६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या विदेशातील एका साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले राजमातंगीदेवीचे रूप !

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र

‘वर्ष २०२२ च्या नवरात्रीच्या कालावधीत महर्षींनी नाडीपट्टीत उल्लेखल्यानुसार आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री दश महाविद्यांशी (देवींशी) संबंधित यज्ञ करण्यात आले. हे यज्ञ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळावा, साधकांचे सर्वच स्तरांवर रक्षण व्हावे आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर होऊन शीघ्र ईश्वरी राज्य यावे, यांसाठी महर्षीच्या आज्ञेने हे यज्ञ करण्यात आले. १.१०.२०२२ या दिवशी राजमातंगीदेवीचा यज्ञ करण्यात आला. यज्ञाच्या वेळी वातावरण सूक्ष्मातून पोपटी रंगाचे झाले होते. सूक्ष्मातून अनेक पोपट आकाशात उडत होते. यज्ञाच्या वेळी मला पोपटावर आरूढ असलेल्या राजमातंगीदेवीचे रूप दिसले. देवीच्या रूपाची जाणवलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. राजमातंगीदेवी

अ. राजमातंगीदेवी तारक-मारक रूपात असून तिची कांती निळसर राखाडी रंगाची होती.

आ. देवीच्या कार्याचा वेग पुष्कळ होता. त्यामुळे वातावरणात वायुतत्त्व वाढले होते.

इ. देवी आकाशात विहार करत असल्याने ती पृथ्वीवरून दिसत नव्हती. ती पृथ्वीतत्त्व आणि आपतत्त्व यांच्या पलीकडे होती. देवी साक्षीभावात होती.

ई. देवीच्या एका हातात ऊस होता. एरव्ही राजमातंगीदेवी सिंहासनावर आरूढ असते आणि तिच्या डाव्या हातात ऊस असतो. यज्ञाच्या वेळी मला दिसलेल्या देवीने उजव्या हातात ऊस घेतला होता. पोपटावर बसून आकाशात विहार करणारी देवी आणि कमळावर आरूढ असलेली देवी यांची मला लक्षात आलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

२. पोपट

अ. राजमातंगीदेवीच्या अवतीभोवती लहान लहान पोपट उडत होते. हे पोपट म्हणजे देवीची स्वतःचीच शक्ती (अंश) असून ते (पोपट) ‘देवीचे सेवक’ म्हणून देवीच्या अवतीभोवती होते.

आ. पोपट हा निर्मिती, नवीन जीवनाचा आरंभ आणि ऐश्वर्य यांचे दर्शक आहे.

३. वातावरण

अ. यज्ञाच्या वेळी राजमातंगीदेवीचे तत्त्व वाढल्याने संपूर्ण वातावरण पोपटी रंगाचे झाले होते. तसेच तेजतत्त्व वाढल्याने वातावरणाचा पोपटी रंग अधिक तेजस्वी दिसत होता.

आ. यज्ञ परिणामकारक झाल्यामुळेच राजमातंगीदेवीचे तत्त्व आणि वातावरणातील तेजतत्त्व वाढले होते.’

– एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २६ वर्षे), विदेश (२५.९.२०२४)

सामाईक संज्ञा

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’ च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र: काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.