दिनांक १६.९.२०२५ या दिवशीच्या अंकात आपण विविध योगमार्गानुसार दिलेली दीक्षा या संदर्भातील काही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे जाणून घेऊया.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/957024.html

२ ऊ ३. संतांना दिलेली दीक्षा (७० टक्के आणि त्याहून पुढील पातळीच्या व्यक्ती) : जेव्हा गुरु संतांना दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘संतांना दिलेली दीक्षा’ असे म्हणतात.
२ ऊ ३ अ. गुरु निवृत्तीनाथ आणि शिष्य संत ज्ञानेश्वर : संत ज्ञानेश्वर हे जन्मतःच संत होते. त्यांच्यावर त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांची कृपा झाली आणि संत निवृत्तीनाथांनी त्यांना सूक्ष्मातून दीक्षा देऊन त्यांना शिष्यरूपात स्वीकारले. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांकडून ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथासह अन्य ग्रंथांची रचना झाली.

२ ए. युगांनुसार दिलेली दीक्षा : युगांप्रमाणे साधक किंवा शिष्य यांची आध्यात्मिक योग्यता जाणून गुरु साधक किंवा शिष्य यांना दीक्षा देतात. त्यामुळे याला ‘युगांनुसार दिलेली दीक्षा’ असे म्हणतात.
२ ए १. सत्ययुगात दिलेली दीक्षा : सत्ययुगात दिलेल्या दीक्षेला ‘सत्ययुगात दिलेली दीक्षा’ असे म्हणतात.
२ ए १ अ. गुरु देवर्षि नारद आणि शिष्य भक्त प्रल्हाद : सत्ययुगात नारदमुनींच्या आश्रमात प्रल्हादाचा जन्म झाल्यानंतर देवर्षि नारदांनी त्या बालकाला एका मतानुसार ‘ॐ नमो नारायण ।’ या नामाची दीक्षा देऊन त्याला शिष्य म्हणून स्वीकारले आणि त्याला श्रीविष्णूला प्रसन्न करायची उपासना शिकवली. त्यामुळे प्रल्हादाकडून श्रीविष्णूची उपासना होऊन त्याला श्रीविष्णूने ‘नरसिंह’ रूपात दर्शन दिले.
२ ए २. त्रेतायुगात दिलेली दीक्षा : त्रेतायुगात दिलेल्या दीक्षेला ‘त्रेतायुगात दिलेली दीक्षा’ असे म्हणतात.

२ ए २ अ. गुरु मतंगमुनी आणि शिष्य शबरी : त्रेतायुगात मतंगमुनींनी शिष्या शबरीला रामनामाच्या जपाची दीक्षा दिली. शबरीने संपूर्ण आयुष्यभर रामनामाचा अत्यंत भावपूर्णरित्या नामजप करून श्रीरामाची उपासना केली. त्यामुळे सीताशोधार्थ जेव्हा प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण दक्षिणेतील पंपासरोवराच्या जवळ आले, तेव्हा ते मतंगमुनींच्या आश्रमात आले आणि त्यांची भेट शबरीशी झाली.
२ ए ३. द्वापरयुगात दिलेली दीक्षा : द्वापरयुगात दिलेल्या दीक्षेला ‘द्वापरयुगात दिलेली दीक्षा’ असे म्हणतात.
२ ए ३ अ. गुरु भगवान परशुराम आणि त्यांचे शिष्य : द्वापरयुगात परशुरामाने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, रुक्मी आणि कर्ण यांसारख्या अनेक योद्ध्यांना मंत्रदीक्षा देऊन त्यांना शिष्य स्वरूपात स्वीकारले अन् त्यांना धनुर्विद्येसह शस्त्रकला आणि युद्धकला यांचे ज्ञान दिले.
२ ए ३ आ. गुरु विजय सिद्धसेन आणि शिष्य बर्बरिक : भीमाचा नातू आणि घटोत्कच पुत्र बर्बरिक याचे आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण होते. बर्बरिकाला शक्तीसंपन्न व्हायचे होते; म्हणून श्रीकृष्णाने त्याला सिद्धगुरु विजय सिद्धसेन यांचे शिष्यत्व प्राप्त करण्याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विजय सिद्धसेन या शक्तीउपासक गुरूंनी बर्बरिकाला श्री कामाख्यादेवीला प्रसन्न करणार्या गुप्त मंत्राची दीक्षा देऊन त्याला शस्त्रविद्येचे ज्ञान दिले. बर्बरीकवर श्री कामाख्यादेवी प्रसन्न झाल्यामुळे त्याला अमोघ शक्तीने संपन्न असणार्या दिव्यास्त्रांची प्राप्ती झाली.

