पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !

३५० नाल्यांवर अतिक्रमणे होऊन नाले अरुंद

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड शहरात जुलै महिन्याच्या प्रारंभी मुसळधार पाऊस होऊन अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्या वेळी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ३५० ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे, तसेच काही ठिकाणी नाले अरुंद केल्याचे अथवा बुजवल्याचे निदर्शनास आले. आता या नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (उशिरा सुचलेले शहाणपण ! ही अतिक्रमणे कोणत्या समयमर्यादेपर्यंत काढली जाणार, हेही प्रशासनाने सांगावे ! – संपादक)

अशा सर्व ठिकाणांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन संबंधित अधिकार्‍यांना आयुक्तांकडून सूचना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले, ‘‘पावसाळ्यांमध्ये नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. कारणांचा शोध घेतला असता ही परिस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे अशा ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. भविष्यात नाल्यांमुळे पाणी तुंबणार नाही.’’

संपादकीय भूमिका

३५० नाल्यांवर अतिक्रमणे होऊ देणार्‍या महापालिकेतील संबंधितांना पदच्युतच केले पाहिजे !