माझी मुले शाळेतून आल्या आल्या सांगू लागली, ‘‘आई, श्रावण महिना चालू आहे ना ?’’ मला ऐकून समाधान वाटले, म्हणाले, ‘‘हो हो; पण तुम्हाला बरे लक्षात आले !’’ तात्काळ मुलांची प्रतिक्रिया ‘‘अगं शाळेमध्ये मित्र म्हणत होते, आता काय हा श्रावण महिना हे नाही खायचे, ते नाही खायचे, so rude (किती असभ्य) ना !, how can we ? (आम्ही कसे करू शकतो ?)’ हे सांगतांना दोन्ही मुलांची देहबोली आणि चेहर्यावरील हावभाव वेगळेच होते. त्यातून असे जाणवत होते की, यांना या श्रावण महिन्याचा ‘फोबिया’ (भीती, नको वाटणे) निर्माण झाला आहे कि काय ? म्हणजे याविषयी मुले किती आणि कसे बोलत असतील, या विचाराने मन उद्विग्न झाले.
खरेतर चूक या छोट्या मुलांची नाही, चूक आपली आहे, पालकांची… मुले जे ऐकतात, बघतात, अनुभवतात तेच कृतीत, भाषेत आणि वर्तनात उतरवतात. म्हणून हा लेख प्रपंच खास आमच्यासारख्या पालकांसाठी…

१. हिंदु सण-परंपरांविषयी मुलांवर चुकीचे विचार बिंबवण्यात आपणच कारणीभूत
बघा, आपल्या वेळी श्रावण मास येणार म्हटले की, आपल्यात एक वेगळाच उत्साह यायचा. ‘सणांचा राजा – श्रावण मास’ यावर तर अनेकदा निबंध लिहिले आहेत. ऊन-पावसाचा खेळ खेळणारा निसर्ग, हिरवागार शालू परिधान केलेली वसुंधरा, विविध रंगातील सुवासाची फुले कायमच मनाला प्रफुल्लित करायची. घराघरांत होणार्या व्रतवैकल्यांचा पूर्वी वेगळाच थाट असायचा. कांदा-लसूण न वापरतासुद्धा उत्तम चवीचे पदार्थ घरोघरी बनायचे.

काळ पालटला, आपण ‘मॉडर्न’ (आधुनिक) होऊ लागलो आणि आपली संस्कृती-परंपरा जुनी, टाकाऊ, बिनडोक समजायला लागलो. ‘आम्ही नाही पाळत श्रावण-बिवण’, ‘भाजके उपवास ? (केवळ भाजलेले पदार्थ खाणे) आम्हाला ना पोटभर खावेच लागते, थालीपीठ कसले खायचे ? दिले सोडून, काय ते मातीचे नाग आणून पूजा करायची, आम्ही निसर्ग संवर्धन करतो बास. नागपंचमी वगैरे सर्व काही ‘आऊटडेटेड (कालबाह्य).’ असे अनेक संवाद आपली पिढी बोलू लागली आहे. असे विचार ऐकून खरेच वाईट वाटते. हे ऐकून हिंदु सण परंपराविषयी नको ते वाईट असे विचार आपणच मुलांच्या मनावर नकळत बिंबवत आहोत. सुंदर अशा या श्रावण मासाचा आणि त्यापुढील सर्व सणांचा योग्य दृष्टीकोन आपण मुलांना द्यायला हवा. (अर्थात् नास्तिक लोकांना हे पटणार नाही, त्यांचे त्यांच्याकडे) तो कसा ते बघूया…
२. श्रावण – संयम
सर्वांत मोठे दुःख मुलांमध्ये जाणवले ते, म्हणजे आता मांसाहार ग्रहण करता येणार नाही याचे ! ठीक आहे ना, नाही खाल्ले वर्षातील २८ दिवस (मराठी महिने २८ दिवसांचेच असतात, हेही आजकाल पालकांना ठाऊक नाही), तर काही बिघडत नाही. मुलांना स्पष्ट सांगा, ‘आता १ महिना मांसाहार ग्रहण करायचा नाही आणि तुम्ही ते पाळा आधी.’ श्रावण मासात होणार्या सणावारी नैवेद्य बनतो, नैवेद्य झाल्याविना काही खाता येणार नाही, हेही मुलांना सांगा. त्यांच्यात विलंबित समाधान (delayed gratification) आपोआप निर्माण होते. आयुष्यात याचा पुढे त्यांनाच पुष्कळ उपयोग होणार आहे. त्यांना भाजका किंवा उपवासाचा सोमवार करू द्या, एखादा दिवस नाही अगदी काही ‘आरोग्यदायी’ (हेल्थी) खाल्ले, तरी काही मोठा फरक पडत नाही. (भाजणी थालीपीठ, खिचडी – कढी ही कैकपटीने पौष्टिक आहेच, हे या ‘मॉडर्न’ मातांनी समजून घ्यायला हवे.)
३. श्रावण – उपक्रम
भरगच्च सणांचा हा महिना. खरेच किती सुंदर रचना केली आहे ना ? दिव्याची अमावास्या, श्रावण सोमवार, नागपंचमी, स्वातंत्र्यदिन, राखी, नारळीपौर्णिमा, जिवती, दहीहंडी, गोपाळकाला वगैरे वगैरे. या प्रत्येक सणाचा आपण उपक्रम म्हणून मुलांसह छान उपयोग करू शकतो. असेही चांगले उपक्रम शिकण्यासाठी सहस्रो रुपयांचे शुल्क भरून आपण शाळेत घालतो; पण हिंदु संस्कृतीमध्ये आलेल्या या सुंदर सणांच्या उपक्रमांना मात्र नावे ठेवतो.

४. श्रावण – आरोग्य
अत्यंत महत्त्वाचे सूत्र आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणामागे आरोग्याचा विचार करून त्याप्रमाणे त्याची रचना केली आहे. हे एक सूत्र जरी आस्तिक – नास्तिक पालकांनी लक्षात ठेवले, तरी त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्याचे साहाय्य होईल.
अतीपावसाने शरिरातील पाचक अग्नी हा न्यून झालेला असतो, त्यावर मांसाहारासारखे जड अन्न म्हणून घेतले, तर पचनक्रियेवर ताण येऊन पुढे पचनाचे विकार होतात. त्यामुळे ‘ते नको’, असे धर्माचा आधार घेऊन सांगितलेले आहे.
वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) निसर्गत: पित्ताचा संचय (शरिरात साठू लागते) होऊ लागतो. त्यामुळे अतीप्रमाणात कांदा, लसूण, मसालेदार अन्न जर खाल्ले गेले, तर पुढे येणार्या शरद ऋतू पित्ताचा प्रकोप (पित्त उसळते) हा अधिक प्रमाणात होईल आणि त्यातून पित्ताच्या अधिक व्याधी होतात. म्हणून आवर्जून कांदा, लसूण न्यून प्रमाणात आणि भाजके खाणे या महिन्यात श्रेयस्कर !
सणाच्या दिवशी होणारे वेगळे पदार्थ मुलांना थोडे का होईना मुद्दाम खायला द्या. त्यांनाही कळू दे आपल्या पारंपरिक पदार्थांची चव, त्यामागचे कारण. आपल्या पिढीला हे पदार्थ का आवडतात ? कारण आपल्या आई-आजीने ते त्या त्या सणाला करून आपल्यात त्याची चव निर्माण केली आहे. आपल्या दैनंदिन आहारात नावीन्य आणायला, हे सण, पदार्थ नक्कीच साहाय्य करतात. भले विकत आणा; पण त्या सणाला ते ते वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मुलांना खाऊ द्या. उदाहरणार्थ नारळीपौर्णिमा – नारळी भात, नागपंचमी – तंबीट लाडू.
येणारा प्रत्येक सण मुलांना भरभरून उपभोगू द्यायला हवा. मुली असतील, तर त्यांनी छान नटले पाहिजे. त्यांना मुलांचे कपडे घालून पुरुषी करायचा अट्टाहास का ?, ते देव जाणे आणि त्याचे त्या पालकांना भारी कौतुक वाटते, बघा आमची मुलगी कशी ‘टॉमबॉय’ (पुरुषांप्रमाणे धाडसी मुलगी) आहे. ती ‘टॉमबॉय’ नसते, तिला तुम्ही बनवता. अरे, नशिबाने स्त्री म्हणून जन्म मिळाला आहे, तर घालू दे ना बांगड्या, माळू दे गजरा, लावू दे कुंकू, खेळू दे झिम्मा. यातून तिचा सामाजिक, बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होणार आहे. अर्थात् या सगळया गोष्टी अती करणेही योग्य नाही. मुलांमध्ये त्या त्या सणांची घृणा निर्माण होईल, असे अजिबात करू नये.
लक्षात असू द्या, हिंदु परंपरा, सण यांचा मान पालक म्हणून आपण आधी जपायला हवा. त्या महिन्याचे धार्मिक, सामािजक, आरोग्य यांच्या दृष्टीने मुलांना महत्त्व सांगून आनंदाने, ताणविरहित हे सण साजरे केले जावेत, म्हणजे ही पिढी ते टिकवेल आणि पुढे ते चालू ठेवेल. श्रावणच काय; पण कोणतेही हिंदु महिने, सण यांविषयी मुलांमध्ये भीती निर्माण होणार नाही, याची जाणीवपूर्वक काळजी घेऊया.
– वैद्या (सौ.) सुमेधा रानडे, आयुर्वेदाचार्य, बालसमुपदेशक, सांगली.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान