नागपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. श्रीकांत रामचंद्र पाध्ये (वय ७४ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनापूर्वी अन् नंतर जाणवलेली सूत्रे !

१५.९.२०२५ या दिवशी नागपूर येथील श्रीकांत पाध्ये (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि कुटुंबियांना त्यांच्या निधनापूर्वी अन् नंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. श्रीमती अंजली श्रीकांत पाध्ये (कै. श्रीकांत पाध्ये यांची पत्नी, वय ६९ वर्षे), नागपूर

१ अ. ‘माझे यजमान श्रीकांत पाध्ये हे प्रेमळ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय होते.

१ आ. स्वेच्छानिवृत्ती घेऊन सेवा करणे : वर्ष १९९८ मध्ये यजमानांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली गुरुकृपायोगानुसार साधना चालू केली. वर्ष २००० मध्ये ते ए.जी. ऑफिसमध्ये (महालेखाकार कार्यालयात) ‘ऑडिट ऑफिसर’ या पदावर असतांना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृृत्तीचे कारण विचारल्यावर ते म्हणायचे, ‘‘निवृत्तीचे वय झाल्यावर सेवा करण्यासाठी माझी प्रकृती चांगली राहील कि नाही ?’, हे मी सांगू शकत नाही; म्हणून आताच सेवा चालू करतो.’’ ते महाराष्ट्रातील चंद्रपूर, बुलढाणा, जळगाव आणि अमरावती, तसेच छत्तीसगढ राज्य येथे अध्यात्मप्रसारासाठी गेले होते.

१ इ. रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे

१. वर्ष २०१६ पासून यजमानांची प्रकृती बिघडू लागली. मध्यंतरी त्यांचे हार्नियाचे (अंतर्गळाचे) शस्त्रकर्म झाले. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास थोडा न्यून झाला. त्यांना पौरुषग्रंथीला होणार्‍या क्षयरोगाचा (प्रोस्टेटच्या टी.बी.चा) त्रास चालू झाला. रुग्णालयात चाचणी केल्यावर त्यांना पार्किंसन रोग (कंपविकार) झाल्याचे निदान झाले.

२. जानेवारी २०२५ मध्ये त्यांना रुग्णालयात भरती केले. तेव्हा आम्ही तेथील खोलीमध्ये प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र ठेवून उदबत्ती लावत होतो. तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना खोलीत आल्यावर हलकेपणा, शांतता अन् प्रसन्नता जाणवत होती.

३. यजमान रुग्णालयात असतांना मी त्यांच्याजवळ भ्रमणभाषवर सतत स्तोत्र आणि दत्ताचा नामजप हळू आवाजात लावून ठेवत होते, तसेच कापूर अन् विभूती यांद्वारे अनिष्ट शक्तींचे आवरण काढत होते. तेव्हा तेथील अन्य रुग्णांनीही आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी जाणून घेतले. मी अन्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना साधना सांगितली. तेव्हा मला सात्त्विक उत्पादनांच्या वितरणाची सेवा करता आली.

४. एप्रिल २०२५ मध्ये ‘यजमानांचा चेहरा शांत आणि डोळे ऊर्ध्व दिशेने होत आहेत’, असे मला वाटले. त्यांच्या कपाळावर शिवपिंडीचा आकार आणि ३ आडव्या रेषा उमटल्या होत्या. कपाळावर उभा टिळा लावल्यावर कमळाच्या पाकळ्यांसारखी आकृती दिसत होती.

५. शेवटपर्यंत त्यांचा नामजप चालू होता. ‘ते सतत भगवंताच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवत होते.

६. मी त्यांची सेवा करत असतांना ‘प.पू. गुरुदेवांची सगुण सेवा करत आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे माझी शरणागती आणि कृतज्ञताभाव वाढून मला गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाता आले. त्यांची सेवा करतांना मला कोणतीही प्रतिक्रिया किंवा आळस न येता आनंदी रहाता आले. बर्‍याच वेळा मला तहान-भुकेची जाणीव झाली नाही, तसेच थकवाही जाणवला नाही. ‘प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून सतत लक्ष ठेवून ऊर्जा पुरवत आहेत’, असे मला वाटत होते.

७. शेवटच्या ३ मासांत त्यांच्या शारीरिक हालचाली न्यून झाल्या, तेव्हा मला त्यांच्या जीविताविषयी अशाश्वती वाटू लागली. त्यांना धीर देऊन सर्व उपचार चालू होते. मी त्यांना आध्यात्मिक दृष्टीने सूक्ष्मातून गुरुदेवांकडे क्षमायाचना आणि प्रार्थना करण्यास सांगितले. त्यांनी, मी आणि माझ्या दोन्ही मुलींनी आमच्याकडून झालेल्या चुकांविषयी सूक्ष्मातून गुरुदेवांकडे क्षमा मागितली.

८. शेवटच्या २ दिवसांत त्यांच्या वेदना पुष्कळ वाढल्या. त्यांचा जीव कासावीस होत होता. पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे संत, वय ७५ वर्षे) यांनी सुचवल्यानुसार आम्ही नामजपादी उपाय केले. सद्गुरु स्वाती खाडये यांनी सुचवल्यानुसार आम्ही यजमानांची मीठ-भाकरीने दृष्ट काढली होती.

‘हे सर्व लिहितांना मला स्थिर आणि शांत रहाता आले’, त्यासाठी मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

२. सौ. योगेश्री महेश घोळे (मोठी मुलगी), पुणे

२ अ. रुग्णाईत झाल्यावर परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करणे : ‘बाबा स्वतःची कामे स्वतः करत असत, उदा. कपडे धुणे, ताट धुणे, अधिकोषात जाणे. त्यांना मागील १० मासांपासून प्रोस्टेटच्या टी.बी.चा त्रास चालू झाला. ते अंथरुणाला खिळून होते. त्यांना स्वतःचे काहीच करता येत नव्हते. परावलंबी झाल्याने त्यांना वाईट वाटत असे. नंतर त्यांनी परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न केला.

२ आ. रुग्णालयात असतांना जाणवलेली सूत्रे

१. रुग्णालयात असतांना बाबांना पुष्कळ वेदना होत होत्या; परंतु ‘ते अतिशय शांत आणि स्थिर होते’, असे मला वाटले. त्यांनी सर्व त्रास शांतपणे सहन केले. याविषयी तेथील रुग्ण आणि परिचारिका यांना आश्चर्य वाटत असे.

२. बाबांची त्वचा नितळ आणि मऊ दिसत होती.

३. पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४३ वर्षे) या स्वतःहून वेळ देऊन बाबांशी बोलल्या. त्याविषयी बाबांनी बर्‍याच वेळा कृतज्ञता व्यक्त केली.

‘प.पू. गुरुदेवांनी आम्हाला या कठीण परिस्थितीत सर्व प्रकारे साहाय्य केले आणि दुःख सहन करण्याची शक्ती दिली’, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

३. सौ. शुचिता अंकुश देशपांडे (धाकटी मुलगी), नागपूर

३ अ. निधनानंतरच्या दहाव्या दिवशी नामजपादी उपाय केल्यावर कावळ्याने पिंडाला स्पर्श करणे : ‘२३.९.२०२५ या दिवशी माझ्या वडिलांच्या निधनानंतरचा दहावा दिवस होता. तेव्हा पिंडदान केले होते; परंतु बराच वेळ कावळा पिंडाला शिवत नव्हता.

पू. अशोक पात्रीकर यांनी सांगितल्यानुसार ‘महाशून्य’ हा जप केल्यावर कावळ्याने पिंडाला स्पर्श केला. तेव्हा आम्ही संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २२.९.२०२५)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक