नांदेड येथील वर्कशॉपमध्ये झालेला स्फोट, समझौता एक्सप्रेसमधील स्फोट आणि मालेगाव स्फोट या प्रत्येक स्फोटातील आरोपीची कहाणी थोड्या फार तफावतीने एकच आहे, ‘भगव्याचा टोकाचा द्वेष’ हाच या सगळ्या घटनांना जोडणारा दुवा होता. ‘हिंदु आतंकवादा’चा आरोप सिद्ध होईल’, अशी जबानी देण्याची बळजोरी झाल्याचा आरोप केवळ या प्रकरणातील आरोपींनीच केला, असे नाही, तर काही अन्वेषण अधिकार्यांनीही याला दुजोरा दिला आहे. आता ‘हे सगळे आरोपी निर्दोष सुटले, म्हणजे न्याय झाला’, असे नाही. भगव्या आतंकवादाचा खोटा बागूलबुवा उभा करून निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्या प्रत्येकाला कायद्यासमोर आणून शिक्षा ठोठावल्याविना खरा न्याय झाला, असे म्हणता येणार नाही.

१. हिंदुत्वाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी काँग्रेसने विणलेले मायावी जाळे
मालेगाव येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांमधील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली अन् या स्फोटाच्या आधारे काँग्रेस सरकारने उभ्या केलेल्या भगव्या आतंकवादाच्या मायाजालाचे वास्तव जगासमोर आले. मालेगाव खटल्याचा स्वतंत्र आणि वेगळा विचार करता येत नाही; कारण हा खटला, म्हणजे हिंदुत्वाच्या विचारांना कायमचे गाडण्यासाठी आणि आपले प्रमुख स्पर्धक असलेल्या हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना अडकवण्यासाठी काँग्रेसने विणलेल्या मायावी जाळ्याचा एक भाग होता. या विषारी कारस्थानाची पार्श्वभूमी काय, त्याचा प्रारंभ कसा झाला, त्याची योजना कुणी आणि कशी आखली, हे समजून घेतल्याविना या खटल्याचे अन् न्यायालयाच्या निर्णयाचे खरे महत्त्व लक्षात येत नाही.
हिंदुत्वाच्या विचाराला देशाच्या सामाजिक, राजकीय, वैचारिक परिघाबाहेर ढकलून देऊन बेदखल करण्याची आवश्यकता का भासली, हे समजून घेण्यासाठी काँग्रेसला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतका राग कशासाठी हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. काँग्रेसला खरे तर गांधी-नेहरूंच्या काँग्रेसला डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, राजाजी, जयप्रकाश यांच्यासारख्या अनेकांनी वेळोवेळी टोकाचा विरोध केला; पण सावरकर यांचा जो कमालीचा द्वेष आणि तिरस्कार काँग्रेसने केला, तसा इतर कुणाच्याही वाट्याला आला नाही. याचे कारण शोधले की, सावरकरांकडे ज्याचे पितृत्व जाते, त्या हिंदुत्वाच्या विचारांची काँग्रेसला इतकी भीती का वाटते, हे लक्षात येते.
२. स्वातंत्र्यपूर्वकाळात काँग्रेसचा असलेला प्रभाव आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणार्या सशस्त्र क्रांतीकारकांचा प्रवाह
स्वातंत्र्यपूर्व काळाच्या प्रारंभीला काँग्रेसमध्ये डाव्या (साम्यवादी), उजव्या, मध्यममार्गी अशा सगळ्या विचारधारांचा समावेश होता, ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या एका विचाराने एकत्र आल्या होत्या; पण गांधीजींच्या हाती सगळी सूत्रे गेल्यानंतर गांधी-नेहरू यांची एकमेव विचारधारा काँग्रेसमध्ये उरली. सुभाषबाबू, राजाजी, श्यामाप्रसाद मुखर्जी, जयप्रकाश या प्रभुतींना क्रमाक्रमाने दूर व्हावे लागले किंवा दूर करण्यात आले. शेवटी तर गांधींचा विचारही पुसून टाकून केवळ नेहरूप्रणित ‘आयडिया ऑफ इंडिया’ (कल्पनेतील भारत) आणि त्यांच्या कुटुंबाचे राज्य तेवढे शिल्लक राहिले.

स्वातंत्र्य चळवळीतील गांधी-नेहरूंच्या काँग्रेसचा हा प्रवाह वगळता इतर दोन प्रवाह अस्तित्वात होते. यातील पहिला प्रवाह म्हणजे वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्यासारख्या सशस्त्र क्रांतीकारकांचा. या मार्गाला सैद्धांतिक आधार आणि वैचारिक नेतृत्व पुरवले, ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ! इंग्लंडमध्ये शिकत असतांना सावरकर यांनी युरोपमधील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आवाज जगभर पोचवला आणि सशस्त्र क्रांतीकारक हे कुणी माथेफिरू नाहीत, तर सुस्पष्ट विचारधारा असलेले देशभक्त आहेत, हे दाखवून दिले. त्यांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाने सुभाषबाबू यांच्यापासून भगतसिंग यांच्यापर्यंत सगळ्या क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. म्हणूनच सावरकर यांच्यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर आरोप असलेल्या अनेक क्रांतीकारकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सूट देणार्या ब्रिटिशांनी सावरकर यांना नेहमीच सर्वाधिक कठोर वागणूक दिली; कारण क्रांतीकारकांचा वैचारिक स्रोत सावरकर हाच असल्याचे त्यांना पुरते ज्ञात होते.
स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसविना दुसरा प्रवाह, म्हणजे ब्रिटिशांसाठी लढणार्या हिंदी सैन्याला स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचा गदर चळवळ किंवा आझाद हिंद सेना यांचा मार्ग. यांपैकी गदर चळवळीचे प्रणेते लाला हरदयाल आणि त्यांचे व्ही.व्ही.एस्. अय्यर, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्यासारखे सहकारी सावरकर यांच्या विचारांनी भारावलेले त्यांच्या ‘अभिनव भारत’चे सदस्य होते. जनरल मोहनसिंग यांच्यासह आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे रासबिहारी बोस हेही सावरकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते. त्यांनी जपानमध्ये हिंदु महासभेची शाखा स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि स्वतंत्र भारताचे नेतृत्व सावरकर यांनी करावे, अशी इच्छाही प्रदर्शित केली होती. जपानच्या ताब्यातील भारतीय युद्धकैद्यांना घेऊन ‘आझाद हिंद सेना’ स्थापन करण्याची योजना रासबिहारी यांची होती आणि तिचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी सुभाषबाबूंना निमंत्रण दिले होते. ही कल्पना प्रत्यक्षात यावी, यासाठी भारतीय तरुणांनी सैन्यात शिरून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घ्यावे, असा प्रचार सावरकर करत होते. त्यासाठी त्यांच्यावर ‘ब्रिटिशांचे एजंट (दलाल)’ असल्याचे बिनडोक आरोपही झाले.
३. सावरकर स्पर्धक होऊ नयेत; म्हणून नेहरूंनी त्यांना विविध प्रकारे दिलेला त्रास

अशा रितीने काँग्रेसच्या प्रवाहापेक्षा वेगळे दोन्ही विचार आणि त्याआधारे उभ्या राहिलेल्या प्रभावी चळवळी यांची सैद्धांतिक बैठक सावरकर यांनी पुरवली होती. यामुळे सावरकर यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार हाच एक ना एक दिवस आपला स्पर्धक ठरणार, याची काँग्रेसला आणि विशेषतः नेहरूंना पूर्ण कल्पना होती. वर्ष १९४६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये हिंदु महासभेला १६ टक्के मते मिळाली. जागा फारशा मिळाल्या नसल्या, तरी स्वातंत्र्याचे मंतरलेले वातावरण आणि काँग्रेसचा त्या वेळचा प्रभाव लक्षात घेता ही मते दुर्लक्ष करण्यासारखी नक्कीच नव्हती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी झालेली फाळणी, उसळलेल्या दंगली आणि पाकिस्तानातील हिंदूंच्या कत्तली यांमुळे वातावरण झपाट्याने पालटले. त्या वेळी पाकिस्तानातून आलेल्या हिंदु-शीख निर्वासितांविषयी गांधी-नेहरूंनी अत्यंत असंवेदनशील वर्तन केल्यामुळे आणि काश्मीरवर पाकिस्तानने आक्रमण करूनही ‘भारताने त्यांना ५५ कोटी रुपये द्यावेत’, यासाठी गांधींनी उपोषणाचे अस्त्र उपसल्यामुळे गांधी अन् नेहरू यांची लोकप्रियता झपाट्याने घसरू लागली. वर्ष १९५२ च्या निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा विचार आणि हिंदु महासभा हा पक्ष काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे करील, अशी चिन्हे दिसू लागली. अशा वेळी नेहरूंना दैवाची मोठीच साथ लाभली. नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या करून हिंदुत्वाच्या विचाराला आणि चळवळीला ५० वर्षे मागे ढकलून दिले. याचा पुरेपूर लाभ घेत नेहरूंनी हिंदुत्वाचा विचार आणि सावरकर यांचे नेतृत्व कायमचे गाडण्यासाठी भराभर पावले उचलली. सावरकर यांना गांधी हत्येच्या खटल्यात अडकवण्याचा नेहरूंनी आटोकाट प्रयत्न केला. याची कल्पना त्या वेळचे कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावरकर यांचे अधिवक्ता भोपटकर यांना दिली होती. न्यायालयाने सावरकर यांची निर्दोष मुक्तता केली, तरी संशयाचे ढग कायम रहातील, याची पुरती खबरदारी घेतली गेली. तरीही मनातील भीती पुरती न संपल्यामुळे नेहरूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली यांच्या भेटीच्या वेळी ‘मित्र राष्ट्राच्या प्रमुखाविरुद्ध विधाने करणार्या’ सावरकर यांना ४ एप्रिल १९५० या दिवशी पुन्हा अटक केली आणि भारतमातेच्या या महान सुपुत्राला स्वतंत्र भारतात १०० दिवस तुरुंगात ठेवल्यानंतर १३ जुलै १९५० या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली. या वेळी एक वर्षापर्यंत कुठल्याही राजकीय हालचालींमध्ये भाग न घेण्याची अट त्यांच्यावर लादून वर्ष १९५२ च्या निवडणुकांपासून ते लांब रहातील, याची खात्री करण्यात आली.
४. हिंदुत्वाविषयी टोकाचा विद्वेष निर्माण करून काँग्रेसने सुखनैव राज्य करणे

यानंतर साम्यवाद्यांना शिक्षण, इतिहास, साहित्य, प्रसिद्धमाध्यम ही क्षेत्रे आंदण म्हणून देऊन त्यांची सोय लावण्यात आली. त्यांचा उपद्रव वाढतो आहे, असे दिसताच ‘लोकशाहीवादी’ नेहरूंनी त्यांचे केरळमधील सरकार एका फटक्यात बरखास्त केले. समाजवाद्यांपैकी अशोक मेहतांसारखे साथी काँग्रेसच्या वळचणीला आले, तर जयप्रकाश प्रभृती राजकारणातून दूर झाले. हिंदुत्वाविषयी टोकाचा विद्वेष आणि विखार निर्माण करून त्यांना नियंत्रणात ठेवत काँग्रेसने सुखनैव राज्य केले. कधी जनता पक्षासारखा प्रयोग झालाच, तर ते आपापसांतील विसंवादातून कोसळणार आणि सूत्र पुन्हा आपल्या हाती येणार, याची त्यांना खात्री होती. किंबहुना ‘असंतोषाच्या वाफेला अधूनमधून वाट मिळावी, यादृष्टीने अशी पांगळी सरकारे कधी तरी आली, तरी हरकत नाही, आपल्याला हवे तेव्हा त्यांना खाली खेचून आपण सत्ता हस्तगत करू शकतो’, असा विश्वासच काँग्रेसला वाटत असावा; पण नेहरूंच्या मनातील हिंदुत्वाची भीती रामजन्मभूमी आंदोलनाच्या आणि वर्ष १९९९ मध्ये आलेल्या अटल वाजपेयी यांच्या भाजप सरकारच्या रूपात काँग्रेससमोर दत्त म्हणून उभी राहिली.
५. ‘भगव्या आतंकवादा’चा उगम
हे सरकार कोसळले, तर नाहीच; पण यशस्वीरित्या ५ वर्षे पूर्ण करून ‘वर्ष २००४ मध्ये पुन्हा हेच सरकार येणार’, अशी चिन्हे दिसू लागली. पोटात भीतीचा गोळा आलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली आणि वर्ष २००४ च्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागून संयुक्त पुरोगामी आघाडीचे (‘यूपीए’चे) सरकार मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि सोनिया गांधींच्या अधिपत्याखाली स्थापन झाले. हिंदुत्वाचा दणका आमची काय अवस्था करू शकतो, हे ध्यानात आलेल्या काँग्रेसने आता मात्र कुठलाही धोका पत्करायचा नाही, हे पक्के ठरवले.
त्यांच्या पाताळयंत्री चौकडीने आखलेल्या योजनेनुसार हे ठरले की, हिंदुत्वावर गांधी हत्येच्या तोडीचे असे किटाळ आणायचे की, त्या धक्क्यातून सावरण्याची संधीच हिंदुत्ववादाला मिळणार नाही. एकदा हा विचार पुरता कलंकित झाला की, पुढील किमान ५० वर्षे आपण सुखनैव राज्य करू शकू, याची त्यांना खात्री होती. या विषारी योजनेचे नाव होते ‘भगवा आतंकवाद’ !
६. ‘हिंदु आतंकवाद’ दर्शवण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून विविध माध्यमांतून रचण्यात आलेली कथानके
एखादा ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) उभे करायचे ठरले की, माध्यमे, चित्रपट यांसारख्या माध्यमातून त्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करण्याच्या तंत्रावर काँग्रेस-साम्यवादी यांची विलक्षण हुकूमत आहे. त्यानुसार ‘हिंदु आतंकवाद’ आणि त्यात सामील असलेला भारतीय सैन्यातील अधिकारी हे कथानक असलेले अनेक चित्रपट अचानक सिद्ध होऊ लागले. वर्ष २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेते शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटात ‘भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करात सुसंवाद असावा, यासाठी ‘प्रोजेक्ट मिलाफ’ या प्रकल्पाची आखणी केलेली असते; पण भारत अन् पाकिस्तान यांच्यामध्ये मैत्री होऊ नये, यासाठी अभिनेते सुनील शेट्टीने उभा केलेला हिंदुत्वनिष्ठ मेजर राघवन आतंकवादी कारवाया करून हा प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ देत नाही’, असे चित्रण करण्यात आले. वर्ष २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शौर्य’ या चित्रपटात के.के. मेनन याने रंगवलेला ‘हिंदुत्वनिष्ठ ब्रिगेडियर रुद्रप्रताप सिंग हा आतंकवादी कारवाया करून मुसलमानांच्या कत्तली करतो’, असे दाखवले गेले. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर खान यांनी केले होते, तर निर्मिती ‘मोझर बेअर’ या आस्थापनेचे होते. या आस्थापनाचे प्रमुख दीपक पुरी हे काँग्रेस नेते कमलनाथ यांचे मेहुणे असावेत, हा एक सोयीस्कर योगायोग ! पाकिस्तानी सैन्य आणि ‘आय.एस्.आय.’चे अधिकारी हे ‘जैश ए महंमद’, ‘लष्कर ए तोयबा’ यांच्या आतंकवादी कारवायांमध्ये उघडपणे सहभागी असतात, हे सर्वज्ञात आहे. ‘तेथील मुसलमान आतंकवादी, तसेच येथील हिंदु आतंकवादी, पाकिस्तानी आणि भारतीय सैन्य सगळे सारखेच…’, हा विचार भारतियांच्या मनात रुजवण्यासाठी आणि खोटे चित्र पुढे उभे करण्यासाठीची ही पूर्वसिद्धता होती.
७. भगव्या आतंकवादाविषयी गृहखात्याचे अवर सचिव आर्.व्ही.एस्. मणी यांच्या पुस्तकातून झालेला खुलासा
‘यूपीए’ सरकारच्या काळात देशभरातील विविध ठिकाणी होणारी आतंकवादी आक्रमणे आणि बाँबस्फोट ही नित्याची घटना ठरली होती. २९ ऑक्टोबर २००५ या दिवशी देहलीत पहाडगंज, गोविंदपुरी, काल्काजी आणि सरोजिनी नगर मार्केट येथे एकाच दिवशी झालेले बाँबस्फोट, डिसेंबर २००५ मध्ये बेंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ येथे झालेले आक्रमण, ७ मार्च २००६ या दिवशी वाराणसीतील संकटमोचन हनुमान मंदिरात झालेला बाँबस्फोट, जून २००६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेले आतंकवादी आक्रमण, या घटनांनंतर जून २००६ मध्ये गृहखात्याचे अवर सचिव श्री. आर्.व्ही.एस्. मणी यांना गृहमंत्री शिवराज पाटील यांनी त्यांच्या दालनात बोलावून घेतले. या प्रसंगाचे वर्णन श्री. मणी यांनी त्यांच्या ‘द मिथ ऑफ हिंदु टेरर’ या पुस्तकात केले आहे. ते लिहितात, ‘या बैठकीत गृहमंत्री फारसे काही बोललेच नाहीत. सगळे संभाषण तिथे उपस्थित असलेल्या इतर दोन व्यक्तींशीच चालू होते. त्यापैकी एक होते मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, तर दुसरे होते महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी हेमंत करकरे.’ या दोघांमध्ये अत्यंत जवळचे आणि मैत्रीचे संबंध असल्याचे श्री. मणी यांना जाणवले. ‘गुप्तचर संस्थांच्या अहवालात वरील सर्व आतंकवादी आक्रमणांमध्ये मुसलमान आतंकवाद्यांचेच उल्लेख येत असल्याकारणाने या दोघांनी अप्रसन्नता व्यक्त केली. त्यांच्या बोलण्यात नांदेड आणि बजरंग दल यांचे उल्लेख वारंवार येत होते. एका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शेजारच्या राज्यातील एक पोलीस अधिकारी यांच्यात इतकी जवळीक असणे अन् गृहमंत्र्यांसह होणार्या बैठकीत या पोलीस अधिकार्याने सहभागी होणे’, हे सगळेच विचित्र असल्याचे श्री. मणी नमूद करतात.
८. ‘हिंदु आतंकवाद’ ठरवण्यासाठीचे षड्यंत्र फसणे
२० एप्रिल २००६ या दिवशी नांदेड येथील श्री. समीर कुळकर्णी यांच्या वर्कशॉपमध्ये एक स्फोट झाला. श्री. कुळकर्णी हे अधूनमधून बजरंग दलाच्या कार्यालयात जातात, असे आढळल्यामुळे ‘हिंदु आतंकवाद’ असा उल्लेख झालेली ही पहिलीच घटना ठरली. या स्फोटाचे अन्वेषण ‘सीबीआय’कडे देण्यात आले. अन्वेषणात असे आढळले, ‘व्यवसायात मंदी असल्याने विम्याची रक्कम मिळवण्यासाठी श्री. कुळकर्णी यांनी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्फोट घडवून आणला. हा अहवाल पालटून हा बजरंग दलाने घडवलेला हिंदु आतंकवादी स्फोट होता’, असा अहवाल द्यावा, यासाठी सीबीआयवर मोठा दबाव आणण्यात आला; पण सार्वजनिक मालमत्तेची आणि जीविताची कुठलीही हानी न झालेला, तसेच स्वतःच्याच वर्कशॉपमध्ये घडवण्यात आलेला हा स्फोट, म्हणजे आतंकवादी आक्रमण असा अहवाल देणे अशक्य असल्याचे सीबीआय अधिकार्यांनी सांगितले. ‘हे प्रकरण हाताळणारा एक अधिकारी सीबीआयचा पुढील संचालक होणार’, अशी चर्चा होती; पण शिक्षा म्हणून त्याला ही संधी नाकारण्यात आली.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)
संपादकीय भूमिका‘खोटा बागुलबुवा करून निर्दोष देशभक्तांना नरकयातना भोगायला लावणार्या प्रत्येकाला शिक्षा ठोठावल्याविना खरा न्याय झाला’, असे म्हणता येणार नाही ! |
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/956428.html
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?