‘१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ झाला. या महोत्सवात ३० सहस्रांहून अधिक साधक, जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या महोत्सवाचे आध्यात्मिक यश या लेखात थोडक्यात दिले आहे. २९.७.२०२५ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.
लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/940216.html
(भाग २)
२. अध्यात्मप्रसार आणि सनातन राष्ट्र-स्थापनेचे कार्य रोखण्यासाठी वाईट शक्तींनी तीव्र आक्रमण करणे; पण गुरु, संत आणि देवता यांच्या कृपेमुळे त्यांना यश न येणे
२ इ. पाताळातील वाईट शक्तींनी अनेक साधकांचा मृत्यू आणि सनातनची अपकीर्ती होण्यासाठी महोत्सवावर तीव्र आक्रमणे करणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला यश मिळू नये’, यासाठी पाताळातील वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणांची तीव्रता ८५ टक्के होती.
२ इ १. पाताळातील वाईट शक्तींच्या आक्रमणांच्या तीव्रतेचे प्रमाण (टक्के) आणि त्यामुळे होणारे स्थुलातील परिणाम

२ ई. पाताळातील वाईट शक्तींनी महोत्सवात अपघात आणि चेंगराचेंगरी घडवून अनेक लोकांचा अकाली मृत्यू अन् सनातन संस्थेची अपकीर्ती होण्याचे षड्यंत्र रचणे : वरील सारणीतून लक्षात येते की, सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ८५ टक्के एवढ्या तीव्र प्रमाणात आक्रमणे करून पाताळातील वाईट शक्तींना महोत्सवात चेंगराचेंगरी किंवा पूर, भूकंप यांसारखी नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती निर्माण करून सहस्रो लोकांचा अकाली मृत्यू घडवून आणायचा होता. यातून पाताळातील मोठ्या वाईट शक्तींना साधना करणार्या अनेक जिवांना आपल्या नियंत्रणात घ्यायचे होते, तसेच ‘सनातन संस्थेचे आयोजन योग्य नसते’, अशी प्रतिमा समाजात निर्माण करून सनातनला समाजातील विविध हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि संत यांच्याकडून मिळत असलेले समर्थन अन् त्या माध्यमातून सात्त्विक विचारसरणीच्या लोकांचे होत असलेले संघटन नष्ट करायचे होते.

२ उ. संत आणि देवता यांच्या अस्तित्वामुळे वाईट शक्तींचे षड्यंत्र निष्फळ होणे अन् अनेक साधकांचे अकाली मृत्यूपासून रक्षण होऊन पुढे त्यांना सद्गती मिळणे : ज्या वेळी समष्टीत स्थूल स्तरावर धर्मसंस्थापनेचे कार्य करायचे असते, त्या वेळी ईश्वर संकल्पाच्या स्तरावर न रहाता स्वतः अवतार घेऊन अस्तित्वाच्या स्तरावर कार्य करतो. समष्टी संत आणि देवता यांचेही कार्य असेच असते. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचे आक्रमण तीव्रतम असले, तरी कार्यक्रमस्थळी स्थुलातून उपस्थित असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातनचे आणि समाजातील इतर संत यांच्या अस्तित्वातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे सगुण स्तरावरील अडथळे निष्फळ होत होते, तर सूक्ष्म स्तरावर कार्यरत विविध देवता, विशेषकरून श्री वाराहीदेवी सूक्ष्मातील वाईट शक्तींशी लढा देऊन कार्यक्रमस्थळाचे रक्षण करत होती. त्यामुळे वाईट शक्तींच्या षड्यंत्राला पूर्ण यश न येता महोत्सवात विविध समस्या निर्माण करण्याच्या माध्यमातूनही त्याला काही अंशी यश आले.
महोत्सवात सहभागी असलेल्या काही साधकांचा व्यष्टी मृत्यूयोगही पुष्कळ बलवान होता. अशा साधकांवर तीव्र आक्रमणे करून त्यांचा मृत्यू कार्यक्रमस्थळी घडवण्याचा प्रयत्नही पाताळातील वाईट शक्ती करत होत्या. असे असले, तरी श्री गुरुतत्त्व कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येक साधकाचे वाईट शक्ती आणि काळ या दोन्ही घटकांपासून रक्षण करत होते. त्यामुळे अनेक साधकांचा अकाली मृत्यूयोग टळला अन् त्यांना पूर्ण महोत्सवाचा लाभ घेता आला. व्यष्टी मृत्यूयोग असलेल्या साधकांना महोत्सवाचे चैतन्य मिळाले. त्यामुळे प्रारब्धानुसार पुढे काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला, तरी त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ असल्याने त्यांना मृत्यूच्या वेळी पुष्कळ वेदना सहन कराव्या लागल्या नाहीत आणि त्यांना सूक्ष्मातून उच्च लोकात स्थान, म्हणजे सद्गती मिळाली.
३. महोत्सवात स्थुलातील अडथळे आले असूनही समाजातील लोक आणि साधक यांना दिव्य अनुभूती येणे अन् महोत्सवात सेवा करणार्या साधकांची २ ते ३ वर्षांची साधना होणे
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात बलाढ्य वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणांमुळे स्थुलातून विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. असे असले, तरी महोत्सवात सहभागी असलेले समाजातील काही मान्यवर आणि साधक यांनी पुढील सूत्रे सांगितली.
अ. महोत्सवासाठी धनबाद (झारखंड) येथून आलेल्या एका प्रतिष्ठितांनी सांगितले, ‘‘१७ मे या दिवशी मला पहाटे स्वप्नात भगवान शिवाचे दर्शन झाले आणि त्याच दिवशी महोत्सवात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. दर्शक हाथी यांनी १ सहस्र वर्षे जुने सोमनाथ ज्योतिर्लिंग सर्वांना व्यासपिठावरून दाखवले. ही माझ्यासाठी दिव्य अनुभूती होती.’’
आ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या श्रीमती गीता प्रभु (वय ६८ वर्षे) यांनी सांगितले, ‘‘महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महोत्सवस्थळापासून आश्रमात जाण्यासाठीच्या नियोजित बसची बॅटरी अकस्मात् बंद पडली. दुसर्या बसची व्यवस्था रात्री ११ वाजता झाली, तरी ‘माझ्या मनाची चिडचिड झाली नाही’, याचे मला समाधान आहे.’’
इ. कलेशी संबंधित सेवा करणार्या कु. साधना सावंत यांनी सांगितले, ‘‘महोत्सवाच्या सिद्धतेमुळे १६ मे या रात्री मला जागरण झाले. १७ मे या दिवशी दुपारी जेवणाला थोडी अडचण झाल्यामुळे उशिरा जेवण झाले आणि रात्रीचे जेवण करताच आले नाही, तरी ‘देव अशा विविध माध्यमांतून त्याग करून घेत आहे’, याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’’
अशा प्रकारे महोत्सवात सहभागी असलेले समाजातील लोक किंवा साधक यांचे सूक्ष्मातून निरीक्षण केल्यावर अनेकांना चैतन्य मिळाल्यामुळे त्यांचे चेहरे अधिक उजळलेले दिसत होते, तर अनेक साधकांभोवती चैतन्य आणि भाव यांच्याशी निगडित अनुक्रमे पिवळ्या अन् निळ्या रंगाची प्रभावळ दिसत होती. या संदर्भात सूक्ष्म ज्ञानातून लक्षात आले, ‘कार्यक्रमात स्थुलातून विविध अडथळे आणि अडचणी आल्या असल्या, तरी देवाचे चैतन्य कार्यरत असल्याने समाजातील लोकांनी स्वतःमध्ये सकारात्मक पालट होण्याची अनुभूती घेतली, तर जे साधक परिस्थिती स्वीकारून आध्यात्मिक भावाच्या स्तरावर रहाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना अवघ्या ३ दिवसांच्या महोत्सवातून २ ते ३ वर्षांच्या साधनेचे फळ मिळाले. त्यामुळे चांगले प्रयत्न करणार्या साधकांभोवती सूक्ष्मातून चैतन्य आणि भाव यांच्याशी निगडित प्रभावळ कार्यरत झालेली दिसली.’
४. महोत्सवात स्थुलातून अडचणी आल्या असल्या, तरी सूक्ष्मातून सनातनचा विजय झालेला असणे
महोत्सवाची एकूण समीक्षा केल्यावर पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.
अ. मोठ्या वाईट शक्तींनी अनेक साधकांचा मृत्यू घडवून सनातनची समाजात अपकीर्ती करण्याच्या उद्देशाने केलेल्या अतीतीव्र आक्रमणात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. ‘ते आक्रमण निष्फळ ठरले’, असेच म्हणावे लागणार.
आ. ‘पाताळातील बलाढ्य वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे स्थुलातील काही अडचणी आल्या; पण त्यांना सामोरे जाण्याच्या माध्यमातून साधकांची २ ते ३ वर्षांची साधना काही दिवसांत झाली’, हे आध्यात्मिक यशच आहे.
इ. वाईट शक्तींनी मृत्यूयोग जवळ असलेल्या साधकांना शारीरिक त्रास देऊन त्यांना चैतन्यापासून विन्मुख करण्याचा प्रयत्न केला, तरी गुरुकृपेने साधकांचे रक्षण होऊन त्यांना महोत्सवातील चैतन्य अनुभवता येऊन सद्गती मिळवता आली.
ई. वाईट शक्तींनी अनेक आक्रमणे केली, तरी समाजातील सात्त्विक जीव किंवा तळमळीने आणि भावपूर्ण साधना करणारे साधक, म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पात्र जिवांना चैतन्य ग्रहण करण्यापासून त्या थांबवू शकल्या नाहीत.
उ. महोत्सवातून अध्यात्मप्रसाराचे कार्य आणि सनातन राष्ट्र-संस्थापना यांसाठी जगाच्या (पृथ्वीच्या) कुंडलिनीवर आवश्यक असलेला शक्तीपात करून ती जागृत करण्याची प्रक्रिया निर्विघ्नपणे घडली.
महोत्सवात स्थुलातील काही व्यवस्था करण्यात जरी पराजय आला, तरी सूक्ष्म स्तरावर ‘परा(आध्यात्मिक)(टीप) जय’ मिळाला आहे. या माध्यमातून अनेक जिवांना आध्यात्मिक ऊर्जा मिळाली असून त्याचे परिणाम पुढे भविष्यात दिसून येतील. अशा महोत्सवात श्री गुरुकृपेने सहभागी होता आले; म्हणून श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
टीप – हिंदु धर्मातील विविध ग्रंथांमध्ये पंचतत्त्वांना (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यांना) भगवान विष्णूची ‘अपराशक्ती’, असे म्हटले आहे. जी पंचतत्त्वांच्या पलीकडे आहे, ती आध्यात्मिक शक्ती, म्हणजे पराशक्ती.’
(समाप्त)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १८.५.२०२५)
|

कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?