
९.१०.२०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘पू. दातेआजींची शारीरिक स्थिती, प.पू. गुरुदेवांनी पू. आजींसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय चालू केल्यावर त्यांच्यात झालेली सुधारणा, ‘प्राणशक्तीवहनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाय म्हणून नामजप शोधणे आणि तो करणे’ अन् यासंदर्भातील अध्यात्मशास्त्र’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.
(भाग २)

२. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेली सूत्रे
२ अ. ‘मृत्यूलाही परत पाठवून पू. आजींना जिवंत ठेवणे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कालचक्र उलटे फिरवल्याचे स्थूल उदाहरण आहे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे : गुरुदेव, मला असे वाटले की, तुम्ही कालचक्राला उलटे फिरवत आहात. एकदा मी तुमच्या समवेत सेवा करत असतांना तुम्ही मला सांगितले होते, ‘‘प.पू. भक्तराज महाराज यांनी मला ‘श्रीराम जयराम जय जय राम ।’, हा जप दिला. त्याऐवजी ‘ॐ नमः शिवाय ।’, हा जप दिला असता, तर चांगले झाले असते. माझ्यासाठी काही कार्य राहिले नसते. सर्व लय करणेच राहिले असते. आता मला सर्व चक्र उलटे फिरवून कलियुगापासून द्वापरयुगापर्यंत आणि द्वापरयुगापासून त्रेतायुगापर्यंत घेऊन जायचे आहे.’’
आम्हा सर्व साधकांचा अनुभव आहे की, तुम्ही आमच्यावरचे कितीतरी काळ (मृत्यूची संकटे) दूर केले आणि आमचे मृत्यूपासून रक्षण केले; पण समष्टी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्थुलातून कालचक्र आता जे उलट होत आहे, ते सगुण रूपातून तुम्ही आम्हाला सांगत आहात. ‘मृत्यूला पुन्हा परत पाठवून तुम्ही काळाला (धर्माला किंवा जिवाला) पुन्हा तिथे स्थापन करत आहात’, असे मी अनुभवले आणि मला तुमचे ते वाक्य आठवले, ‘मला सर्व चक्रे उलट फिरवायची आहेत’, तर ‘मृत्यूलाही परत पाठवून पू. आजींना जिवंत ठेवणे’, हे त्याचे स्थूल उदाहरण आहे’, असे मला वाटले.

२ आ. ‘पू. आजींवर नामजपादी उपाय होत असतांना त्यांचा परिणाम हिंदूंवरही होऊन त्यांची भावभक्ती जागृत होत आहे’, असे वाटले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : कालचक्र उलटे फिरवले, म्हणजे कोणत्या प्रकारे उलटे फिरवले आहे ?
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे : ‘ज्याप्रमाणे मृत्यूमुळे पू. आजींच्या चक्राचा लय होत होता, त्याप्रमाणे धर्म निर्जीव होत होता. हिंदू निद्रिस्त होत होते; पण ज्याप्रमाणे आता हिंदू जागृत होत आहेत आणि धर्माची पुनर्स्थापना होत आहे, त्याप्रमाणे पू. आजींचा मृत्यू टळून त्यांच्यात पुन्हा चैतन्य पुनर्स्थापित होत आहे’, असे मला वाटले. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या नियमानुसार हिंदू भाव-भक्तीच्या दृष्टीकोनातून मृत झाले होते. पू. आजींच्या माध्यमातून समष्टी अनाहतचक्र जागृत होऊन हिंदूंची धर्म आणि ईश्वर यांच्याप्रती भावभक्ती जागृत होत आहे’, असे मला वाटले.
‘जेव्हा मिरज आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमांत पूर्वी आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले अन् आताही होतात, त्याचा परिणाम सर्वत्र होतो’, असा भाव आम्ही ठेवतो. त्यामुळे ‘इथे जे उपाय होत आहेत, त्याचा साधकांवर जसा परिणाम होतो, तसा हिंदु राष्ट्रावरही होत आहे’, असा भाव मी ठेवला होता.
३. आपत्काळात वैद्य आणि औषधे उपलब्ध नसतांना रुग्णाची केवळ सप्तचक्रे नव्हेत, तर शरिरात कुठेही असलेला अडथळा शोधून तो दूर करणे आवश्यक आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आधी माझ्या मनात विचार होता, ‘कुंडलिनीचक्रांमधून प्राणशक्तीचे वहन वर-खाली होत असते. त्यामुळे कुठल्या तरी एका चक्रात अडथळा आहे. अनाहतचक्रात अडथळा आहे, तर हृदयाची समस्या आहे.’ आता माझ्या मनात विचार आला की, ‘केवळ चक्रच नाही, तर शरिरात जिथे जिथे प्राणशक्ती जाते, त्या सर्व ठिकाणी अडथळा असू शकतो. तो अडथळा आपल्याला शोधायचा आहे आणि दूर करायला शिकायचे आहे.’ त्यासाठी जेव्हा मी पू. आजींच्या पायापासून वरपर्यंत शरिरापासून १ – २ इंच अंतरावर न्यास केला, तेव्हा त्या भागात कुठेही अडथळा नव्हता. त्यांचे अनाहतचक्र, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र यांठिकाणी अडथळा होता, म्हणजे तेथील प्राणशक्तीवहनात अडथळा होता. या विधानाचा संबंध कुंडलिनीचक्र आणि प्राणशक्तीवहन संस्था यांच्याशी आहे.
मी व्यष्टी आणि समष्टी यांविषयी विचार केला नाही. माझ्या मनात काय येत होते ? आता आपत्काळ येणार. पुष्कळ ठिकाणी असे आजार होतील. उपाय करण्यासाठी वैद्य आणि औषधे उपलब्ध नसतील. त्या वेळी ‘अशी कोणती पद्धत आपण वापरू शकतो ?’,
या दृष्टीने मी संशोधन चालू केले आणि आता माझ्या लक्षात आले की, शरिरात कुठेही, म्हणजे हाताच्या एखाद्या बोटात जरी अडथळा आला, तर त्यामुळे पूर्ण हातात शक्तीवहन होऊ शकत नाही. हा अडथळा दूर करण्यासाठी त्या बोटालाच शक्ती द्यावी लागेल. आताचा माझा जो अभ्यास आहे, तो राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात आहे, असे नाही, तर तो व्यक्तीगत रूपात आहे. तुम्ही तर फार चांगला विचार केला. याचा मी पुढे विचार करीन.
एक तर लक्षात आले की, कधी रुग्ण गंभीर असल्यास केवळ सप्तचक्रेच नव्हेत, तर ‘शरिरात आणखी कुठे अडथळा जाणवतो ?’, तिथे आपल्याला न्यास करायचा आहे. न्यास करतांना आपले बोट किंवा हात रुग्णाच्या शरिराला न चिकटवता १ – २ इंच दूर ठेवून न्यास करायचा आहे.
४. रुग्णाच्या सप्तचक्रांवर उपाय करून तितकासा लाभ होत नसून अडथळा असलेल्या शरिराच्या भागासाठी उपाय केल्यास लाभ होतो !
सद्गुरु सत्यवान कदम : पूर्वी तुम्ही आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायचात, त्या वेळी तुमच्या समवेत मीही उपाय करायचो. तुम्ही आम्हाला उपाय करायला शिकवले. आम्ही शरिरातील सप्तचक्रांनुसार उपाय करत होतो आणि चक्रात काही अडथळा असल्यास तो दूर करत होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : त्या वेळी आपल्याला वाटत होते की, चक्रावर उपाय केल्यावर त्या भागातील सर्व अडथळे दूर होतील. आता लक्षात आले की, चक्रावर उपाय करून इतका लाभ होत नाही. जिथे अडथळा आहे, तिथेच उपाय केले, तर आपली थोडीशी ऊर्जा कार्य करू शकते.
सद्गुरु सत्यवान कदम : आता यातून शिकायला मिळाले.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींच्या पायावर न्यास केल्यावर त्यांच्या पायाची हालचाल होण्याचे कारण !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे : जेव्हा तुम्ही प्रारंभी पू. आजींच्या पायावर न्यास करत होता, तेव्हा Deep plantar reflex प्रमाणे पू. आजींच्या पायाच्या बोटांची हालचाल झाली. Deep plantar या उपकरणाचा रुग्णाच्या तळपायाला स्थुलातून स्पर्श केल्यावर त्याची बोटे आणि अंगठा यांची हालचाल होते; पण आता तुम्ही पू. आजींच्या पायांवर दूरून केवळ न्यास केला, तर त्यांच्या पायांच्या बोटांची हालचाल झाली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तिथून शक्ती जाते, त्यामुळे तसे होते. तुम्ही पाहू शकता की, आताही पू. आजींचा पाय हलत आहे.
सद्गुरु सत्यवान कदम : तुम्ही येण्यापूर्वी पू. आजींची काहीच हालचाल होत नव्हती; पण तुम्ही आल्यावर त्यांची थोडी हालचाल चालू झाली. त्यांच्या श्वासाची गती थोडी वाढली. त्यांचे हात हलतांना दिसले. तुमच्या अस्तित्वाने असे झाले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. अस्तित्वातून त्यांना प्राणशक्ती मिळते आणि त्यांची हालचाल होते. जिथे अडथळा आहे, त्या ठिकाणी हालचाल होते. जिथे अडथळा नाही, तिथे होत नाही. त्यामुळे आपल्याला अडथळ्याचे निदानही होते. जिथे हालचाल आहे, उदा. हाताची हालचाल होत असेल, तर आपल्याला उपाय करण्यासाठी हाताचे ठिकाण मिळाले आहे.
पू. प्रदीप खेमका : गुरुदेव, ‘केवळ उपाय करून अडथळे दूर होतात आणि शरिराची हालचाल चालू होते’, हे अद्भुत आणि पुष्कळ आश्चर्यकारक वाटले. मला पुष्कळ शिकायला मिळाले. तुम्ही प्रत्येक क्षणी शिकवत आहात.
सद्गुरु नंदकुमार जाधव : गुरुदेव, तुम्ही जेव्हा बोलत होता, तेव्हा पू. आजींची हालचाल अधिक प्रमाणात होऊ लागली. ‘तुमच्या शब्दांतून जे चैतन्य प्रक्षेपित होते, त्याचा तो परिणाम आहे’, असे मला वाटले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो. हे माझ्याही लक्षात आले नाही. छान झाले ! तुमच्याकडून शिकायला मिळाले.
६. ‘अक्षराच्या माध्यमातून उपाय करणे’, म्हणजे स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाणे होय !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपल्यात जी प्राणशक्ती आहे, तिला अंक आणि अक्षर यांचे साहाय्य मिळते.
सद्गुरु नीलेश सिंगबाळ : शब्दांच्या तुलनेत अंक सूक्ष्म आहेत कि अक्षर सूक्ष्म आहे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : शब्दांच्या तुलनेत अक्षर सूक्ष्म आहे आणि अंक अधिक सूक्ष्म आहेत. देवतांची नावे म्हणजे शब्द आहेत. आपण शब्दांकडून अक्षरांकडे, म्हणजे स्थुलाकडून आणखी सूक्ष्माकडे गेलो. आपण अक्षरापर्यंत पोचलो आणि अक्षराच्या माध्यमातून उपाय चालू केले.
७. सात्त्विक आणि समष्टीसाठी काहीतरी करू इच्छिणार्यांसाठीच आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून त्यांना साहाय्य करावे !
पू. अशोक पात्रीकर : आम्ही अध्यात्मप्रसार करतांना सांगतो की, आम्हा सर्वांना गुरुदेवांनी ‘डॉक्टर’ बनवले आहे. प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय करण्यास शिकवून त्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाला डॉक्टरच केले आहे ना ? स्वतःचे अडथळे स्वतःच शोधा आणि उपाय करा.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो; पण त्या वेळी ‘उपाय करणार्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी किती असायला पाहिजे ? कुणी कोणावर उपाय करायचे ?’, याचाही आपल्याला विचार करायचा आहे. जो सात्त्विक आहे, समष्टीसाठी काहीतरी करणारा आहे किंवा करायची इच्छा आहे, त्यालाच साहाय्य करावे. नाहीतर देव आपल्याला साहाय्य करणार नाही. आपल्या शक्तीने काहीही होत नाही. ईश्वराच्या आशीर्वादाने होते. जगात असे कुठेच शिकायला मिळणार नाही.
(क्रमशः)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/965797.html
| सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !