आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !

सांगली पाटबंधारे विभागाची कर्नाटक शासनास विनंती

कृष्णा नदी

सांगली – महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात, तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत असून आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. ही माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, २० जुलै या दिवशी सकाळी ८ वाजता हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी ५२२.६० मीटर होती, तर आवक ३६ सहस्र ४०० घनफूट प्रतिसेकंद होती. बॅरेजमध्ये ३.९८ टी.एम्.सी. पाणीसाठा आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सून कालावधीत कृष्णा नदी प्रवाहित रहाण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत, अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१७ मीटर ते ५१७.५० मीटर पर्यंत राखण्याचीही विनंती करण्यात आली आहे.