‘मनाच्या रोगा’ला न्यायालयाची मान्यता !

‘स्वतःचे मन हे अनेक रोगांचे कारण असते’, असे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे स्वतःचे मन सुदृढ ठेवणे, हे आजच्या काळात पुष्कळ आवश्यक झाले आहे; पण मन सुदृढ ठेवण्यापेक्षा ते कलुषित आणि विचलित करण्याचे प्रयत्न सध्या होत आहेत अन् याला न्यायालयही मान्यता देत आहे, हे विशेष ! निमित्त आहे, नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘मना’चे श्लोक’ ! या चित्रपटामध्ये ‘मनवा’ आणि ‘श्लोक’ असे नायक अन् नायिका यांच्या पात्रांची नावे आहेत. यांची कथित प्रेमकहाणी किंवा जे काही दाखवले आहे, त्याला ‘मना’चे श्लोक’ म्हटले आहे.

१. मराठी भाषेच्या चिंधड्या उडवल्या जात असतांना ‘अपमान’ कि ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ महत्त्वाचे ?

एक क्षण धार्मिक विषय बाजूला ठेवूया. (खरेतर ठेवायला नको; पण तरीही)  ‘मनाचे श्लोक’ हा हिंदूंचा धार्मिक ग्रंथ आहे, संतांनी लिहिलेला आहे, असे एक क्षण बाजूला ठेवून त्याला ‘मराठी काव्यसंग्रह’ आहे, असे मानूया, तरी या मराठी काव्यसंग्रहाचा मान मराठी माणसाने ठेवायचा कि परप्रांतियांनी ?

श्री. संदीप शिंदे

नुकतेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला ‘अभिजात (समृद्ध) भाषे’चा दर्जा देऊन मराठी भाषेचा गौरव केला. सर्व मराठी भाषिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आणि मराठीजनांचा उर भरून आला; पण यानंतर मराठी भाषेचा सन्मान ठेवण्याचे, ती शुद्ध ठेवण्याचे आणि तिच्यावर होणारे आक्रमण रोखण्याचे दायित्व आपले (मराठी भाषिकांचे) वाढले आहे. या चित्रपटाच्या कथानकानुसार ‘मनवा’ आणि ‘श्लोक’ यांच्या प्रेमकहाणीच्या दृष्टीने या चित्रपटाचे नाव ‘मनवा’चा श्लोक’ असे एकेरी असायला हवे होते (कि या चित्रपटात अनेक ‘श्लोक’ नावाची मुले आहेत आणि ती एकाच ‘मनवा’ नावाच्या मुलीवर प्रेम करत असते, तर या चित्रपटाच्या नावामध्ये ‘मनवा’चे अनेक ‘श्लोक’ या अर्थाने ‘मनाचे श्लोक’ हे एक वेळ भाषिक व्याकरणानुसार असू शकले असते; पण असे काही नसतांना). एका मनवाचे एका श्लोकवरील प्रेम दाखवतांना त्या चित्रपटाचे ‘मनाचे श्लोक’ असे अनेकवचनी नाव ठेवले आहे. यातून मराठी चित्रपटसृष्टी, मराठी अभिनेते, अभिनेत्री,  दिग्दर्शक यांच्याकडून मराठी व्याकरणाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या आहेत, हे मराठीप्रेमी नागरिकांना पटते का ? मग इथे ‘मराठीचा अपमान’ कि ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ महत्त्वाचे ?

२. ‘मनाचे श्लोक’चे विडंबन चालू असतांना मराठीप्रेमी राजकीय पक्ष गप्प का ?

मागच्या महिन्यात महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा धोरण शालेय शिक्षणात लागू करतांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा  निर्णय  काय घेतला, तर ‘मराठी भाषेला संपवण्याचे षड्यंत्र’, असे म्हणत अनेक सिनेतारकांनी त्याला जोरदार विरोध करण्याचा तीव्र ‘अभिनय’ केला. इथे तर मराठी चित्रपटसृष्टीच मराठीला आणि तिच्या वाङ्मयाला संपवायला निघाली आहे, त्याचे काय ? बरं, या मराठी आंदोलनाला काही मराठीप्रेमी नेते, राजकीय पक्ष यांनी मोठे प्रमाणात उभारले (जर मराठी भाषेला संपवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर असे करायलाच हवे); पण या मराठी काव्यसंग्रहाचा अपमान करून मराठीची मोडतोड करत असतांना एकाही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने साधा निषेधही केला नाही. मग ‘मराठी प्रेम’ हे ‘राजकीय’ आहे, असे म्हणायचे का ?

३. सध्याच्या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीची पाताळयंत्री पद्धत

आता या विषयाचा धार्मिक अंगाने विचार करू. ‘मनाचे श्लोक’ या  समर्थ  रामदासस्वामी यांच्या ग्रंथ वाङ्मयांपैकी एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ. यातून आपल्या मनावर नियंत्रण कसे मिळवायला हवे, मन कसे असायला हवे, ते कसे असू नये, याचा बोध देणारे, तसेच आपण सर्वानी शालेय जीवनात या ग्रंथाचे बाळकडू घेतले आहे, असा नीतीमान बनवण्यासाठी आवश्यक ग्रंथ. या चित्रपटामध्ये या ग्रंथातील शिकवणीनुसार जर काही प्रसंग असते किंवा या शिकवणीचा प्रसार करणारा चित्रपट ठरला असता, तर या चित्रपटाचा प्रसार हिंदु समाजाने कोणताही ‘पी.आर्.’ (पब्लिक रिलेशन – जनसंपर्क अधिकारी) न लावता विनामूल्य केला असता. आता जेवढा पैसा या चित्रपटाने कमावला असता त्यापेक्षा अधिक कमाई या चित्रपटातून करता आली असती; पण नाही. आजकालचे दळभद्री मानसिकता बाळगणारे चित्रपट दिग्दर्शक / निर्माते / अभिनेते मंडळी चित्रपटातून कोणता ना कोणता वाद निर्माण करून त्याला वाममार्गाने प्रसिद्धी मिळवायची आणि परिणामी मग अधिक लोक चित्रपट पहायला येतील, अशी पाताळयंत्री पद्धत वापरून धंदा करत आहेत.

४. नेमका दोष कुणाचा राज्यघटनेचा कि न्यायालयाचा ?

हिंदूंनी चित्रपटाला विरोध केला, तर ‘हिंदू ‘असहिष्णू’ आणि चित्रपट निर्मात्यांचे ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात’, अशी बांग दिली जाते; पण भारतीय राज्यघटना आणि जगातील सर्वांत मोठी लोकशाही ज्या न्यायालयाचे आधारस्तंभ आहेत, ते न्यायालय ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’ला अधिक महत्त्व देते अन् त्याच राज्यघटनेतील ‘धार्मिक स्वातंत्र्या’ला नाकारते, म्हणजेच धार्मिक व्यक्तींची ‘अभिव्यक्ती’ अमान्य करते. मग हा दोष भारतीय राज्यघटनेचा कि ते ‘इंटरप्रिट’ (अर्थ लावणार्‍या) करणार्‍या न्यायालयाचा कि धर्मावर टीका करण्याच्या अधर्मीपणाला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ हे गोंडस नाव देणार्‍या अर्बन (शहरी) नक्षलवादी पुरोगाम्यांचा ? हे मराठी माणसाने शोधले पाहिजे.

५. ‘मना’चे श्लोक’ चित्रपट हा एक विरोधाभासच !

सर्वांत महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे ‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ अखिल मानवजातीला भेडसावणार्‍या समस्या, म्हणजे ‘मुलांवर संस्कार कसे करायचे’, ‘मुले ऐकतच नाहीत’, ‘मुले मोबाइल (भ्रमणभाष) सोडतच नाहीत’, यांवर प्रभावी उपाय सांगणारा आहे. समर्थांनी ३५० वर्षांपूर्वी द्रष्टेपणाने लिहिलेला ग्रंथ मुलांवर संस्कार करण्यासाठी आदर्श आहे. याचे पारायण प्रत्येक घरात होण्याऐवजी त्याची टिंगल एका थातूरमातूर चित्रपटाच्या नावासाठी करणे, हा या ग्रंथाचाच नव्हे, तर समर्थ रामदासस्वामी आणि संत वाङ्मय यांचा अपमान आहे. या चित्रपटात जे मांडले गेले आहे, ते ‘मनाचे श्लोक’ या ग्रंथातील शिकवणीत अजिबात नाही. उलट ‘मनाचे श्लोक’ मनाचा संयम शिकवतात, तर हा चित्रपट मनाला अनिर्बंध वागण्याचा संदेश देतो, हाही एक विरोधाभासच आहे.

दुर्दैवाने मुंबई उच्च न्यायालयाची चित्रपटाला अनुमती !

६. ….तर यावर वैध मार्गाने वर्मी घाव हवा !

आज हदिया आणि इस्माईल या दोघांची प्रेमकथा दाखवणारा ‘हदिस’ नावाचा चित्रपट येऊ शकतो का ? किंवा अजीबुल आणि आन या दोघांची प्रेमकथा सांगणारा ‘अजान’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो का ? याला चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अनुमती देऊ शकते का ? याला सरकार मान्यता देऊ शकते का ? याला न्यायालय मान्यता देऊ शकते का ? हे सोडून द्या, याला इस्लामला मानणारे, मान्यता देणे सोडा, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, याचा साधा विचार करा. तुम्हाला ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) आठवेल. अमरावतीच्या एका डॉक्टरचे ‘सर तन से जुदा’ झाले, ते करणारे ‘सहिष्णू’ होते आणि हिंदूंनी ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाला विरोध करायचा म्हटले, तर ते ‘असहिष्णू’, ‘राज्यघटनाविरोधी’, ‘ब्राह्मणी’ ठरतात. आता तरी हिंदु जागे होणार का ? आज ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाला सोडून दिले, तर उद्या ‘ज्ञानेश्वरी’, ‘गाथा’, ‘भगवद्गीता’ या नावांनीही चित्रपट येतील आणि आपली पुढची पिढी ‘असे आहेत का, हे आपले धर्मग्रंथ ?’, असे म्हणून तुम्हालाच विचारतील ! त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा आताच यावर वैध मार्गाने वर्मी घाव घातला पाहिजे.

७. हिंदूंनी करावयाची निर्णायक कृती !

दुर्दैवाने मुंबई उच्च न्यायालयानेही या चित्रपटाला अनुमती दिली. केवळ दिली नाही, तर याचिकादारांना सुनावतांना ‘जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।। (मनाचे श्लोक, श्लोक २)’, असा समर्थांचा उपदेशही केला. चला तर मग, या उपदेशाला धरूनच जे ‘निंद्य’ आहे, ते म्हणजे हा चित्रपट बघणे सोडून देऊया, म्हणजे त्याच्यावर बहिष्कार घालूया आणि ‘वंद्य’ अशा ‘मनाच्या श्लोकां’चे घरोघरी पारायण करूया. (११.१०.२०२५)

– श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.