नागपूर येथील रा.स्व. संघाच्या दसरा मेळाव्यात प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विधान

नागपूर – पहलगाम येथे धर्म विचारून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर प्रत्येक भारतियाने ‘आपला शत्रू कोण आणि मित्र कोण ?’, हे ठरवावे. या आक्रमणानंतर सरकारने पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय घेतले. आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात भारताने सुनियोजित पद्धतीने प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण काळात आम्ही आमच्या नेतृत्वाचा दृढ निश्चय, आमच्या सशस्त्र दलांचे शौर्य आणि लढाईची सिद्धता, तसेच समाजाची एकता यांची हृदयस्पर्शी दृश्ये पाहिली. या घटनेने ‘आपण देशाच्या सुरक्षेविषयी जागरूक असले पाहिजे’, हेही शिकवले. हिंदु समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी आहे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विदेशातील मान्यवर उपस्थित होते. रेशीमबाग मैदानातील या कार्यक्रमाला २१ सहस्र स्वयंसेवक उपस्थित होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वापरले गेलेले ड्रोन आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीचे पिनाका अग्नीबाण या शस्त्रांचे या वेळी पूजन करण्यात आले. तसेच ध्वजारोहण करण्यात आले.
प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मांडलेली सूत्रे

‘हिंदु राष्ट्रप्रेम’ आपल्याला नेहमीच एकसंध ठेवते !
आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. आपली संस्कृती सगळ्यांचा सन्मान आणि स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचे जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्या हिंदु समाजाने केले आहे. त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला ‘हिंदु संस्कृती’ही म्हटले जाते. पिढ्यान्पिढ्या ही संस्कृती जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलीदान दिले आहे. त्या संस्कृतीचे आचरण, आपल्या पूर्वजांचा गौरव आणि आपल्या मातृभूमीची भक्ती हे सगळे मिळून आपले राष्ट्रीयत्व सिद्ध होते. हीच आपली हिंदु राष्ट्रीयता आहे. कुणाला ‘हिंदु’ शब्दावर आक्षेप आहे, त्यांनी ‘हिंदवी’ म्हणावे किंवा ‘भारतीय’ म्हणावे. हे सगळे समानार्थी शब्द आहेत; पण या राष्ट्रीयतेचे स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे ‘हिंदु.’ या पवित्र मातृभूमीवर असलेले आपले प्रेम आणि भक्ती एकत्रित मिळून राष्ट्रप्रेम निर्माण करते. आदराने सर्वांना एकत्र आणणारे हे ‘हिंदु राष्ट्रप्रेम’ आपल्याला नेहमीच एकसंध ठेवत आले आहे. आपल्याकडे ‘राष्ट्रराज्य’ (नेशन-स्टेट) ही संकल्पना नाही. राज्ये येतात आणि जातात; पण राष्ट्र कायम टिकते. आपण आपल्या एकतेचा हा पाया कधीही विसरता कामा नये.
भारतीय संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती !
भारतीय संस्कृती आध्यात्मिकता, करुणा, पवित्रता आणि तपश्चर्या अर्थात् धर्म या गुणांवर आधारित आहे. या राष्ट्राचे पुत्र असलेल्या हिंदु समुदायाने पारंपरिकपणे ही संस्कृती त्यांच्या आचरणाने जपली आहे, म्हणूनच तिला ‘हिंदु संस्कृती’ असेही म्हणतात. प्राचीन भारतात, ऋषीमुनींनी त्यांच्या तपस्वी ज्ञानाच्या, योगसाधनेच्या जोरावर ती जपली आहे. त्या चिरंजीवी संस्कृतीचे आचरण, आपल्या पूर्वजांचे आदर्श म्हणून संस्कृतीचे विवेकपूर्ण अनुकरण आवश्यक आहे.
हिंदु समाज या देशासाठी उत्तरदायी असलेला समाज !
हिंदु समाज हा या देशासाठी उत्तरदायी असलेला समाज आहे, हिंदु समाज सर्वसमावेशक आहे. हिंदु समाज हा ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब) या सर्वसामावेशक विचारसरणीचा प्रवर्तक तथा संरक्षक आहे. म्हणूनच भारताला समृद्ध बनवणे, संपूर्ण जगाला त्याचे अपेक्षित आणि योग्य योगदान देणारा देश बनवणे हे हिंदु समाजाचे कर्तव्य आहे.
स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही !
नुकतेच अमेरिकेने घोषित केलेले धोरण इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीवर आपण अवलंबून रहाता कामा नये. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो. एकटा देश स्वतंत्रपणे वाटचाल करू शकत नाही; पण हे अवलंबित्व म्हणजे नाईलाज असता कामा नये; कारण ही आर्थिक प्रणाली कधी पालटेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला स्वदेशी आणि स्वावलंबन यांना पर्याय नाही. आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल. स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. त्यानंतरही सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे जतन करावे लागेल; पण त्यात नाईलाज नसावा, सक्ती नसावी.
संघाच्या कार्यपद्धतीत जात आणि धर्म नसणे, हीच संघाची खरी शक्ती ! – रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या वेळी म्हणाले की, वर्ष १९४० मध्ये कराड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघाच्या शाखेला भेट दिली. संघाच्या कार्यकर्त्यांना साहाय्याचा प्रस्ताव दिला होता. संघाविषयी त्यांची आपुलकीची भावना होती. संघाच्या समरसता आणि समावेशकता या विचारसरणीचा हा परिणाम आहे. रज्जू भैय्या (माजी सरसंघचालक) यांच्या संपर्कात आल्यावर मला संघाची खरी ओळख पटली. समानता, समरसता आणि जनसेवा मी प्रत्यक्ष अनुभवली. संघाच्या कार्यपद्धतीत कुठेही जात, धर्म यांचे भेद नाहीत, हीच संघाची खरी शक्ती आहे. म. गांधीही संघाच्या कार्यप्रणालीने प्रभावित झाले होते. वर्ष १९४७ मध्ये संघाच्या सभेत सहभागी होऊन त्यांनी संघाची शिस्त, साधेपणा आणि सेवाभाव यांचे कौतुक केले होते.
स्त्रीत्वाचा उत्सव !
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
Ganga River Party : गंगा नदीत नौकेत मांस आणि मद्य यांची मेजवानी करण्याची घटना : ५ हिंदु तरुणांना अटक
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)