Shri Mahalakshmi Devi (Ambabai) Kolhapur : श्री महालक्ष्मीदेवीच्या नवरात्रीसाठीची सिद्धता अंतिम टप्प्यात !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली श्री महालक्ष्मीदेवी (अंबाबाई) कोल्हापूर

कोल्हापूर, १९ सप्टेंबर (वार्ता.) : कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या नवरात्रीसाठीची सिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. देवीचे सुवर्ण अलंकारही स्वच्छ करण्यात आले आहेत, तसेच देवीच्या सोन्याच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. १९ सप्टेंबर या दिवशी देवीच्या पूजेत वापरल्या जाणार्‍या चांदीच्या वस्तूंची स्वच्छता केली गेली.

भाविकांच्या दर्शन रांगेसाठी मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ‘बॅरिकेड्स’ लावण्यात आले असून भाविकांचे ऊन, पाऊस यांपासून रक्षण होण्यासाठी भव्य असा मंडप घालण्यात आला आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच आरोग्य विषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातून ज्योत घेऊन जाणारे तरुण मंडळांचे कार्यकर्ते
या संदर्भात अधिक माहिती देतांना मंदिराचे व्यवस्थापक श्री. महादेव दिंडे म्हणाले,

श्री. महादेव दिंडे

‘‘या वेळी प्रथमच ‘ए.आय.’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता किती भाविक आहेत ? गर्दी कुठल्या ठिकाणी आहे ? हे तात्काळ जाणून घेणे शक्य होणार आहे. याच समवेत चोरी, तसेच तत्सम घटनांना आळा घालणे शक्य होणार आहे.’’

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात दर्शन रांगेत भाविकांसाठी उभारण्यात आलेले मंडप
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात चालू असणारे गरुड मंडपाचे काम
श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात चालू असलेली स्वच्छता

परिसरातील अनेक भाविक, तरुण मंडळे देवीची ज्योत घेऊन ‘अंबा मातेचा ते विजय असो’, ‘उद ग अंबे उदे उदे’च्या जयघोषात ठिकठिकाणी मार्गस्थ होत होती. यात कोल्हापूरसह आजूबाजूच्याही अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे.