CM Revanth Reddy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे सार्वजनिक गणेशोत्सवात श्री गणेशाला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या वेशात दाखवले !

  • मूर्तीला घातली जिन्स, टी-शर्ट, बूट आणि गळ्यात हिरवी शाल

  • हिंदूंकडून होत आहे विरोध

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या वेशातील श्री गणेशाची मूर्ती

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील हबीबनगरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडपातील श्री गणेशाची मूर्ती राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या वेशात स्थापन करण्यात आली आहे. यात मूर्तीला जिन्स, टी-शर्ट, बूट आणि गळ्यात हिरवी शाल घालण्यात आली आहे. हा पोशाख रेवंत रेड्डी यांच्या एका जुन्या पदयात्रेतील छायाचित्रावरून प्रेरित आहे. ही मूर्ती तेलंगाणा फिशरमन सहकारी महासंघाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते मेट्टू साईकुमार यांनी स्थापन केली आहे. स्थानिक नागरिकांसह गोशामहलचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी याला विरोध केला आहे.

श्री गणेशाची ही मूर्ती ‘तेलंगणा रायजिंग’ या संकल्पनेवर आधारित आहे. मेट्टू साईकुमार यांनी वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले की, मागील काही वर्षांत चित्रपटांच्या संकल्पनेवर आधारित मूर्ती बनवल्या होत्या; मात्र या वेळेस तेलंगाणाच्या विकासाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेचे दर्शन घडवण्यासाठी हा देखावा निवडला.

टी. राजा सिंह यांचा विरोध

टी. राजा सिंह

आमदार टी. राजा सिंह यांनी ‘या मूर्तीमुळे हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान झाला आहे’, असे म्हटले आहे. त्यांनी भाग्यनगर पोलीस आयुक्तांना पत्र देऊन तक्रार केली की, मुख्यमंत्र्यांचा आम्हाला आदर आहे; परंतु ते आमच्यासाठी देव नाहीत. अशा प्रकारचे सादरीकरण हिंदु समाजाच्या भावना दुखावणारे आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून हा मंडप काढून टाकावा आणि धार्मिक सौहार्द अबाधित ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.

स्थानिकांचा रोष

ही घटना समाजिक माध्यमांवरून झपाट्याने पसारित झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि भक्त यांनी याला धार्मिक अपमान मानले आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, गणेशोत्सव हा पवित्र सण आहे. त्यात देवतेला अशा पद्धतीने दाखवणे चुकीचे आहे आणि परंपरांची थट्टा करण्यासारखे आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारे देवतांचे मानवीकरण करून त्यांचा अवमान करतात ! अन्य धर्मीय त्यांच्या श्रद्धास्थानांचा कधीही अशा प्रकारे अवमान करत नाहीत; मात्र हिंदू ते सातत्याने करत आहेत. अशा गोष्टी थांबवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य झाले आहे !