Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची विनंती

न्यूयॉर्क (अमेरिका) – अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती बरीच पालटली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे, अशी विनंती भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत केली. पाकिस्तान अफगाणिस्तानवर सातत्याने हवाई आक्रमणे करत असतांना भारताने ही विनंती केली आहे.

१. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला अफगाणिस्तानशी चर्चा करण्यासाठी नवीन मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. तसेच अफगाणिस्तानात पाकने केलेल्या हवाई आक्रमणांही निषेध केला. अफगाणिस्तानसवमेतच्या व्यापार आणि वाहतूक यांवर बंधने लादल्याचा आरोपही केला आणि ती हटवण्याची मागणी केली.

२. अफगाणिस्तान चारही बाजूंनी भूमीने वेढलेला देश आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी तो दीर्घकाळापासून पाकिस्तानवर अवलंबून आहे; मात्र पाकिस्तान याच गोष्टीचा अपलाभ घेऊन अफगाणिस्तानवर दबाव आणत आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानची सीमा पूर्णपणे बंद केली आहे. यामुळे मालवाहतुकीच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या प्रवासावरही विपरीत परिणाम झाला आहे.