‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमातून प्रक्षेपित झालेल्या क्षात्रतेजयुक्त स्पंदनांचा महोत्सवाला उपस्थित साधक-श्रोत्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होणे

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून फर्मागुडी (गोवा) येथील ‘इन्फिनिटी’ मैदानावर १७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. महोत्सवात पहिल्या दिवशी (१७.५.२०२५ या दिवशी) दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ या वेळेत झालेल्या ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमात देशभरातील अनेक संत सहभागी झाले. संतांनी उपस्थितांना राष्ट्र आणि संस्कृती रक्षणार्थ वीरश्रीयुक्त मार्गदर्शन केले. या सत्रात काही हिंदुत्वनिष्ठही सहभागी झाले होते. ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमाचा श्रोत्यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

१. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन

सौ. मधुरा कर्वे

‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांपैकी ४ साधक आणि ४ साधिका या संशोधनात्मक प्रयोगात सहभागी झाले. या सर्वांची कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमानंतर छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

१ अ. ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमाचा साधक-श्रोत्यांवर सकारात्मक परिणाम होणे : कार्यक्रमापूर्वी प्रयोगातील ३ साधक आणि ३ साधिका यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली; पण कार्यक्रमानंतर ती नाहीशी झाली. प्रयोगातील साधक अन् साधिका यांच्यामध्ये कार्यक्रमापूर्वी सकारात्मक ऊर्जा होती आणि कार्यक्रमानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. या चाचण्यांतील नोंदी पुढे दिल्या आहेत.

१ अ १. निष्कर्ष : ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमातून प्रक्षेपित झालेली क्षात्रतेजयुक्त स्पंदने प्रयोगातील साधक आणि साधिका यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे ग्रहण केली. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. यातून ‘या कार्यक्रमाचा साधक-श्रोत्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाले’, असे लक्षात येते.

१ आ. ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमाचा मान्यवर वक्त्यांवरही सकारात्मक परिणाम होणे : ‘या कार्यक्रमाचा मान्यवर वक्त्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी काही मान्यवर वक्त्यांच्या छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. ५ पैकी ३ मान्यवर वक्त्यांच्या छायाचित्रांत आरंभी (त्यांनी कार्यक्रमात विषय मांडण्यापूर्वी) अत्यल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली; पण त्यांनी विषय मांडल्यानंतर ती नाहीशी झाली. पाचही मान्यवर वक्त्यांच्या छायाचित्रांत आरंभीही सकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि त्यांनी विषय मांडल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. हे पुढे दिलेल्या नोंदींवरून लक्षात येते.

१ आ १. निष्कर्ष : मान्यवर वक्त्यांमध्ये आरंभीही चांगल्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. त्यांनी कार्यक्रमात विषय मांडल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. यातून ‘या मान्यवर वक्त्यांवर स्वतःच्या भाषणाचा आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाला, तसेच त्यांनी केलेले मार्गदर्शन आध्यात्मिकदृष्ट्या परिणामकारक होते’, असे लक्षात येते.

२. चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमातून क्षात्रतेजयुक्त स्पंदने प्रक्षेपित होणे : ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज ही हिंदु धर्माची दिव्य परंपरा असून साधू-संत, महंत हे या परंपरेचे पाईक आहेत. हिंदु धर्मामध्ये अवतारांपासून संतांपर्यंत सर्वांनी सनातन धर्मसंस्थापनेचे आणि पुढे त्याच्या रक्षणाचे अद्भुत कार्य केले आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवणार्‍या ब्राह्मतेजधारी संतांनी शंखनाद महोत्सवात केलेल्या क्षात्रतेजयुक्त मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये सनातन राष्ट्राच्या संकल्पाचे बीज रोवले. ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमात अनेक संत आणि काही हिंदुत्वनिष्ठ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात स्वामी आनंद स्वरूप महाराज, पू. देवकीनंदन ठाकूर, अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, डॉ. सुरेश चव्हाणके आणि श्री. दर्शक हाथी यांनी केलेले मार्गदर्शन विशेष परिणामकारक होते. या कार्यक्रमातून वातावरणात क्षात्रतेजयुक्त स्पंदने प्रक्षेपित झाली.

२ आ. ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमातून प्रक्षेपित झालेल्या क्षात्रतेजयुक्त स्पंदनांचा साधक-श्रोत्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होणे : या संशोधनात्मक प्रयोगात तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे आणि नसणारे विविध आध्यात्मिक पातळीचे साधक-साधिका सहभागी झाले होते. साधक आणि साधिका यांनी कार्यक्रमातून प्रक्षेपित झालेली क्षात्रतेजयुक्त स्पंदने त्यांच्या क्षमतेनुसार ग्रहण केली. त्यामुळे त्यांना ‘स्वतःतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे आणि सकारात्मक ऊर्जा वाढणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले. विशेष म्हणजे प्रयोगातील आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका आणि ६० टक्क्यांहून अधिक पातळीचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणारा साधक हे दोघेही विदेशी आहेत. हा कार्यक्रम हिंदी भाषेतील होता. या दोघांनाही हिंदी भाषा कळत नाही; पण दोघांवरही आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. याचे कारण हे की, व्यक्तीची चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता ही तिची आध्यात्मिक पातळी, तिला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, तिच्यातील भाव इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून आहे. या दोघांना बुद्धीने हिंदी भाषा कळत नसली, तरी वक्त्यांच्या बोलण्यातून प्रक्षेपित झालेल्या क्षात्रतेजयुक्त स्पंदनांना मात्र दोघांनी स्वतःच्या आध्यात्मिक क्षमतेनुसार यथायोग्य प्रतिसाद दिला.

२ इ. ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ या कार्यक्रमात विषय मांडलेल्या मान्यवर वक्त्यांनाही आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : मान्यवर वक्ते हिंदुत्वासाठी निरपेक्षपणे जे कार्य करत आहेत त्यातून त्यांची साधना होत आहे. या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी त्यांचे विषय अतिशय परिणाकारक मांडले. यातून त्यांची समष्टी साधना झाली. याचा सुपरिणाम त्यांच्यातील सूक्ष्म-ऊर्जेवर झाल्याचे दिसून आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने झालेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा सात्त्विक कार्यक्रम होता. त्याचा उद्देश महान होता. त्यामुळे त्यात सहभागी झालेल्या मान्यवर वक्त्यांनाही कशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले’, हे यातून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.७.२०२५)

ई-मेल : [email protected]

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक