पाकशी मैत्री नसतांना सिंधू जल वाटप करार का केला ? – EAM Dr. S. Jaishankar

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी राज्यसभेत काँग्रेसला विचारला प्रश्न

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

नवी देहली – भारताची पाकिस्तानशी मैत्री नसतांना सिंधू जल वाटप करार करायची काय आवश्यकता होती ? असे म्हटले गेले की, ही शांततेची किंमत आहे; मात्र ही लांगूलचालनाची किंमत होती. काँग्रेसला पंजाब, राजस्थान, हरियाणा राज्यांतील शेतकर्‍यांची नव्हे, तर पाकिस्तानच्या पंजाबमधील शेतकर्‍यांची काळजी होती. सिंधू जल वाटप करार तोपर्यंत स्थगित राहील, जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद पूर्णपणे थांबवत नाही. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत बोलतांना पाकला ठणकावले.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी मांडलेली सूत्रे

१. भारत अनेक वर्षांपासून सीमापार आतंकवादाचा सामना करत होता. आम्ही जे म्हणतो, तेच करून दाखवतो. पूर्वी आतंकवादी आक्रमणाच्या मोठ्या घटना घडायच्या, तेव्हा त्यावर फारशी कारवाई केली जात नव्हती; मात्र गेल्या दशकभरात आम्ही आतंकवादाविरोधात ‘शून्य सहनशीलता धोरण’ अवलंबले, ज्यामुळे या कारवाया मोठ्या प्रमाणात न्यून झाल्या. आज आतंकवाद्यांना मिळणारा निधीही थांबला आहे.

२. आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नाही, पाकिस्तान आहे; मात्र, असे असूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी भारताची बाजू घेतली. रशियासह अनेक देशांनी जाहीररित्या भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला, यावरून आमची राजनैतिक मुत्सद्धीपणा किती यशस्वी झाला, हे स्पष्ट होते. आम्ही पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा (एखाद्या देशात प्रवेश करण्याची, एखादा देश सोडून जाण्याची किंवा एखाद्या देशातून प्रवास करण्याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्का) रहित केला. सिंधू जल वाटप करार स्थगित केला. भारताने कसा प्रतिसाद दिला, संपूर्ण जगाने पाहिले. आम्ही जगासमोर पाकिस्तानचा चेहरा उघड केला. मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाच्या घटनेवर मौन राहिलेले लोक आज आम्हाला काय करावे, हे शिकवत आहेत.

३. गेल्या दशकात आम्ही आतंकवादाचे सूत्र जागतिक स्तरावर आणण्यात यशस्वी ठरलो आहोत. २६ वर्षांपासून भारताला हवा असलेला तहव्वुर राणा याला सरकार भारतात परत आणू शकले आणि आता त्याच्यावर येथे खटले चालू आहेत.

ट्रम्प आणि मोदी यांच्यात एकही दूरभाष झाला नाही !

जयशंकर म्हणाले की, जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. अमेरिका, सौदी अरेबियासह अनेक देशांशी आमची चर्चा झाली, सर्व दूरभाषांची नोंद आहे. ते माझ्या सामाजिक माध्यमांवरील खात्यावरही आहे. आम्ही सर्वांना हेच सांगितले की, जर पाकिस्तानला संघर्ष थांबवायचा असेल, तर त्याने आमच्या सैन्याधिकार्‍यांच्या माध्यमांतून विनंती करावी. १२ एप्रिल ते २२ जून या कालावधीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात एकही दूरभाष झाला नाही.

संपादकीय भूमिका

काँग्रेसला कितीही प्रश्न विचारले, तरी ते अल्पच ठरतील. काँग्रेसमुळेच पाकची निर्मिती झाली आणि गेली ७८ वर्षे तो भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. आताच्या सरकारने काँग्रेसचे हे पाप कायमचे संपवावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे.