श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी ऐन नवरात्रीत देणगी ‘दर्शन पास’च्या शुल्कात वाढ !

 सुविधेच्या नावाखाली भाविकांची लूट !

तुळजापूर, १३ सप्टेंबर : श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी नवरात्रीच्या काळात राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या काळात भाविकांना सुलभ दर्शन कसे होईल ?, यासाठी प्रयत्न न करता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ‘देणगी दर्शन पास’च्या शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे.

२०० रुपयांचा देणगी पास ३०० रुपये, ५०० रुपयांचा देणगी पास थेट १ सहस्र रुपये, ‘विशेष अतिथी दर्शन पास’ २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला आहे. हे नवीन दर २० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीसाठी लागू करण्यात आले आहेत. मंदिर संस्थानाने ‘नवरात्रीच्या काळात भाविकांची गर्दी वाढते’, असे कारण पुढे केले आहे. ‘भाविकांना जलद दर्शन होण्याच्या नावाखाली करण्यात आलेली ही वाढ, म्हणजे मंदिर संस्थानने सुविधा देण्याच्या नावाखाली भाविकांची केलेली लूट आहे’, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

‘देणगी दर्शन पास’च्या शुल्कात भरमसाठ वाढ

पैसे घेऊन ‘विशेष अतिथी दर्शन पास’ ही संकल्पनाच चुकीची ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

श्री. सुनील घनवट

खरेतर सशुल्क दर्शनसेवा हा प्रकारच चुकीचा आहे. सशुल्क दर्शनसेवेमुळे भाविकांमध्ये भेदभाव निर्माण होतो. दूरवरून येणार्‍या ज्या भक्तांकडे ३०० ते ५०० रुपये नाहीत, त्यांनी काय करायचे ? देवाच्या दृष्टीने ‘गरीब-श्रीमंत’ सर्व समान असल्याने प्रत्येकासाठी दर्शनाची पद्धत सारखीच असणे अपेक्षित आहे. केवळ उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे आस्थापन आहे का ?, याचा विचार मंदिर संस्थानने केला पाहिजे. ‘देवीला भावभक्तीयुक्त अंत:करणाने दर्शन घेणे आवडेल कि पैसे देऊन दर्शनाला भाविक आलेला आवडेल ?’, याचा देवस्थान समितीने विचार करावा. प्रत्येक वेळी हिंदूंचे सण आले की, शुल्क वाढवले जाते, हे अत्यंत चुकीचे आणि अन्यायकारक आहे. तरी ‘हे शुल्क मागे घ्यावे, तसेच ‘सशुल्क दर्शनसेवा’ हा प्रकार कायमस्वरूपी बंद व्हावा’, अशी मंदिर महासंघाची मागणी आहे.

शुल्कदर्शन म्हणजे देवीभक्तांची श्रद्धा आणि भावना पायदळी तुडवून देवच हिरावून घेण्याचा प्रकार ! – अमरराजे कदम-परमेश्वर,अध्यक्ष, श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ

श्री. अमरराजे कदम-परमेश्वर

या शारदीय नवरात्रोत्सवात ‘व्ही.आय.पी.’ दर्शनाआड मंदिर संस्थानने पूर्वीच्या शुल्कामध्ये प्रचंड दरवाढ करून देवीभक्तांची श्रद्धा आणि भावना पायदळी तुडवून देवच सर्वसामान्यांकडून हिरावून घेतलेला आहे. मुळात मंदिर संस्थानने सर्वसामान्य भाविकांना विचारात घेऊनच त्यांना सुलभतेने देवीचे दर्शन कसे घेता येईल ?, हे न पहाता केवळ आर्थिक उत्पन्नाचे स्रोत म्हणून शुल्क दर्शनाची प्रथा चालू केली आहे, याचा ‘भोपे पुजारी मंडळ’ जाहीर निषेध करत आहे.

संपादकीय भूमिका

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !