अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !

अमेरिकी संसदेत मांडण्यात आला नवीन कायदा

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत रहाणार्‍या खलिस्तानी आणि इतर देशांतील आतंकवादी यांचे रक्षण करण्यासाठी अमेरिका एक नवीन कायदा आणण्याच्या सिद्धतेत आहे. या कायद्यांतर्गत अमेरिकेत रहाणार्‍या कथित ‘राजकीय विरोधकां’ना आणि ‘कार्यकर्त्यां’ना घाबरवण्याचा किंवा धमकावण्याचा परदेशी सरकारांचा प्रयत्न गुन्ह्याच्या श्रेणीत आणला जाईल. याला ‘स्टॉप ट्रान्सनॅशनल रिप्रेशन ॲक्ट २०२६’ असे नाव देण्यात आले आहे. खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्यावरून भारतासमवेतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असतांना अमेरिका अशा प्रकारचा कायदा आणत आहे.

कुणी सादर केले हे विधेयक ?

हे विधेयक डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार डम शिफ आणि रिपब्लिकन पक्षाचे खासदार जॉन कर्टिस यांनी प्रायोजित केले आहे. जर हा कायदा बनला, तर अमेरिकेत पहिल्यांदाच सीमेपलीकडून होणार्‍या दमनाला एक विशेष गुन्हा मानला जाईल. यामुळे अमेरिकेच्या भूमीवर विरोध मोडून काढण्याच्या परदेशी प्रयत्नांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी न्याय विभाग आणि एफ्.बी.आय. यांचे अधिकारक्षेत्र विस्तारणार आहे.

या विधेयकानुसार दोषी आढळणार्‍या व्यक्तींना इतर गुन्ह्यांसाठी मिळणार्‍या शिक्षेव्यतिरिक्त अतिरिक्त १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि ९५ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

अमेरिकेने भारतावर आरोप केला आहे की, एका भारतीय हस्तकाने खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट रचला होता; परंतु वेळेतच तो उधळून लावला गेला; मात्र भारताने हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी चालू केली होती.

संपादकीय भूमिका

भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍यांना पाठीशी घालणारी अमेरिका भारताची कधीच मित्र होऊ शकत नाही, हे यातून पुन्हा स्पष्ट होते !