Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश

ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका

AI निर्मित चित्र

नोएडा (उत्तरप्रदेश) – राज्यातील गौतम बुद्ध नगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ४ वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणात येथील केंद्रीय विहार २ मधील ‘रेसिंडट वेलफेअर असोसिएशन’ने एक लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश दिला. या मुलीला झालेल्या जखमा, तिला या आक्रमणामुळे झालेला मानसिक त्रास हे लक्षात घेऊन आयोगाने हा आदेश दिला. तसेच कायदेशीर खर्चाची भरपाई म्हणून अतिरिक्त ५ सहस्र रुपये देण्याचाही आदेश दिला.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ४ वर्षांच्या मुलीवर रेसिडंट वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यालयाच्या मागे असलेल्या बागेत भटक्या कुत्र्यांनी आक्रमण केले. रस्त्यावरुन जाणार्‍या एका माणसाने या मुलीला वाचवले; मात्र यात मुलीच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या. तक्रारदारांनी असेही म्हटले की, हे पहिले आक्रमण नव्हते. याआधीही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, तसेच घरकाम करणार्‍या महिला, नोकरदार पुरुष, तरुण या सगळ्यांवर भटक्या कुत्र्यांनी आक्रमणे केली आहेत.

संपादकीय भूमिका

भटक्या कुत्र्यांना पकडून आश्रयगृहात ठेवण्याचा सर्वाेच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतांना त्यावर त्वरित कार्यवाही का होत नाही, याचा सरकारांनी विचार केला पाहिजे !