आजपासून प्रत्येक गुरुवारी वाचा….
लेखांक १
‘भारतीय कला या उपासनेसाठीच आहेत; परंतु आज गायन, वादन आणि नृत्य या कला म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येतो, एखाद्या मैफिलीत गायन करणारा गायक, वाद्य वाजवणारा वादक किंवा रंगमंचावर नृत्य साकारणारी एखादी नर्तिका ! याच समवेत नाट्य म्हटले, तर रंगमंचावर एखादी कलाकृती अभिनयाद्वारे सादर करणारी व्यक्तीरेषा आपल्या समोर येते.
आज समाजाला ‘कला म्हणजे केवळ ‘कलांचे सादरीकरण (Performing arts)’, एवढेच समीकरण ठाऊक आहे; परंतु ‘कलेचा उद्देश केवळ कलेचे सादरीकरण करणे एवढाच आहे का ? शास्त्रात दिल्याप्रमाणे कला आणि अध्यात्म नेमके जोडावे तरी कसे ?’, असे प्रश्न आपल्याला पडू शकतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी समाजाला ‘केवळ कलेसाठी कला नाही, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’, ही दिशा दिली आहे. कलाकारांना कलेच्या या मूळ उद्देशाकडे नेण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना केली आहे.
‘कलाकाराला ‘मनोरंजनाकडून आत्मरंजनाकडे’ जाण्याची प्रत्यक्ष दिशा मिळावी’, या उद्देशाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आजच्या श्री वामन जयंतीच्या शुभपर्वावर ही लेखमाला ४ सप्टेंबरपासून प्रत्येक गुरुवारी आपल्याला नियमित वाचायला मिळणार आहे.
कला आणि अध्यात्म यांचा संबंध
‘पुरातन काळापासूनच भारतीय संगीत, नृत्य आणि नाट्य या कला अन् अध्यात्म यांचा गहन संबंध आहे. डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक म्हणतात, ‘संगीत हा आत्म्याचा हुंकार असून परमात्म्याचा ‘ॐ’कार आहे.’ ‘संगीत ही आपल्या आत्म्याची भाषा आहे’, असे अमेरिकन निबंधकार खलिल जिब्रान यांनी म्हटले आहे. ‘अध्यात्म हा आत्मशोधाचा मार्ग आहे’, असे आपल्या शास्त्रात दिले आहे.
संगीत, नृत्य, नाट्य या सर्व कला केवळ मनोरंजनासाठी नाहीत, तर जिवांच्या उन्नतीसाठी आहेत. साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीचा मार्ग असून भारतीय परंपरेत कला ही साधना आहे.
१. भारतीय तत्त्वज्ञानात सांगितलेला कला आणि अध्यात्म यांचा संबंध
भारतीय तत्त्वज्ञानात कलेला पुष्कळ व्यापक अर्थाने पाहिले आहे. कला म्हणजे कलाकारातील वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य व्यक्त होणे. यात कलाकाराच्या (भौतिक जीवनातील) मायेतील अनुभवातून दिव्य आत्मानुभूतीकडे जाण्याचा प्रवास असतो आणि त्यात रसनिष्पत्तीला अनन्यसाधारण महत्त्व असते. अशी कलेची दिव्य अभिव्यक्ती कलाकाराला आणि प्रेक्षकालाही ईश्वरी तत्त्वाची अनुभूती देते. ही दैवी अनुभूती प्राप्त करणे, म्हणजेच कलेतून होणारी ईश्वरप्राप्तीकडे वाटचाल होय, उदा. भारतातील कोणत्याही प्राचीन मंदिरात गेल्यावर तेथील देवतेच्या मूर्तीकडे पाहून भाविकाची क्षणात भावजागृती होते आणि त्याला ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होऊन तो अंतर्मुख होतो. येथे मूर्तीकार त्याच्या कलेतून ईश्वराची आराधनाच करत असतो आणि त्याच्या आराधनेतून भाविकांना देवत्वाची अनुभूती आलेली असते. असेच गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या प्रयोगात्मक कलांच्याही संदर्भात घडते.
भारतीय तत्त्वज्ञानात ‘कला’ म्हणजे ईश्वराशी जोडण्याचा महत्त्वाचा दुवा मानला गेला आहे; म्हणूनच कला आणि अध्यात्म हे एकमेकांच्या पुष्कळ जवळचे आहेत.

२. शास्त्रांमध्ये सांगितलेला कला आणि अध्यात्म यांचा संबंध
२ अ. गायन : गायन हा ईश्वरप्राप्तीसाठीचा एक मार्ग आहे. हे जिवातील आध्यात्मिक ऊर्जेला जागृत करण्याचे माध्यम आहे. जेव्हा गायनातील स्वर अंतरंगातून आर्तभावाने उमटतात, तेव्हा ते थेट परमेश्वराशी संवाद साधतात.
२ आ. वादन : भारतीय आध्यात्मिक परंपरेत संगीताला ‘नादब्रह्म’ म्हटले आहे, म्हणजेच संपूर्ण विश्व हे नादातून उत्पन्न झालेले आहे. बासरी, वीणा, सतार, मृदंग, यांसारख्या वाद्यांच्या माध्यमांतून नादब्रह्माची उपासना करून आपण त्या मूळ नादाशी (नादब्रह्माशी) एकरूप होऊ शकतो.
२ इ. नृत्य : ज्याप्रमाणे यज्ञामध्ये हविर्भाग (टीप) अर्पण करून ईश्वराला प्रसन्न केले जाते, त्याप्रमाणे नृत्याच्या माध्यमातून पदसंचालन, मुद्रा, अभिनय हे साधनास्वरूप हविर्भाग ईश्वरचरणी अर्पण करणे म्हणजेच नृत्य-यज्ञ किंवा नृत्य-आराधना होय. या आराधनेच्या माध्यमातून कलाकार आणि प्रेक्षक दोघेही भावविश्वात रममाण होऊन ईश्वराची अनुभूती घेतात.
टीप – हविर्भाग : यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणारी सामुग्री
२ ई. नाट्य : ‘नाट्य’ हा साकार भक्तीयोगच आहे. जेव्हा नाट्य ही केवळ कला न रहाता अंतर्मनातून केलेली उपासना होते, तेव्हा कलाकार नाट्यकलेतून ईश्वराचे सामीप्य (सान्निध्य) अनुभवतो.
‘या लेखमालेच्या माध्यमातून समस्त कलाप्रेमी जिवांना कलेच्या माध्यमातून आत्मोद्धाराची प्रेरणा मिळो’, हीच श्री गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.
(या लेखमालेच्या पुढील काही भागांत आपण शास्त्रात दिलेल्या कलांच्या विविध परिभाषा आणि कला-उपासकाला साधना म्हणून उपयुक्त अशा कलांच्या आध्यात्मिक परिभाषा पहाणार आहोत.)
– सुश्री तेजल पात्रीकर (संगीत विशारद)(आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.८.२०२५)
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/955400.html
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !