मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा लागलेला निर्णय, म्हणजे भगव्या आतंकवादाच्या कपटाचे विसर्जन !

नांदेड येथील वर्कशॉपमध्ये झालेला स्फोट, समझौता एक्सप्रेसमधील स्फोट आणि मालेगाव स्फोट या प्रत्येक स्फोटातील आरोपीची कहाणी थोड्या फार फरकाने एकच आहे, भगव्याचा टोकाचा द्वेष हाच या सगळ्या घटनांना जोडणारा दुवा होता. ‘हिंदु आतंकवादा’चा आरोप सिद्ध होईल’, अशी जबानी देण्याची बळजोरी झाल्याचा आरोप केवळ या प्रकरणातील आरोपींनीच केला, असे नाही, तर काही अन्वेषण अधिकार्‍यांनीही याला दुजोरा दिला आहे. आता ‘हे सगळे आरोपी निर्दोष सुटले, म्हणजे न्याय झाला’, असे नाही. भगव्या आतंकवादाचा खोटा बागूलबुवा उभा करून निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्‍या प्रत्येकाला कायद्यासमोर आणून शिक्षा ठोठावल्याविना खरा न्याय झाला, असे म्हणता येणार नाही.

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्वाविषयी टोकाचा विद्वेष निर्माण करून काँग्रेसने सुखनैव राज्य करणे, ‘भगवा आतंकवादा’चा उगम, ‘हिंदु आतंकवाद’ ठरवण्यासाठीचे षड्यंत्र फसणे, मालेगावच्या पहिल्या बाँबस्फोटात ‘अहले हदीस’ या इस्लामी संघटनेच्या सदस्यांना अटक केली जाणे आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कसे गोवण्यात आले ?’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग ३)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/956428.html

१४. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची चकमकीत हत्या करण्याविषयी रचलेले षड्यंत्र 

३ नोव्हेंबर २००८ या दिवशी ‘आर्.डी.एक्स.’ (स्फोटके) ठेवल्याचा निरोप येईपर्यंत लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा छळ आणि मारहाण, तसेच संघ-भाजपच्या नेत्यांची नावे घेण्याचा दबाव चालूच होता. शेवटी आतंकवादविरोधी पथकाच्या (‘ए.टी.एस्.’च्या) लोकांनी त्यांना अचानक सांगितले, ‘‘तुमच्याकडून आम्हाला काही माहिती मिळत नाही, तेव्हा तुम्ही आता जाऊ शकता. तुम्हाला सोडायला जीप वगैरे काही मिळणार नाही. तुम्ही सामान घेऊन हायवेपर्यंत जा आणि तिथून जे वाहन मिळेल, ते घेऊन चालू लागा.’’ लेफ्टनंट कर्नल पुरोहित स्वतःचे सामान घ्यायला, त्यांच्या खोलीत गेले असता दारावर टकटक झाली. दारात ‘ए.टी.एस्.’चा एक निरीक्षक उभा होता. त्याने त्याचे पिस्तुल पुरोहितांच्या पायावर ठेवले आणि त्यांना सांगितले, ‘‘काहीही झाले, तरी तुम्ही ही जागा सोडून बाहेर पाऊलही टाकू नका. तुम्ही बाहेर पडला की, तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला, असे दाखवून तुमचे ‘एन्काऊंटर’ (चकमक) करण्याची ‘ऑर्डर’ (आदेश) मला देण्यात आली आहे.’’ पुरोहितांनी त्याला विचारले, ‘‘हे मला आधीच सांगण्याचे कारण काय ?’’ यावर तो उत्तरला, ‘‘तुम्ही पोलिसांच्या ‘ट्रेनिंग प्रोग्राम’मध्ये (प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये) शिकवत होता, तेव्हा मी तुमचा विद्यार्थी होतो. माझ्या हातून तुमची हत्या व्हावी, असे मला वाटत नाही.’’ ‘जगात अशी काही चांगली माणसेही आहेत; म्हणूनच जग पुढे जात आहे’, असेच म्हणावेसे वाटते. पुरोहितांनी बाहेर जायचे नाकारले, तेव्हा अधिकृतपणे त्यांना अटक झाल्याची कागदपत्रे सिद्ध केली गेली, म्हणजेच २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे अपहरण करून त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले गेले.

श्री. अभिजित जोग

१५. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा करण्यात आलेला क्रूर छळ 

त्यानंतरही मारहाण आणि छळ चालूच राहिला. त्याची तीव्रता इतकी होती की, आतंकवाद्यांशी लढतांना जायबंदी झाल्यावर त्यांच्या पायात घातलेला रॉड बाहेर आला, जो पुन्हा शल्यकर्म करून आत घालावा लागला. छताला हात बांधून त्यांना लोंबकळत ठेवण्यात येत असे आणि त्यांच्या मागे एक लाकडाचा ओंडका तसाच लोंबकळत बांधला जात असे. पोलीस जाता-येता त्यांना धक्का देत, ज्यामुळे त्यांची पाठ ओंडक्यावर आदळून तीव्र वेदना होत. या प्रकारात त्यांच्या पाठीचा कणा एका जागी दीड सेंटीमीटर आत गेला आहे. यावर कुठलाही इलाज नसल्यामुळे ‘सायटिका’सारख्या वेदना त्यांना सतत सहन कराव्या लागतात.

शेवटी न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी बाँबस्फोटाचा कट आखल्याचा, लष्कराचे ‘आर्.डी.एक्स.’ चोरल्याचा, ते विविध ठिकाणी नेल्याचा, त्यांच्या घरात ‘आर्.डी.एक्स.’ सापडल्याचा, ते स्फोटासाठी वापरल्याचा कुठलाही पुरावा आढळला नसल्याचे निःसंदिग्धपणे सांगून त्यांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली; पण भारतमातेच्या या सुपुत्राची उमेदीची १७ वर्षे भयानक शारीरिक आणि मानसिक छळ सहन करण्यात गेली, हे विसरणे अशक्य आहे. आतंकवाद्यांशी लढणार्‍या भारतीय सैन्याच्या या दिलेर अधिकार्‍याचा सन्मान करण्याऐवजी आपल्या देशाने त्याला अशा प्रकारे अपमानित केले, हा डाग कधीही धुतला जाणार नाही.

१६. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर करण्यात आलेले अनन्वित अत्याचार आणि त्यांच्यावर आणलेला दबाव 

या प्रकरणात अटक झालेल्या सगळ्याच आरोपींना अशा प्रकारे बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आणि ‘हिंदु आतंकवादा’चा आरोप सिद्ध व्हावा, या हेतूने बड्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची नावे त्यांनी घ्यावीत, यासाठी त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह सांगतात, ‘‘प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावे त्यांनी घ्यावीत, यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणण्यात आला अन् पुरुष पोलिसांनी या साध्वीला राक्षसी मारहाण केली. कुत्री, कुलटा, वेश्या अशा शिव्या देऊन त्यांच्या चारित्र्यावर सतत गलिच्छ आरोप केले गेले. काही पुरुष कैद्यांसह उभे करून त्यांना अश्लील ऑडिओ (ध्वनीफिती) ऐकवले गेले. पट्ट्याने मारहाण सतत होतच होती.’’ साध्वी सांगतात, ‘‘त्यांचे हात आणि पाय धरून झोका देत त्यांना भिंतीवर फेकून दिले जात असे. यामुळे पाठीचे हाड मोडून त्या कायमच्या जायबंदी झाल्या.’’

प्रत्येक आरोपीची कहाणी थोड्या फार फरकाने अशीच आहे. ‘भगव्याचा टोकाचा द्वेष’ हाच या सगळ्या घटनांना जोडणारा दुवा होता. या एकाही आरोपीविरुद्ध कुठलेही पुरावे न मिळाल्यामुळे त्या सगळ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

१७. पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी ‘भगवा आतंकवादा’चे फोडलेले बिंग 

‘हिंदु आतंकवादा’चा आरोप सिद्ध होईल, अशी जबानी देण्याची जबरदस्ती झाल्याचा आरोप केवळ या प्रकरणातील आरोपींनीच केला, असे नाही, तर काही अन्वेषण अधिकार्‍यांनीही याला दुजोरा दिला आहे. केंद्रीय गृह खात्यातील अधिकारी आर्.व्ही.एस्. मणी यांनी याविषयी दिलेली माहिती आपण ७ सप्टेंबर या दिवशीच्या दैनिकात वाचली. या प्रकरणाची चौकशी चालू असतांना महाराष्ट्र ए.टी.एस्.चे सदस्य असलेले सोलापूर येथील पोलीस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी सांगितले, ‘‘या प्रकरणातील ३ आरोपी रामजी कलसंग्रा, संदीप डांगे आणि दिलीप पाटीदार यांचा पोलीस कोठडीतील मारहाणीतच मृत्यू झाला होता. तरीही मला त्यांचा शोध घेत असल्याचा देखावा करण्याचा आदेश देण्यात आला.’’ मेहबूब मुजावर यांनी हेही सांगितले, ‘‘उच्चपदस्थ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी त्यांना ‘मोहन भागवतांना धरून आणा’ असे आदेश दिले.’’ मुजावर सांगतात, ‘धरून आणा’ याचा अर्थ ‘कायदेशीर अटक करा’, असा नसून पुरोहितांप्रमाणेच बेकायदेशीरपणे ‘उचलून आणा’, असा होता. बेकायदेशीर आदेश मानण्यास नकार दिल्यानंतर मेहबूब मुजावर यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले. सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या या अन्वेषण अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीवरून ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची सिद्धता स्पष्ट दिसून येते.

१८.  हिंदुत्वाचा विचार कायमचा गाडण्याचा काँग्रेसचा डाव अयशस्वी !

‘२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेले आक्रमण हिंदु आतंकवाद्यांनी केले’, हे दाखवण्याची पूर्ण सिद्धता झाली होती. त्या सातही आतंकवाद्यांच्या हातात ‘कलावा’ (धागा) घालण्यात आला होता. बेंगळुरूचा पत्ता असलेली हिंदु नावांची ओळखपत्रे त्यांच्याकडे होती. ‘हे आक्रमण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवले’, हे सांगणारे पुस्तकही सिद्ध होते. हुतात्मा पोलीस तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले नसते, तर सगळ्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकून हिंदुत्वाचा विचार कायमचा गाडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी झाला असता; पण गांधी हत्येच्या वेळी जे घडले ते याप्रसंगी घडले नाही. ‘एक ना एक दिवस हा हिंदुत्वाचा विचार आपल्या सत्तेला आव्हान देणार’, ही नेहरूंपासून त्यांच्या प्रत्येक कुटुंबियांच्या मनात दडलेली सुप्त भीती नरेंद्र मोदींच्या रूपाने प्रत्यक्षात उतरली आणि वर्ष २०१४ मध्ये काँग्रेसचा असा सफाया झाला की, त्यातून आजवर काँग्रेस सावरलेली नाही. म्हणतात ना, ‘धर्मो रक्षति रक्षितः’ (धर्माच रक्षण केले, तर तो आपले रक्षण करतो) !

असे असले, तरी सगळे आरोपी निर्दोष सुटले, म्हणजे न्याय झाला, असे नाही. ‘भगव्या आतंकवादाचा खोटा बागूलबुवा उभा करून निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्‍या प्रत्येकाला कायद्यासमोर आणून शिक्षा ठोठावल्याविना खरा न्याय झाला’, असे म्हणता येणार नाही.

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.

(समाप्त)

(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)

संपादकीय भूमिका ,

निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्‍या प्रत्येकाला कायद्याने शिक्षा ठोठावल्याविना खरा न्याय झाला’, असे म्हणता येणार नाही !