Lulu Deal : आंध्रप्रदेशाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ‘लुलू ग्रुप’ला दिलेल्या भूमीवर उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा संताप

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (चौकटीत)

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश राज्यातील आघाडी सरकारमधील एक पक्ष असणार्‍या जनसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत लुलू ग्रुपला खुश करण्यासाठी नियम वाकवणार्‍यांना जाब विचारला. जनसेनेचेच मंत्री नदेंडला मनोहर यांनीही या सवलतींविषयी अधिकार्‍यांकडे स्पष्टीकरण मागितले.

लुलू ग्रूप अन्न प्रक्रिया करणार कि गोहत्या करणारा पशूवधगृह उभारणार ? – पवन कल्याण यांचा प्रश्न

पवन कल्याण यांनी विचारले, ‘लुलूचे उपआस्थापन ‘फेअर एक्सपोर्ट्स’ मल्लवल्ली (जिल्हा कृष्णा) येथे उभारत असलेल्या ‘फूड पार्क’मध्ये नेमके काय करणार आहे ?’ सरकारने या प्रकल्पासाठी ७.४८ एकर भूमी दिली आहे. अधिकार्‍यांनी ‘अन्न प्रक्रिया’ एवढेच अस्पष्ट उत्तर दिल्यावर पवन कल्याण म्हणाले, ‘त्याचा अर्थ काय ? भाज्या-फळे यांवर प्रक्रिया करणार कि गोहत्या करून मांस निर्यात करणार ?’

या प्रश्नामुळे मंत्रीमंडळातील वातावरण अधिकच ताणले गेले.

गोहत्या करण्यास अनुमती नाही ! – मुख्यमंत्री नायडू

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

मुख्यमंत्री नायडू यांनी हस्तक्षेप करून सांगितले की, गोहत्या करण्याची कोणतीही अनुमती देण्यात आलेली नाही. केवळ अन्न प्रक्रिया केंद्राला मान्यता दिली आहे.

तरीही पवन कल्याण यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत विचारले की, सरकार इतके उतावळे का झाले आहे कि जणू लुलू आपल्यावर उपकार करत आहे ?

आंध्रप्रदेशातील तरुणांना रोजगार मिळणार नसेल, तर भूमी देण्यात अर्थ काय ? परतावा न मिळता आपली संपत्ती देऊ नये.

भाडेपट्टी आणि रोजगार यांच्या अटींवर शंका

मंत्री मनोहर यांनी निदर्शनास आणले की, सरकारने भाडेपट्टी रक्कम प्रत्येक ५ वर्षांनी केवळ ५ टक्के वाढवण्याचे मान्य केले आहे; पण नियमांनुसार ती ३ वर्षांनी १० टक्के वाढवावी लागते. यावर अधिकार्‍यांनी सांगितले, ‘लुलू रोजगार निर्माण करेल म्हणून सवलत दिली गेली.’ यावर पवन कल्याण यांनी विचारले की, लुलूला विजयवाडा आणि विशाखापट्टणम् येथे कोणत्या अटींवर भूमी देण्यात आली ? सरकारी भूमी मिळूनही ते अटी ठरवतात, हे योग्य आहे का ? लुलूच्या मॉलमधील दुकाने ३ वर्षांनी भाडे वाढवतात; मग सरकारने १० वर्षे थांबावे का ? दोन वेगवेगळे नियम असू नयेत.

काय आहे लुलू ग्रूप ?

युसुफ अली यांनी लुलू ग्रूप इंटरनॅशनलची स्थापना केली आणि ते हे ग्रुपचे नेतृत्व करतात. लुलू ग्रूप जगभरात हायपरमार्केट्स, मॉल्स (व्यापारी संकुल) आणि रिटेल  व्यवसाय करते.