गोवा ही भोगभूमी नसून देवभूमी आहे !

‘आपण ‘गूगल’ उघडून तेथे ‘गोवा’ असे टंकलेखन केले आणि त्यानंतर आपल्यासमोर जे येते, त्यामध्ये सर्वत्र समुद्रकिनार्‍यांची छायाचित्रे, आकर्षक पर्यटनस्थळे, हॉटेल्स, एक-दोन प्रसिद्ध चर्चेस, इतकेच नव्हे, तर फोंडा येथील साफा मशीदसुद्धा प्राधान्याने पहायला मिळते आणि पुढे खाली खाली पहात येत असतांना शेवटी १-२ मंदिरांची छायाचित्रे दिसतात. गोव्याच्या माहितीत सर्वप्रथम परिच्छेदात गोवा, म्हणजे उत्तम पर्यटन, समुद्रकिनारे आणि पोर्तुगीज संस्कृती असे काहीसे वाचायला मिळाले. यावरून लक्षात आले, ‘आजही गोव्याची खरी ओळख लोकांना नाहीच !’

१४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोव्यात येण्यापूर्वी त्याच्याविषयी ऐकलेली माहिती, गोव्याचा गौरवशाली इतिहास आणि गोव्यातील मंदिरांची वैशिष्ट्ये’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                                   

(भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/956436.html

शांतादुर्गा मंदिर

५. गोव्यातील मंदिरांची अन्य धार्मिक वैशिष्ट्ये

५ अ. भारतात आणि विदेशात दूर दूर पसरलेल्या भक्तांनी कुलदेवतेची मंदिरे जपणे : गोमंतकियांनी पोर्तुगिजांपासून महत् प्रयासाने मंदिरे जपली. प्रसंगी काही मंदिरांचे सुरक्षित जागी स्थलांतर करून किंवा मूर्ती लपवून आणि नंतर पुन्हा मंदिरे बांधून ती जपली. त्यांनी केवळ पोर्तुगीज राजवटीत मंदिरांची जपणूक केली असे नाही. आजही गोव्यात जी मोठी मंदिरे आहेत, ती काही सरकार पुरस्कृत नाहीत. गोव्यातील अनेक मंदिरे गोमंतकियांच्या कुलदेवतेची मंदिरे आहेत. येथील लोकांनी कुलदेवतेची मनोभावे उपासना करत, स्वखर्चातून ही मंदिरे टिकवून ठेवली आहेत. त्यासाठी गोमंतकीय मागे-पुढे पहात नाहीत.

५ आ. मंदिराचे पावित्र्य जपणे : अन्य राज्यांमध्ये भाविकांकडून मंदिराच्या गर्भगृहात जाऊन देवतेच्या दर्शनाचा हट्ट केला जातो, तसे येथील लोक करत नाहीत. पुरोहित किंवा देवतेचे अर्चक सांगतील, त्याप्रमाणे मंदिरांचे पावित्र्य जपत गर्भगृहापासून लांब उभे राहून सर्वजण देवदर्शन करतात. गर्भगृहात जायचे झाल्यास सोवळे नेसून विशिष्ट अंतरावरून धार्मिक विधी केले जातात. मुख्य गर्भगृहात मुख्य अर्चक ब्राह्मणाविना अन्य कुणालाही प्रवेश नसतो. त्यामुळे येथील मंदिरांची सात्त्विकता आजही टिकून आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी मंदिरांचे विश्वस्त, मानकरी, अर्चक, धोंड, गुरव इत्यादी सर्वजण व्रतस्थ राहून, कडक सोवळे पाळून सर्व विधी करतात. देवाच्या सेवेत कुठलीही न्यूनता राहू नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात.

श्री. योगेश जलतारे

५ इ. मंदिरात मोठी धार्मिक अनुष्ठाने करणे : गोव्यातील मंदिरांचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य, म्हणजे येथे प्रत्येक गावातील मंदिरात आणि स्वतःच्या घरीही अनेक लोक मोठमोठी धार्मिक अनुष्ठाने करतात, यज्ञयागादी विधी करतात. त्यासाठी कितीही व्यय आला, तरी तो ते करता. दूरदूरचे ब्राह्मण बोलावून, त्यांचे योग्य आदरातिथ्य करून, त्यांच्या निवासाची व्यवस्था करून त्यांच्या शुभहस्ते यज्ञयागादी अनुष्ठाने केली जातात. ब्राह्मणांना अपेक्षित असे सर्व सोवळे जपत त्यांना अपेक्षित अशी सेवा केली जाते. ब्राह्मणांना हे लोक न्यून लेखत नाहीत. याउलट योग्य सन्मान करून ब्राह्मणांना दक्षिणाही दिली जाते. असे करतांना गोमंतकियांच्या मनात ‘आपण पुष्कळ व्यय करत आहोत किंवा ब्राह्मण अधिक दक्षिणा मागत आहेत’, असे विचार येत नाहीत, हेही एक वैशिष्ट्य आहे. मंदिरातील कार्यक्रम, जत्रोत्सव आणि अनुष्ठाने यांना येथील वृत्तपत्रेही मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देतात. या माध्यमातूनही ते त्यांची सेवा ईश्वरचरणी रूजू करतात.

५ ई. प्रत्येक मंदिरात धार्मिकता आणि संस्कृती यांचे संवर्धन केले जाणे : गोव्यातील प्रत्येक गावामध्ये बहुतांश छोट्या छोट्या मंदिरांमध्ये काही ना काही धार्मिक कार्यक्रम होतच असतात. तेथील स्थानिक लोक या कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होतात. आठवड्यातील विशिष्ट वारी मंदिरांमध्ये भजने गायली जातात. काही लोक दिवसाचा आरंभ देवळात देवाचे दर्शन घेऊनच करतात. देवाला गार्‍हाणे घालणे, म्हणजे अपेक्षित कृपा करण्यासाठी आळवणे, हे एक गोव्याचे चांगले प्रचलन आहे. या वेळी लोक देवाकडे स्वतःच्या कल्याणाची प्रार्थना करतात.

५ उ. मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणे : मागील २ वर्षांत हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संपूर्ण भारतभरात मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या लोकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी जनआंदोलन राबवले. या आंदोलनाला भरघोस यश मिळाले. त्यामुळे आता मंदिरात तोकडे आणि चित्रविचित्र कपडे घालून येण्याचे प्रमाण उणावले; परंतु गोव्यात मात्र म्हार्दाेळ येथील श्री मंगेश देवस्थान येथे वस्त्रसंहिता फार पूर्वीपासून लागू होती. यातून संस्कृती रक्षणासाठी येथील लोक पूर्वीपासूनच किती जागृत आहेत, हे लक्षात आले.

५ ऊ. देवाप्रतीचा गोमंतकियाचा भाव ! : गोव्यात एखाद्याला नवीन घर बांधायचे आहे, नवीन वाहन खरेदी करायचे आहे, मुलीचे लग्न करायचे आहे किंवा नोकरी व्यवसायाला आरंभ करायचा आहे, तर त्यासाठी लोक देवाला आधी कौल लावतात, म्हणजे संबंधित गोष्टीत अनुकूलता आहे कि नाही ?, ही गोष्ट देवाला विचारतात. त्यानंतरच त्या विषयात हात घालतात, हेसुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे.

गोव्यातील नागरिक स्वतःच्या अंगणात फुलझाडे आवर्जून लावतात आणि जवळच्या देवळात देवतेला फुले अर्पण करतात. काही वेळा झाडांना लागलेली फुले बाहेरूनच कुणी देवासाठी काढून नेली, तरी अनेक गोमंतकीय त्या व्यक्तीशी वाद घालत नाहीत. येथील गृहिणी शेजारच्या गृहिणीला प्रतिदिन गजरा किंवा फुल आवर्जून आणून माळायला देतात. असे करतांना ‘आपण देवीला गजरा किंवा फुल अर्पण करत आहोत’, असा त्यांचा भाव असतो. यातून देवतेप्रतीचा भाव आणि इतरांविषयीचे प्रेम यातून प्रकट होते.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम.