लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !

जंतरमंतरवरील हिंसाचारी आंदोलकांवरील लाठीमाराच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सर्वाेच्च न्यायालयाने अधिवक्त्यांना सुनावले

नवी देहली – आमचा वेळ वाया घालवू नका आणि स्वतःचाही वेळ वाया घालवू नका. आम्हाला लाठीमाराच्या व्हिडिओमध्ये अजिबात रस नाही. आमच्याकडे हे व्हिडिओ पहात बसण्यासाठी अजिबात वेळ नाही, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने जंतरमंतर येथे हिंसाचार करणार्‍या कॉकरोच जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांना सुनावले.

याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतांना सांगितले की, ‘विद्यार्थी नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षा, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’मधील (राष्ट्रीय परीक्षा संस्था) सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सार्वजनिक हिताच्या सूत्रांवर आंदोलन करत आहेत.’ या वेळी अधिवक्त्यांचे बोलणे मधेच थांबवत सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, ‘खूप खूप धन्यवाद!’ त्यानंतर अधिवक्त्यांनी न्यायालयात पोलिसांच्या अत्याचाराचे आणि लाठीमाराचे व्हिडिओ उपलब्ध असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर सरन्यायाधिशांनी व्हिडिओ पहाण्यास वेळ नसल्याचे सांगितले.

यापूर्वी देहली उच्च न्यायालयानेही या पोलीस कारवाईविरुद्धच्या अशाच एका याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. ‘न्यायालयाला या सर्व प्रकरणात उगाच ओढू नका’ असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

संपादकीय भूमिका

लाठीमाराच्या विरोधात न्यायालयात जाणारे ज्यांच्यावर लाठीमार झाला त्यांनी केलेल्या हिंसाचारावर का बोलत नाहीत ? त्यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या हानीची वसुली करण्याविषयी का बोलत नाहीत ?