नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !

नेपाळ सरकारचा मानचित्र (नकाशा) हटवण्याला विरोध

काठमांडू (नेपाळ) – नेपाळ सरकारने एक रुपयाच्या नाण्यावरून देशाचा नकाशा हटवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. या नकाशामध्ये भारताचे लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळचे असल्याचे दाखवले आहे. हा नकाशा नाण्यावरून हटवण्याची बातमी प्रसारित होताच त्याला विरोध चालू झाल्यानंतर सरकारने नेपाळ राष्ट्र बँकेला नव्या नाण्यामध्ये पूर्वीचा नकाशा कायम ठेवण्याचा आदेश दिला. यापूर्वी नव्या नाण्यावरील नकाशा हटवून तेथे बौद्ध मठ दाखवण्यात येणार होते.

अधिकार्‍यांच्या मते, हा नव्या नाण्याचा प्रस्ताव सध्याचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच बनवणे चालू झाले होते. याचा उद्देश नेपाळच्या चलनात देशाच्या विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशांना स्थान देणे, हा आहे.