात कुराणचे पठण करते, तर दुसरीकडे कायद्याच्या चौकटीत राहून समाज परिवर्तनाचे कार्य करणार्‍या स्वामीजींवर बंदी लादते.

४. भारतात हिंदूंच्या एका संतांवर जिल्हा प्रवेशबंदी घातली जाऊ शकते; पण भारतातील कोणत्याही राज्यात किंवा जिल्ह्यात धर्मांतर करणार्‍या मिशनर्‍यांवर बंदी नाही, लव्ह जिहादच्या कृत्यांना बंदी नाही, दंगलखोरांवर बंदी नाही, मूर्ती तोडणार्‍यांवर बंदी नाही, गोमातेला पशूवधगृहात नेऊन मारण्यावर बंदी नाही. केवळ गोरक्षण, संस्कृतीरक्षण, धर्मरक्षण करणार्‍या हिंदूंच्या संतावर बंदी घातली जाते. आपण भारतात आहोत कि पाकिस्तानात ?

५. असदुद्दीन ओवैसी यांच्यासारखे लोक उघडपणे चिथावणीखोर भाषणे देतात; पण त्यांच्या नावाने कधीच बंदीचा आवाज ऐकू आला नाही, केवळ हिंदूंच्या संतांनाच लक्ष्य केले जात आहे.

काय आहे प्रकरण ?

अलीकडेच महाराष्ट्रातील जत तालुक्यातील बिळूरु गावात झालेल्या एका कार्यक्रमात बोलतांना पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी काही लिंगायत स्वामींवर टीका केली होती. ‘गेल्या २ महिन्यांपासून ‘मंदिरात जाऊ नका’, असा प्रचार केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्रय दिलेल्या लिंगायत मठाधिशांच्या संघटनेचे ‘कलाकार’ एकत्र येऊन राज्यभर ‘बसवा संस्कृती अभियान’ नावाचे नाटक करत आहेत. ‘मंदिरात देव नाही. घरातील देवाला नदीत टाका’, असे ते म्हणत आहेत. यांना मलाच अक्कल शिकवावी लागेल’, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यावरून त्यांना विजयपूर येथे प्रवेशबंदी करण्यात आली.