२ ए ४. कलियुगात दिलेली दीक्षा : कलियुगात दिलेल्या दीक्षेला ‘कलियुगात दिलेली दीक्षा’ असे म्हणतात.
२ ए ४ अ. गुरु समर्थ रामदासस्वामी आणि शिष्य छत्रपती शिवाजी महाराज : समर्थ रामदासस्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची परीक्षा घेऊन त्यांना सूक्ष्मातून दीक्षा देऊन शिष्य स्वरूपात स्वीकारले आणि त्यांना राजधर्म अन् क्षात्रधर्म यांचे ज्ञान दिले.

२ ए ४ आ. गुरु तोतापुरी आणि शिष्य रामकृष्ण परमहंस : रामकृष्ण परमहंस यांना त्यांचे गुरु तोतापुरी यांनी ध्यानयोगानुसार शिष्य स्वरूपात स्वीकारले. त्यानंतर त्यांनी ध्यानयोगातून रामकृष्ण यांची योगशक्ती किंवा कुंडलिनीशक्ती जागृत केली; परंतु रामकृष्ण यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी कुंडलिनीशक्तीच्या प्रवाहाच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. हा अडथळा गुरु तोतापुरी यांनी दूर करून रामकृष्ण यांची कुंडलिनीशक्ती सहस्रारारापर्यंत नेली. त्यामुळे रामकृष्ण यांना परमानंदाची प्राप्ती होऊन ते ‘परमहंस’ या उच्चतम आध्यात्मिक पदापर्यंत पोचले.
२ ए ४ इ. अनेक भागवत कथाकार संतांनी सामाईक दीक्षा देणे : सध्या अनेक ठिकाणी संत भागवत पुराण किंवा अन्य धार्मिक ग्रंथांतील कथा श्रोत्यांना सांगितल्यावर सर्वांनी मोठ्याने ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।’ किंवा ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । ’ हे नामजप सांगून दीक्षा देतात.
२ ऐ. वैयक्तिक किंवा सामूहिक स्तरावर दिलेली दीक्षा : दीक्षा वैयक्तिक स्तरावर आहे कि सामूहिक स्तरावर आहे, त्यानुसार तिला ‘वैयक्तिक स्तरावर किंवा सामूहिक स्तरावर दिलेली दीक्षा’, असे म्हणतात.
२ ऐ १. वैयक्तिक स्तरावर दिलेली दीक्षा : साधक किंवा शिष्य याला जेव्हा गुरु वैयक्तिक स्तरावर दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘वैयक्तिक स्तरावर दिलेली दीक्षा’, असे म्हणतात.
२ ऐ १ अ. गुरु देवर्षि नारद आणि शिष्य बालक ध्रुव : जेव्हा बालक ध्रुव श्रीविष्णूला शोधण्यासाठी वनात गेला, तेव्हा त्याची भेट नारदमुनींशी झाली आणि नारदाने त्याला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप सांगून त्याला दीक्षा दिली. त्यानंतर ध्रुवाने अत्यंत श्रद्धेने हा नामजप अनेक वर्षे केल्यावर त्याच्या तपस्येने नारायण प्रसन्न झाला आणि त्याने ध्रुवाला प्रत्यक्ष दर्शन देऊन वरदान दिले.
२ ऐ २. सामूहिक स्तरावर दिलेली दीक्षा : साधक किंवा शिष्य याला जेव्हा गुरु सामूहिक स्तरावर दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘सामूहिक स्तरावर दिलेली दीक्षा’, असे म्हणतात.

२ ऐ २ अ. गुरु देवर्षि नारद आणि शिष्य प्रजापति दक्षचे दहा सहस्र पुत्र : सत्ययुगात जेव्हा प्रजापति दक्षाचे दहा सहस्र पुत्र राजप्रासाद सोडून पृथ्वीवर राज्याचा विस्तार करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांची भेट नारदमुनींशी होते. नारद त्यांना जवळच असलेल्या ‘नारायण सरोवरात’ स्नान करण्यास सांगतात. दक्षपुत्रांनी सरोवरात स्नान केल्यावर त्यांचे मन आणि बुद्धी यांच्यावरील मायेचे आवरण दूर होते. ते नारदमुनींकडून संन्यासाची दीक्षा घेतात अन् भगवंताचे नामस्मरण करत वनात राहू लागतात. हे प्रजापति दक्षाला समजल्यावर तो नारदाला जिज्ञासेमुळे सतत असंतुष्ट रहाण्याचा आणि एके ठिकाणी अधिक काळ स्थिर न रहाता जिज्ञासेच्या पूर्तीसाठी संपूर्ण ब्रह्मांडात सतत विचरण करत रहाण्याचा शाप देतो.
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १८.९.२०२४)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/957739.html
|
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !