PRATAP SIMHA : इंदिरा गांधी यांनी आणलेल्या ‘सेक्युलर’ शब्दाच्या आधारे माझी याचिका रहित झाली ! – माजी भाजप खासदार प्रताप सिम्हा

धर्मांध मुसलमान लेखिका बानू मुश्ताक यांच्या विरोधातील याचिका रहित झाल्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – मैसुरू दसरा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी धर्मांध मुसलमान लेखिका बानू मुश्ताक यांना निमंत्रण देण्याला विरोध करणारी जनहित याचिका भाजपचे माजी खासदार प्रताप सिम्हा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली होती. एकूण ३ जणांनी प्रविष्ट केलेल्या स्वतंत्र जनहित याचिकांना उच्च न्यायालयाने रहित केले. अर्जदारांच्या कोणत्याही कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन झालेले नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना प्रताप सिम्हा यांनी ‘मी उच्च न्यायालयावर टीका करत नाही; पण इंदिरा गांधी यांनी आणलेल्या ‘सेक्युलर’ शब्दाच्या आधारे आमची याचिका रहित करण्यात आली’, अशा शब्दांत अप्रसन्नता व्यक्त केली.

व्यवस्थेला अंतर्मुख करायला लावणारी सिम्हा यांनी उपस्थित केलेली सूत्रे !

१. हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र धर्मस्थळविषयी अविश्वास निर्माण करणारा व्हिडिओ समीर नावाच्या व्यक्तीने बनवला होता; पण सत्र न्यायालयाने त्याला जामीन दिला. धर्मस्थळविषयी अपप्रचार करणारा महेश तिमरोडी हासुद्धा आरामात फिरत आहे.

२. मला न्याय मिळेल, अशी थोडीशी आशा होती; म्हणून मी उच्च न्यायालयात याचिका केली होती. उच्च न्यायालयाने ‘बानू मुश्ताक यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे’, या छोट्या कारणावरून माझी याचिका रहित केली.

३. अशोक चक्राखाली ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले आहे. उद्या कुणी त्या ‘सत्यमेव जयते’चा अपमान केला, तर ते योग्य होईल का ? ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ हे विधानही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि ‘सेक्युलर’च्या कारणास्तव काढणार का ? भारताच्या मूळ संस्कृतीला धक्का देणारे विधान जर ‘सेक्युलर’ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराखाली येते, तर मी काहीही बोलू शकत नाही.

४. नुकतेच काश्मीरमधील हजरत अली दर्ग्यात ‘अशोक चक्र’ आहे; म्हणून ते दगडाने तोडण्यात आले. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली येते का ?

५. मी न्यायालयाच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. माझी याचिका ‘सेक्युलरिझम’च्या चौकटीत रहित झाली, त्याच अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा वापर करून मी माझे मत व्यक्त करत आहे.