नांदेड येथील वर्कशॉपमध्ये झालेला स्फोट, समझौता एक्सप्रेसमधील स्फोट आणि मालेगाव स्फोट या प्रत्येक स्फोटांतील आरोपींची कहाणी थोड्या फार फरकाने एकच आहे, ‘भगव्याचा टोकाचा द्वेष’ हाच या सगळ्या घटनांना जोडणारा दुवा होता. ‘हिंदु आतंकवादा’चा आरोप सिद्ध होईल’, अशी जबानी देण्याची बळजोरी झाल्याचा आरोप केवळ या प्रकरणातील आरोपींनीच केला, असे नाही, तर काही अन्वेषण अधिकार्यांनीही याला दुजोरा दिला आहे. आता ‘हे सगळे आरोपी निर्दोष सुटले, म्हणजे न्याय झाला’, असे नाही. भगव्या आतंकवादाचा खोटा बागूलबुवा उभा करून निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्या प्रत्येकाला कायद्यासमोर आणून शिक्षा ठोठावल्याविना खरा न्याय झाला, असे म्हणता येणार नाही.
७ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्वाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी काँग्रेसने विणलेले मायावी जाळ, हिंदुत्वाविषयी टोकाचा विद्वेष निर्माण करून काँग्रेसने सुखनैव राज्य करणे, ‘भगवा आतंकवादा’चा उगम आणि हिंदु आतंकवाद’ ठरवण्यासाठीचे षड्यंत्र फसणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/953992.html
९. ‘समझौता एक्सप्रेस’ बाँबस्फोट प्रकरणी धर्मांधांना सोडून स्वामी असीमानंद यांच्यासह अन्य हिंदूंना अटक करणे आणि पुढे ते निर्दाेष सुटणे

देहलीहून अटारी सीमेपर्यंत जाणार्या ‘समझौता एक्सप्रेस’मध्ये १८ फेब्रुवारी २००५ या दिवशी मोठा बाँबस्फोट झाला, ज्यात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला. कराची येथील एका आतंकवादी संघटनेने या घटनेचे दायित्व स्वीकारले.

या घटनेची चौकशी करणार्या पोलिसांच्या पथकाने १६ धर्मांध मुसलमानांना या स्फोटात सहभागी असल्याच्या संशयावरून अटक केली. पाकिस्तानी नागरिकांनी भारतात केलेल्या आतंकवादी कारवायांसंदर्भात भारताने पाकिस्तानला दिलेल्या अधिकृत ‘डॉसियर’मध्येही (विशिष्ट विषयासंबंधी माहिती असलेल्या कागदपत्रांचा संग्रह) या घटनेचा उल्लेख करण्यात आला. अर्थात् हा स्फोट पाकिस्तान्यांनी घडवल्याचे चौकशीत आढळले होते, हे स्पष्ट आहे; पण अचानक या संशयितांना सोडून देण्यात आले आणि स्वामी असीमानंद अन् त्यांच्या हिंदु आतंकवादी सहकार्यांनी हा स्फोट घडवल्याचे सांगून त्यांना अटक करण्यात आली. ‘हिंदु आतंकवाद’ ही संकल्पना अशा रितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न झाला, त्याचा लाभ पाकिस्तानने पुरेपूर उठवला. शेवटी वर्ष २०१९ मध्ये न्यायालयाने या प्रकरणातून स्वामी असीमानंद, कमल चौहान, राजेंद्र चौधरी आणि लोकेश शर्मा या आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

१०. मालेगावच्या पहिल्या बाँबस्फोटात ‘अहले हदीस’ या इस्लामी संघटनेच्या सदस्यांना अटक केली जाणे
हिंदुत्वाच्या विचाराला अपकीर्त करून कायमचे संपवण्याच्या अट्टहासापायी खर्या आतंकवाद्यांना सोडून हिंदूंना अडकवण्याच्या योजनेतील पुढचा टप्पा, म्हणजे मालेगावचे बाँबस्फोट ! यातील पहिला बाँबस्फोट ८ सप्टेंबर २००६ या दिवशी झाला, ज्यात ३१ लोकांचा मृत्यू झाला, तर ३१२ जण घायाळ झाले. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या (‘ए.टी.एस्’च्या) अन्वेषणात असे आढळले, ‘अहले हदीस’ या इस्लामी संघटनेने ‘सिमी’ या बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेच्या साहाय्याने हा स्फोट घडवून आणला. यानुसार २१ डिसेंबर २००६ या दिवशी ‘ए.टी.एस्’ने संशयितांना अटकही केली. यानंतर अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यांच्या अन्वेषणात एक संशयित माफीचा साक्षीदार झाला आणि त्याच्याकडून वर्ष २००६ मध्ये मुंबईत झालेल्या बाँबस्फोटातील ‘आर्.डी.एक्स’ (स्फोटके) वापरून हे स्फोट घडवल्याचे अन् त्यासाठी २ जणांनी पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले.
११. मालेगावचा दुसरा बाँबस्फोट हा ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी ‘ए.टी.एस्’ने रचलेले षड्यंत्र

ज्या खटल्यातून नुकतीच साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतर आरोपी यांची निर्दोष सुटका झाली, तो मालेगावचा दुसरा बाँबस्फोट २८ सप्टेंबर २००८ या दिवशी रात्री ८.३० वाजता झाला. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात या स्फोटामागेही ‘अहले हदीस’ ही आतंकवादी संघटना असल्याचे आणि त्यांनी ‘लष्कर ए तोयबा’ अन् ‘इंडियन मुजाहिद्दीन’ यांच्या साहाय्याने हा स्फोट घडवून आणल्याचे आढळले; पण जानेवारी २००८ मध्ये महाराष्ट्र ‘ए.टी.एस्’चे प्रमुख रघुवंशी यांच्या जागी हेमंत करकरे यांची नेमणूक झाली होती आणि महाराष्ट्रातील सर्व आतंकवादी घटनांचे अन्वेषण ‘ए.टी.एस्’कडे सोपवण्यात आले होते. करकरे यांची काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्याशी असलेली अवाजवी जवळीक आणि त्या दोघांचा ‘हिंदु आतंकवादा’विषयीचा आग्रह याची श्री. आर्.व्ही.एस्. मणी यांनी दिलेली माहिती आपण ७ सप्टेंबरच्या लेखात वाचली. मालेगाव स्फोटांचे अन्वेषण ‘ए.टी.एस्’ने हाती घेताच अन्वेषणाची दिशाच पालटली. पोलीस अन् सीबीआय यांनी शोधलेला ‘अहले हदीस’चा संबंध नाकारण्यात आला अन् काहीही करून हा ‘भगवा आतंकवाद’ असल्याचे सिद्ध करण्याची सिद्धता चालू झाली. लगेचच काँग्रेस-साम्यवाद्यांच्या ‘इकोसिस्टम’ने (यंत्रणेने) ही कहाणी ‘गॉस्पेल ट्रूथ’ (पूर्ण सत्य) असल्यासारखी स्वीकारून न्यायालयाच्या निर्णयाची वाट न बघता प्रस्थापित केली. ही केस हाती घेतल्यानंतर अवघ्या ३५ दिवसांत ‘ए.टी.एस्’ने ‘हे कृत्य ‘अहले हदीस’चे नसून हिंदु आतंकवाद्यांचे आहे’, असा निष्कर्ष काढून लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना अटकही केली.
१२. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कसे गोवण्यात आले ?

अ. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची पार्श्वभूमी आणि मुंबईवर जिहादी आक्रमण होण्याविषयी मिळालेली माहिती : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे चेन्नई येथील ‘ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी’ येथून प्रशिक्षण घेऊन वर्ष १९९३ मध्ये सैन्यात भरती झाले. वर्ष २००१ मध्ये काश्मीरमधील आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते गंभीर घायाळ झाले आणि त्यांच्या पायात लोखंडी सळई (रॉड) घालावी लागली. त्यानंतर प्रत्यक्ष लष्करी कारवायांमध्ये भाग घेणे शक्य नसल्यामुळे त्यांना सैन्याच्या इतर कुठल्याही विभागात रुजू होण्याचा पर्याय देण्यात आला. देशासाठी वाटेल तो धोका पत्करण्याची ओढ अंगीभूतच असल्यामुळे त्यांनी ‘मिलिटरी इंटेलिजन्स’मध्ये (सैनिकी गुप्तचर यंत्रणेमध्ये) सामील व्हायचे ठरवले. देशासाठी धोकादायक ठरणार्या शत्रूची आणि आतंकवादी संघटनांची गुप्त माहिती मिळवून ती लष्कराला पुरवण्याचे काम हा विभाग करत असतो. या कामात लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी विलक्षण प्रावीण्य मिळवले आणि एक धडाडीचे अन् कार्यक्षम अधिकारी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. अतिशय मेहनत घेऊन इस्लामी आतंकवादी आणि नक्षली यांची माहिती देणार्या खबरींचे मोठे जाळे त्यांनी विणले. इस्लामी आतंकवाद्यांच्या कारवायांवर बारीक नजर ठेवता यावी, यासाठी ‘अरेबिक’ भाषा शिकणे आवश्यक वाटली. त्यामुळे ते मध्यप्रदेशातील ‘आर्मी एज्युकेशन सेंटर’मध्ये ‘अरेबिक’चे शिक्षण घेत होते.
त्यांना ‘सिमी’शी संबंधित असलेल्या त्यांच्या एका खबरीने १० ऑक्टोबर २००८ या दिवशी सांगितले, ‘देहली, मालेगाव येथील स्फोट हा केवळ प्रारंभ आहे. खरे मोठे आक्रमण २ मासांनंतर मुंबईत होणार आहे. लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी ही अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व संबंधित संस्थांना दिली, ज्यात महाराष्ट्र ‘ए.टी.एस्.’चाही समावेश होता. त्यांची ही कृती त्यांना अत्यंत मोठ्या संकटात टाकणार होती; कारण ही माहिती २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या आक्रमणासंबंधी होती, ‘जे हिंदु आतंकवाद्यांनी केले’, असे दाखवून हिंदुत्वाला कायमचे गाडण्याची योजना होती. कर्नल पुरोहित मोकळे राहिले, तर ते हे आक्रमण विफल करण्यासाठी जंग जंग पछाडणार, हे निश्चित होते.
हिंदु आतंकवाद अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्याच्या महत्त्वाकांक्षेने बेभान झालेल्या पाताळयंत्री टोळीला हे परवडणारे नव्हते.
आ. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना अडकवण्यासाठी रचलेले षड्यंत्र आणि वास्तविकता : २४ ऑक्टोबर या दिवशी ‘मिलिटरी इंटेलिजन्स’चे एक अधिकारी कर्नल श्रीवास्तव पचमढीला आले आणि त्यांनी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांची भेट घेऊन मालेगाव स्फोटाविषयी चर्चा केली. या वेळेपर्यंतही लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना त्यांच्याकडे संशयित म्हणून पाहिले जात आहे, याची कल्पना नव्हती. २९ ऑक्टोबरला ‘एईसी’च्या प्रमुखांकडून लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना देहलीतील सैन्य मुख्यालय (आर्मी हेडक्वार्टर्स) येथील ‘मिलिटरी इंटेलिजन्स’च्या संचालनालयामध्ये जाण्याची ‘मूव्हमेंट ऑर्डर’ मिळाली. कर्नल श्रीवास्तवही त्यांच्यासह जाणार होते. भोपाळला पोचल्यावर श्रीवास्तव यांनी पुरोहितांचा भ्रमणभाषसंच काढून घेतला आणि ‘त्यांना देहलीऐवजी मुंबईला नेले जात आहे’, असे सांगितले. आता ते त्यांच्या पत्नीशी आणि इतर कुणाशीही संपर्क करू शकत नव्हते. मुंबईला पोचल्यावर एका टाटा सुमोमधून त्यांना खंडाळ्यातील एका अज्ञात स्थळी नेण्यात आले. तिथे ‘ए.टी.एस्.’च्या अधिकार्यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ आणि मारहाण करायला प्रारंभ केला. ‘मालेगाव स्फोटातील तुझा सहभाग मान्य कर आणि हे काम तुला ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी करायला सांगितले होते, असा जबाब (स्टेटमेंट) दे, तरच तुला सोडतो’, असा मानसिक दबाव टाकला जाऊ लागला. टोकाची मारहाण आणि शारीरिक छळ चालूच होता. ‘काश्मीरमधून तू ६० िकलो ‘आर्.डी.एक्स.’ लष्कराकडून चोरले. त्यातील काही समझौता ‘ब्लास्ट’साठी स्फोटासाठी, तर काही मालेगाव स्फोटासाठी वापरले गेले. उरलेले ‘आर्.डी.एक्स.’ कुठे आहे ?’, असे विचारून छळ केला जाऊ लागला.
वास्तव हे आहे, ‘लष्करात स्फोटकांच्या साठ्याचा प्रतिदिन हिशोब ठेवला जातो. काश्मीरमधून वा इतर कुठूनही स्फोटके चोरीला गेल्याचा कुठलाही अहवाल केला गेला नव्हता.’ असे असूनही समझौता आणि मालेगाव प्रकरणात अन्वेषण यंत्रणांनी तोवर गोळा केलेले पुरावे बाजूला सारून बिनदिक्कतपणे खोटे आरोप केले जात होते.
१३. ए.टी.एस्.कडून सुधाकर चतुर्वेदी यांना गोवण्यासाठी रचलेले षड्यंत्र आणि सैन्याधिकार्यांनी ते उघड करणे
याच वेळी नाशिकजवळील देवळाली येथील सैन्याच्या तळावर वेगळेच नाट्य घडत होते. ३ नोव्हेंबरला सकाळी सैन्यातील सुभेदार पवार यांना ए.टी.एस्.मधील एका उपनिरीक्षकाचा भ्रमणभाष आला. त्याने त्यांना लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह काम करणार्या श्री. सुधाकर चतुर्वेदी यांचे देवळालीतील घर दाखवायला सांगितले. पवार यांनी लगेच उत्तर न देता ‘मला चौकशी करायला लागेल’, असे सांगून मेजर प्रवीण खानझोडे यांना हा प्रकार सांगितला. पवार आणि खानझोडे दोघेही चतुर्वेदी यांच्या घरी जायला निघाले असता मध्येच संबंधित पोलीस उपनिरीक्षकाचा भ्रमणभाष आला की, त्याचे काम झाले आहे. तरीही ते दोघे चतुर्वेदीच्या घरी गेले असता तेथे त्यांनी ए.टी.एस्.च्या उपनिरीक्षकाला चतुर्वेदीच्या घरात ‘आर्.डी.एक्स.’ ठेवतांना पाहिले. लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या जामीनपत्र आदेशामध्ये याचा उल्लेख आहे. खानझोडे आणि पवार यांनी न्यायालयात, तसेच लष्कराने बसवलेल्या ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’मध्ये (सैन्याकडून न्यायालयीन चौकशी) ही साक्ष दिली.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/958880.html
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !