गोवा ही भोगभूमी नसून देवभूमी आहे !

‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्याने आणि सनातन संस्थेचे मुख्यालय असलेला आश्रम रामनाथी, फोंडा गोवा येथे असल्याने प्रारंभीपासून एक जिज्ञासा माझ्या मनात कायमच होती की, आश्रम गोव्यातच का ? काही काळानंतर मला कळले, ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज हे द्रष्टे संत होते. त्यांनी हा आश्रम उभारण्याच्या जवळजवळ १० वर्षे आधीच रामनाथी मंदिरात ते आलेले असतांना भक्तांना एका जागेकडे बोट दाखवून सांगितले होते की, येथे (गोव्यात) सनातनचा मोठा आश्रम होईल आणि तो सर्व जगाला अध्यात्माची शिकवण देईल.’ संतवचन ते ! सत्यात तर उतरणारच ! अगदी त्याच जागी आज गोव्यात सनातन संस्थेचा आश्रम उभा आहे. त्यांनी आश्रमासाठी गोव्याचीच निवड का केली असावी, या प्रश्नाचे उत्तर मला गोव्यात आल्यावरच कळले; परंतु गोव्यात येण्यापूर्वी गोव्याविषयी माझी ऐकीव माहिती ‘गोवा म्हणजे बीच (समुद्रकिनारा), बाई आणि बाटली’, या ३ गोष्टींपुरतीच मर्यादित होती. आज गोव्यात येऊन मला जवळजवळ २५ वर्षे झाली आहेत. ‘या २५ वर्षांत आता गोव्याची प्रसिद्धी अन्यत्र काय असेल ?’, या विचाराने मी सहज काही दिवसांपूर्वी ‘गूगल’वर शोधून पाहिले. मी ‘गूगल’ उघडून तेथे ‘गोवा’ असे टंकलेखन केले आणि त्यानंतर माझ्यासमोर जे आले, त्यामध्ये सर्वत्र समुद्रकिनार्‍यांची छायाचित्रे, आकर्षक पर्यटनस्थळे, हॉटेल्स, एक-दोन प्रसिद्ध चर्चेस, इतकेच नव्हे, तर फोंडा येथील सफा मशीदसुद्धा मला प्राधान्याने पहायला मिळाली आणि खाली खाली पहात येत असतांना शेवटी १-२ मंदिरांची छायाचित्रे दिसली. गोव्याच्या माहितीविषयीच्या सर्वप्रथम परिच्छेदात गोवा, म्हणजे उत्तम पर्यटन, समुद्रकिनारे आणि पोर्तुगीज संस्कृती असे काहीसे वाचायला मिळाले. यावरून लक्षात आले, ‘आजही गोव्याची खरी ओळख लोकांना नाहीच !’

मंगेशी मंदिर

१. गोव्यात येण्यापूर्वी त्याच्याविषयी ऐकलेली माहिती

२५ वर्षांपूर्वी जेव्हा मी महाराष्ट्रातील माझ्या गावाहून गोवा येथे अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी यायला निघालो, तेव्हा गावातील जाणत्या लोकांनी डोळे विस्फारले. काही जणांनी सांगितले, ‘‘गोवा हे ठिकाण चांगले नाही.’’ मला माहिती नसल्याने मी विचारले, ‘‘चांगले नाही म्हणजे काय ?’’ तेव्हा एकाने मला सांगितले, ‘‘तो प्रदेश ख्रिस्तीबहुल आहे. ते अधिकांश लोक दारूडे आहेत; कारण दारू स्वस्त मिळते, तसेच तेथे वेश्याव्यवसायही अधिक प्रमाणात आहे. लोक तिथे मौजमजा करायलाच जातात. समुद्रकिनारी हा सगळा बाजार चालतो.’’ हे ऐकल्यानंतर क्षणभर मी स्तब्ध झालो आणि विचारांमध्ये पडलो. काहींनी तर ‘गोव्यात ख्रिस्त्यांचे राज्य आहे आणि गोव्यात सनातन संस्थेचे मुख्यालय आहे, म्हणजे हे लोक हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवतात’, अशी आवईही उठवली. त्यामुळे स्वाभाविकपणे सनातन संस्थेला मोठ्या विरोधाला सामोरेही जावे लागले. अर्थात् गुरुकृपेने कालांतराने सनातन संस्थेचे समाज, राष्ट्र आणि धर्म हिताचे कार्य पाहून हा गैरसमज दूर झाला अन् विरोधही मावळला, हा भाग वेगळा; परंतु ‘आरंभीच्या काळात सनातन संस्थेचे कार्य गोव्यात चालू झाले आहे, याचा अर्थ लोक सांगतात, तशीच परिस्थिती असेल, असे नाही’, हा विचार करून मी गोव्याला आलो. अध्यात्म आणि धर्म प्रसाराच्या निमित्ताने प्रारंभीचा काही काळ गोव्याच्या काही तालुक्यांमध्ये मी गेलो आणि कालांतराने फोंडा येथील मुख्य कार्यालयात सेवारत झालो. आज ‘लोकांना जसा गोवा माहिती आहे, तसा तो नाही’, हे मी छातीठोकपणे आणि अनुभवांती सांगू शकतो.

२. गोव्याची अयोग्य प्रतिमा निर्माण होण्याची कारणे

श्री. योगेश जलतारे

याचे सर्वांत महत्त्वाचे कारण, म्हणजे वरील प्रकारे ‘गूगल’वर शोधून मिळणारी माहिती, जी पहिल्याच दृष्टीक्षेपात गोव्याची प्रतिमा केवळ पर्यटनाच्या अंगाने निर्माण करते. त्यानंतर आपण जेव्हा गोवा येथे उतरल्यावर येथील रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि विमानतळ येथे उतरतो, तेव्हा टॅक्सीचालक किंवा विविध उपाहारगृहांचे दलाल कोणत्या समुद्रकिनार्‍यावर किंवा उपाहारगृहात जाणार, याविषयी आपल्याला विचारतात. पणजी बसस्थानकावर उतरल्यावर बाहेरच्या परिसरात जर तुम्ही सहज फेरफटका मारला, तर थोड्या थोड्या अंतराने ‘कॅसिनों’चे दलाल तुम्हाला ‘कॅसिनो, कॅसिनो’, अशी विचारणा करतांना आढळतात. तेथून आपल्या गोव्यातील गंतव्याच्या ठिकाणी जायला निघतो, तेव्हा वाटेत ठिकठिकाणी आपल्याला कॅसिनोंची मोठमोठी विज्ञापने दिसतात. त्यामुळे ‘गोवा हे समुद्रकिनारे, उपाहारगृह, कॅसिनो असलेलेच राज्य आहे’, असे येथे प्रथमच येणार्‍या पर्यटकाला वाटते. त्यामुळे गोव्याची प्रतिमा मलीन होते.

काही ठिकाणी काही दलाल पर्यटकांची फसवणूक करतात, तर काही ठिकाणी पर्यटक उन्मत्तपणे वागतात, त्यामुळे वाद होऊन नंतर ते गोव्याची प्रतिमा डागाळतात. चित्रपटात ‘अंडरवर्ल्ड’ (गुन्हेगारी जगत), अमली पदार्थ यांची तस्करी यांचे ठिकाण सांगतांना चित्रपट निर्माते गोव्याचे नाव वापरतात. त्यामुळे तेथेही गोव्याची प्रतिमा खराब होते. गोव्याच्या प्रसिद्ध मद्याची तस्करी, अमली पदार्थ सापडण्याच्या घटनांच्या बातम्या वृत्तपत्रांत लगेचच झळकतात. अशा विविध कारणांमुळे ‘गोवा म्हणजे भोगभूमी आहे’, अशी काही प्रतिमा सामान्य माणसाच्या मनात निर्माण होते.

त्यामुळे वाचकांना आवर्जून सांगावेसे वाटते की, आपण गोव्याचा अभ्यास करतांना केवळ अशा गोष्टींच्या आधारे न करता आणखी खोलवर जाऊन करायला हवा. वरील अपप्रकार गोव्यात होत नाहीत, असे मी म्हणत नाही; परंतु या गोष्टींच्या प्रमाणाच्या तुलनेत धार्मिकतेचे प्रमाण अधिक आहे, म्हणजे गोव्यात अनुमाने २५ ते ३० टक्के भोगवादी लोक रहात असले, तरी जवळजवळ ७० टक्के समाज हा धार्मिक वृत्तीचा आहे. दुर्दैवाने आता हे प्रमाण न्यून होत असेलही; परंतु ‘गोवा शतप्रतिशत भोगभूमी नाही’, हे आपण समजून घेतले पाहिजे. गोव्यातील धार्मिकतेची काही उदाहरणे मी या लेखाद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतो, यातून वाचकांना गोवा समजून घ्यायला सोपे होईल.

३. गोव्याचा गौरवशाली इतिहास

पोर्तुगिजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले. या कालावधीत त्यांनी गोमंतकियांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना बाटवण्याचा प्रयत्न केला, मंदिरे तोडली, संस्कृतीहनन केले, लोकांना व्यसनाधीन बनवण्याचा प्रयत्नही झाला. असे असतांना वर्ष २०११ मध्ये केलेल्या जनगणनेनुसार गोव्यात जवळजवळ ६६ टक्के हिंदु लोकसंख्या आहे. या खालोखाल ख्रिस्ती लोकसंख्या २५ टक्के असली, तरी त्यांतील काही टक्के ख्रिस्ती हिंदु धर्मानुसारच आचरण करतात. साडेपंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात छोटी-मोठी असली, तरी मंदिरांची संख्या ६०० च्या आसपास आहे. ज्यांतील काही मंदिरे भव्य आणि सुंदर आहेत. यातून प्रदीर्घ काळ पोर्तुगिजांना कडवी झुंज देऊन, परकीय छत्राखाली राहून आणि अत्याचार सोसूनही गोमंतकीय लोकांनी त्यांचा धर्म अन् संस्कृती कशी जतन केली असेल, याची कल्पना येते. गोव्यात साक्षरतेचा दर जवळजवळ ९४ टक्के आहे. ‘गोवा परशुरामभूमी आहे’, हे सर्वश्रुत आहे. स्वामी विवेकानंद शिकागोला जाण्यापूर्वी ख्रिस्ती शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी गोव्यात येऊन गेल्याचे फार थोड्या लोकांना ठाऊक असावे.

‘भारतरत्न’ गानगोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, पद्मविभूषण गानसरस्वती किशोरी आमोणकर, स्वरसम्राज्ञी केसरबाई केरकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित अजित कडकडे यांच्यासारखे प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक ही संगीतप्रेमींना गोव्याची देण आहे. ‘मृत्यूंजयकार’ शिवाजी सावंत यांच्यासारखे लेखक, बा.भ. बोरकर यांच्यासारखे कविवर्य, मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. रघुनाथ माशेलकर हेही गोव्याचेच आहेत.

४. गोव्यातील मंदिरांची वैशिष्ट्ये

मुळातच परशुरामभूमी असल्याने गोव्यातील मंदिरे पुष्कळ पवित्र आणि सात्त्विक आहेतच; परंतु अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यातील मंदिरांची ४ ठळक वैशिष्ट्ये एका गृहस्थांनी मला सांगितली.

अ. एक म्हणजे येथील मंदिरे स्वच्छ आणि सुंदर आहेत. मंदिर परिसरात अस्वच्छता, दुर्गंध या समस्या आपल्याला येथे भेडसावत नाहीत.

आ. दुसरे म्हणजे येथील मंदिरातील पुजारी दर्शनार्थींना ‘पैसे द्या’, ‘अभिषेक करा’, अशी गळ घालतांना दिसत नाहीत.

इ. तिसरे गोव्याच्या मंदिर परिसरात भिकारी भीक मागत दर्शनार्थींना त्रस्त करत नाहीत.

ई. चौथे वैशिष्ट्य, म्हणजे गोव्याच्या अधिकांश मंदिरांमध्ये चपला चोरीला जाण्याचे प्रमाण नगण्य आहे.

ही ४ वैशिष्ट्ये गोव्यात प्रामुख्याने आपल्याला मंदिरांच्या परिसरात सहज अनुभवायला मिळतात.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम. (१६.६.२०२५)

संपादकीय भूमिका 

‘गोवा ही भोगभूमी नसून ती परशुरामभूमी आहे’, हे गोमंतकवासियांसह सर्वत्रच्या हिंदूंनी ठासून सांगणे आवश्यक !

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/958967.html