रावेत-नर्‍हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !

चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

(‘डी.पी.आर्.’ म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल, ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ म्हणजे उन्नत महामार्ग)

       पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील सातत्याने होणारी गंभीर वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. रावेत ते नर्‍हे या ३२ कि.मी.च्या ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी सिद्ध करण्यात आलेल्या ६ सहस्र कोटी रुपयांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (‘डी.पी.आर्.’ला) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संमती दिली असून लवकरच या प्रकल्पाच्या कामाला आरंभ होणार आहे.

पुणे येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे-शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि हडपसर-यवत उन्नत महामार्गाचे भूमीपूजन केले. या प्रसंगी रावेत-नर्‍हे एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या मंजुरीविषयीची माहिती देण्यात आली.

वाहतूक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल !

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणार्‍या वाहनांची मोठी संख्या आणि पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता, रावेत ते नर्‍हे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर तातडीने संमत करावा, अशी आग्रही मागणी भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी मार्च २०२६ मधील हिवाळी अधिवेशनात केली होती. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडे यासंदर्भात निरंतर पाठपुरावा केला होता. या कॉरिडॉरमुळे हिंजवडी आयटी पार्ककडे ये-जा करणार्‍या वाहनांचा प्रवास गतिमान होऊन दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास साहाय्य होईल.