CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार  

‘कॉकरोच जनता पक्षा’च्या हिंसक मोर्चावरील कारवाईच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका

नवी देहली – ‘कॉकरोच जनता पक्षा’ने २० जुलै या दिवशी जंतरमंतरवरून संसदेकडे मोर्चा काढला होता. त्या वेळी हिंसाचार झाल्याने पोलिसांनी लाठीमार करून आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून मोर्चा संसदेपासून १०० मीटर अंतरावर रोखला होता. या हिंसाचारात ११५ हून अधिक पोलीस आणि कार्यकर्ते घायाळ झाले. या लाठीमाराच्या प्रकरणावरून देहली उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. ‘या सगळ्यात न्यायालयाला ओढू नका. उद्या याचिका सुनावणीसाठी घेण्यात येईल’, असे म्हणत न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्याची मागणी फेटाळली.

पोलिसांकडून ५ गुन्हे नोंद

या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी ५ गुन्हे नोंदवले आहेत. कनॉट प्लेस, पार्लमेंट स्ट्रीटसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये हिंसाचार, दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी यांचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही आणि व्हिडिओ यांद्वारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांच्या कारवाईवरून न्यायालयात जाणारे पोलिसांवर दगडफेक करणारे, त्यांच्या गाड्यांची तोडफोड करणारे, पोलिसांचा पाठलाग करून त्यांना तुडवणारे, यांच्यावर कारवाई होण्यासाठी न्यायालयात जात नाहीत, हे लक्षात घ्या !