Rajnath Singh : आता लक्ष्य लाहोर नाही, तर कराची असेल आणि पाकिस्तानचा भूगोलच पालटून टाकू !

राजनाथ सिंह यांची थेट चेतावणी

कच्छ येथील सैन्य तळात भारतीय सैन्याला संबोधित करतांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कच्छ (गुजरात) –  जर कच्छच्या ‘सर क्रीक’ भागात पाकिस्तानच्या कुरापती चालूच राहिल्या, तर मग पाकला ‘जशाच तसे’ उत्तर देण्यात येईल. पाकचा इतिहास आणि भूगोल दोन्ही पालटून टाकू. आता लक्ष्य लाहोर नाही, तर कराची असेल. कराचीचा मार्ग ‘सर क्रीक’मधून जातो, हे लक्षात ठेवा, अशी चेतावणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे पाकला दिली. राजनाथ सिंह यांनी विजयादशमीच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला कच्छ येथील सैन्य तळात शस्त्रपूजन केले. त्यांनी यानंतर भारतीय सैन्याला संबोधित करतांना वरील चेतावणी दिली.

राजनाथ सिंह यांनी मांडलेली सूत्रे

१. स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाक पुन्हा कुरापती करत आहे. सर क्रीक परिसरात नियंत्रणरेषेविषयी वाद निर्माण करण्यात येत आहे. भारताने अनेकदा चर्चेच्या माध्यमातून उपाययोजना काढण्याचा प्रयत्न केला; पण पाकिस्तानच्या हेतूमध्येच खोट दिसत आहे. पाकिस्तानच्या सैन्याने सर क्रीक नियंत्रणरेषेलगत सैनिकी उपकरणे तैनात केली आहेत, तसेच त्या परिसरात विकासकामेही करत आहे.

२. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानने लेह ते सर क्रीकपर्यंत या सीमारेषेवर भारतात  घुसण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. भारतीय सैन्याने पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणेला पूर्णपणे उघडे पाडले.

३. भारतीय सैन्याने जगाला संदेश दिला आहे की, ते पाकिस्तानला कधीही आणि कुठेही मोठी हानी पोचवू शकतात.

‘सर क्रीक’ वाद काय आहे ?

सर क्रीक हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कच्छच्या रणातील ९६ किमी लांबीचा पाण्याचा पट्टा आहे. ही खाडी अरबी समुद्राला जाऊन मिळते. सर क्रीक’ हा पाण्याचा पट्टा गुजरातच्या कच्छ प्रदेशाला पाकिस्तानच्या सिंध प्रांतापासून विभाजित करतो. या ‘सर क्रीक’ परिसरावर पाकिस्तान स्वतःचा दावा सांगत आहे.

भारत केवळ शस्त्रांची पूजा करत नाही, तर वेळ आल्यावर त्यांचा वापर कसा करायचा हेही जाणतो ! – संरक्षणमंत्री

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ‘शस्त्रांची भक्ती’ म्हणजे आसुरी शक्तींवर दैवी शक्तीच्या विजयाची महानता दर्शवते. म्हणून जेव्हा आपण शस्त्रांची पूजा करतो, तेव्हा आपण या शक्तीचा वापर धार्मिकता आणि न्यायाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतो. भारत केवळ शस्त्रांची पूजा करत नाही, तर वेळ आल्यावर त्यांचा वापर कसा करायचा हेही जाणतो.
जेव्हा भगवान राम रावणाशी लढले, तेव्हा त्यांचे ध्येय केवळ विजय मिळवणे नव्हते, तर त्यांना धर्म स्थापित करायचा होता.