दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांतील एकूण १३ गावांमध्ये वृक्षतोड करण्यास बंदी

दोन्ही तालुक्यांतील एकूण २५ गावांचा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रा’त समावेश

 सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या जनहित याचिका क्र. १९८/२०१४ आणि १७९/ २०१२ यांच्या अनुषंगाने ५ डिसेंबर २०१८ आणि २२ मार्च २०२४ मध्ये दिलेल्या आदेशानुसार दोडामार्ग अन् सावंतवाडी या तालुक्यांतील एकूण १३ गावांमध्ये वृक्षतोड करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सावंतवाडी-दोडामार्ग विशेष कृती दल समितीचे (‘टास्क फोर्स’चे) सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे.

पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, नवी देहली यांच्याकडील २२ एप्रिल २०२५ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारत सरकारच्या  प्रस्तावित अधिसूचनेमध्ये दोन्ही तालुक्यांतील एकूण २५ गावांचा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रा’मध्ये (इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये) समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर दिलेल्या आदेशानुसार अवैधरित्या केल्या जाणार्‍या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी ‘सावंतवाडी दोडामार्ग टास्क फोर्स समिती’ स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये महसूल, वन आणि पोलीस या विभागांतील अधिकार्‍यांचा समावेश आहे. सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी या समितीचे अध्यक्ष असून सदस्य सचिवपदी साहाय्यक वनसंरक्षक आहेत. या समितीच्या मासिक बैठकीत वृक्षतोड करण्यास बंदी असलेल्या क्षेत्रात केलेली कार्यवाही, प्रचार-प्रसिद्धी आणि  प्राप्त तक्रारी यांच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही यांचा प्रतिमहा आढावा घेतला जातो.

वन विभागाचे जनतेला आवाहन !

दोडामार्ग तालुक्यात कुठेही खासगी मालकी किंवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होतांना दिसल्यास जनतेने गावातील पोलीस पाटील, वनरक्षक, तलाठी यांपैकी कुणालाही तातडीने कळवावे, जेणेकरून पुढील कार्यवाही करणे सोपे झाईल. अवैधरित्या वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास sdtfsawantwadi@ gmail.com या ई मेलवर तक्रार नोंद करावी, तसेच वन विभागाच्या सावंतवाडी कार्यालयात ०२३६३-२७२००५ दूरध्वनीद्वारे तक्रार नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.