
१. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव येथे नृत्यसेवा सादर करण्याची संधी मिळणे आणि त्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येतांना पुष्कळ अडचणी येणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आतापर्यंत झालेल्या प्रत्येक जन्मोत्सवाच्या वेळी मी घरी होते. या वर्षी मी पहिल्यांदाच गुरुदेवांच्या जन्मोत्सवात नृत्यसेवा करणार होते. मी घरी नृत्याच्या परीक्षेसाठी आले होते. तेव्हा मला कळले की, ‘या वर्षी मला जन्मोत्सवात नृत्यसेवा करण्याची अनमोल संधी मिळाली आहे.’ हे कळल्यावर गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. नंतर नृत्य सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्यास पुष्कळ अडचणी आल्या. यासाठी मी आध्यात्मिक स्तरावर उपायही करत होते.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच रामनाथी आश्रमात नृत्य सेवेसाठी येऊ शकणे
माझी नृत्याची परीक्षा एप्रिल २०२५ मध्ये होणार होती; परंतु ती एक मास (महिना) पुढे गेली. परीक्षेच्या दिनांकामध्ये सारखा पालट होत होता. रामनाथी आश्रमात येण्यासाठी मी ३ वेळा तिकीट काढले; पण परीक्षेच्या दिनांकामध्ये सारखा पालट होत असल्याने मला सर्व तिकिटे रहित करावी लागली. हे सर्व प्रसंग होत असतांना देवाने मला पुष्कळ स्थिर ठेवले. ‘देवाचे नियोजन आहे, तर तो मला कसेही करून आश्रमात आणणारच आहे’, अशी माझी दृढ श्रद्धा होती. देवाच्या कृपेमुळे मला ऐन वेळी तिकीट मिळाले आणि मी आश्रमात नृत्य सेवेसाठी येऊ शकले. हे केवळ गुरुकृपेमुळेच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच) शक्य झाले.
३. कु. शर्वरी कानस्कर, कु. अपाला औंधकर आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर यांनी सगळे नृत्यदिग्दर्शन पुष्कळ सुंदर पद्धतीने समजावल्याने एकाच दिवसात पूर्ण नृत्य शिकता येणे
नृत्यसेवेत आम्ही एकूण १४ साधिका सहभागी होतो. त्यात काही साधिका सरावाच्या आरंभीपासून उपस्थित होत्या, तर काही नंतर आल्या. ज्या दिवशी मी आले, त्या दिवसापर्यंत बरेच नृत्य बसवून झाले होते. नृत्यात बर्याच रचना होत्या. कु. शर्वरी कानस्कर, कु. अपाला औंधकर आणि सौ. सावित्री इचलकरंजीकर यांनी मला सगळे नृत्यदिग्दर्शन (Choreography) पुष्कळ सुंदर पद्धतीने समजावले. त्यामुळे मला एकाच दिवसात पूर्ण नृत्य शिकता आले.
४. नृत्याच्या रचनेसाठी कु. शर्वरी, कु. अपाला, सौ. सावित्रीताई यांनी एक वही सिद्ध केली होती. त्यात सर्वांच्या पोषाखाच्या रंगाप्रमाणे, नृत्याची रचना काढली होती. ‘त्या वहीकडे बघून आनंद जाणवत होता आणि त्या आनंदाचा गोळा वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होत होता’, असे मला जाणवले.
५. नृत्यातील सर्व साधिकांचा भाव एकसारखाच होत होता.

६. सराव करण्याच्या आरंभी भावप्रयोग केल्याने किंवा घुंगरू बांधत असतांना भक्तीगीते लावल्याने नृत्याच्या माध्यमातून गुरुदेवांना अनुभवायची ओढ दाटून येणे
नृत्य सरावाच्या आरंभी आम्हाला एकाच वेळी सर्वांच्या सारख्या हालचाली येण्यास (Syncronise) अडचणी येत होत्या. तेव्हा आम्ही सराव करण्याच्या आरंभी भावप्रयोग घ्यायचो किंवा घुंगरू बांधत असतांना भक्तीगीते लावायचो. असे केल्यावर नृत्याच्या माध्यमातून गुरुदेवांना अनुभवायची ओढ दाटून यायची.
७. नृत्य सराव करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे
नृत्य सराव करतांना बर्याच वेळा ‘गुरुदेव त्यांचा पांढरा सदरा घालून सराव बघायला आले आहेत’, असे मला जाणवायचे. आम्ही आमच्या नृत्यामध्ये गुरुपादुकाही ठेवल्या होत्या. तेव्हा सराव करतांना ‘गुरुपादुकांच्या ठिकाणी प्रत्यक्ष गुरुदेव उभे आहेत’, असे मला जाणवायचे आणि गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव दाटून यायचा.
८. एकदा मला सराव करतांना चंदनाचा, तसेच गुलाबाचाही सुगंध आला.
९. वजनाने जड असलेल्या घुंगरूंचे वजन गुरुतत्त्वामुळे पहिल्याच सरावानंतर नाहीसे होणे
सर्वांत मोठी अनुभूती म्हणजे, माझ्याकडे घुंगरांचे दोन जोड आहेत. एरव्ही सरावासाठी मी हलके घुंगरू वापरायचे; पण या वेळी ते माझ्याकडे उपलब्ध नसल्याने मी घुंगरांचे दुसरे जोड वापरण्यासाठी घेतले, जे वजनाने जड होते; पण ‘सरावाच्या पहिल्याच दिवशी मी घुंगरू पायात बांधले आहेत’, असे अजिबात जाणवले नाही. घुंगरांचे वजन पहिल्याच सरावानंतर नाहीसे झाले.
नृत्यात गुरुतत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत होते. त्या गुरुतत्त्वामुळेच मला माझ्या घुंगरांचे वजन जाणवले नाही. मला माझ्या घुंगरांकडे बघून ‘त्यांनाही या गुरुसेवेत सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांनाही कृतज्ञता वाटत आहे’, असे जाणवले आणि ‘त्यामुळे त्या घुंगरांनाही त्यांच्या अस्तित्वाचे भान राहिले नसावे’, असे मला वाटते.
१०. नृत्याच्या सर्व मुद्रांमध्ये पुष्कळ भाव असल्यामुळे प्रत्येक मुद्रेतून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना लगेच अनुभवता येणे
आमच्या नृत्याचा आरंभ पुढील श्लोकाने होता.
अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।। – गुरुगीता, श्लोक ६७
अर्थ : ज्याने हे चराचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ (ब्रह्मांड) व्यापले आहे, त्या ब्रह्मपद दाखवणार्या श्री गुरूंना नमस्कार असो.
हा श्लोक आम्ही नृत्याद्वारे दाखवतांना ‘येन’ हा शब्द आल्यावर आम्ही ‘गुरुचरणी पुष्प अर्पण करणे’, असा भाव दाखवणारी मुद्रा करत होतो. आम्ही ही पुष्प धरायची जी मुद्रा करत होतो, त्या मुद्रेला ‘ओंजळ किंवा अंजली’ म्हणतात. ही मुद्रा करतांना देवाला एकच प्रार्थना व्हायची, ‘हे परम कृपाळू गुरुमाऊली, या अंजलीमधील (मुद्रेमधील) पुष्पाप्रमाणे, या अंजलीलाही (मलाही) केवळ तुमच्या चरणी अखंड समर्पित होता येऊ देत.’ नृत्याच्या आरंभीच्या श्लोकात मी संपूर्ण गुरुमाऊलीच्या चरणी लीन झाले आणि ‘आता माझे काही अस्तित्वच उरले नाही’, असे मला अनुभवता आले. नृत्याच्या सर्व मुद्रांमध्ये पुष्कळ भाव होता. त्यामुळे प्रत्येक मुद्रेतून गुरुदेवांना लगेच अनुभवता येत होते.

११. नृत्य सराव करतांना भाव ठेवल्यामुळे गुरुदेवांप्रती सतत कृतज्ञताभाव दाटून येणे आणि ‘हे पूर्ण जीवन गुरुचरणी समर्पित आहे’, याची जाणीव होणे
‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे,
यतो हस्तस्ततो दृष्टिर्यतो दृष्टिस्ततो मनः ।
यतो मनस्ततो भावो यतो भावस्ततो रसः ।। – अभिनयदर्पण, श्लोक ३७
अर्थ : जिथे हात आहेत, तिथे दृष्टी असली पाहिजे. जिथे दृष्टी आहे, तिथे मन असले पािहजे. जिथे मन आहे, तिथे भाव निर्माण होईल आणि भाव निर्माण झाला की, रस उत्पन्न होईल.
भावार्थ : ‘आपल्या आध्यात्मिक अशा नृत्य आराधनेमध्ये मला हा श्लोक असा वाटला की, जिथे हात आहेत (म्हणजे ज्या दिशेमध्ये आपण मुद्रा करत आहोत), तिथे गुरु आहेत. त्या दिशेला मुद्रा करतांना आपली दृष्टी जिथे जाते, तिथे गुरु आहेत. जिथे दृष्टी जाते, तिथे आपले मनही जाते, त्या मनातही गुरु आहेत. मनात गुरु आले म्हणजे भाव दाटून आला. तो भावही गुरूंप्रती आहे आणि त्या भावामुळे जो रस उत्पन्न होतो, म्हणजेच भावजागृती होते, तीही गुरूंप्रतीच आहे. हे संपूर्ण नृत्य गुरुमय आहे’, नृत्य सराव करतांना असा भाव ठेवल्यामुळे माझा गुरुदेवांप्रती सतत कृतज्ञताभाव दाटून यायचा आणि ‘माझे हे संपूर्ण जीवन गुरुचरणी समर्पित आहे’, याची जाणीव व्हायची.
(क्रमश: पुढील गुरुवारी)
– कु. अंजली कानस्कर, दुर्ग, छत्तीसगड. (२९.५.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !